भारत
राष्ट्रकुल स्पर्धेत देशाला एकूण पाच पदके:संभाजीनगरचा धावपटू तेजस शिरसे 110 मीटर हर्डल्सच्या अंतिम फेरीत
✍️ ऑथर / संपादक: नातेपुते एक्सप्रेस
📅 28 July 2026, 12:55 AM
छत्रपती संभाजीनगरचा युवा धावपटू तेजस शिरसे राष्ट्रकुल स्पर्धेच्या ६० वर्षांच्या इतिहासात ११० मीटर हर्डल्सच्या अंतिम फेरीत स्थान मिळवणारा पहिला भारतीय ठरला आहे. सोमवारी आयोजित हीट-१ मध्ये तो तिसऱ्या स्थानावर राहिला. तेजसने अवघ्या १३.७६ सेकंदांत पूर्ण करून फायनलचे तिकीट पक्के केले आहे. यापूर्वी १९६६ साली गुरुबचनसिंग रंधवा याने ॲथलेटिक्समध्ये अंतिम फेरी गाठली होती. मुंबई येथील रिलायन्स फाउंडेशनमध्ये तेजस प्रशिक्षण घेत आहे. या प्रशिक्षणाचा त्याला लाभ होत आहे. यापूर्वी त्याने लुधियाना येथील राष्ट्रीय स्पर्धेत १३.२७ सेकंदांची विक्रमी वेळ नोंदवली होती. वेटलिफ्टर लावताहेत विजयाचा टिळा भारतीय वेटलिफ्टर ज्ञानेश्वरी यादव, राजा मुथुपांडींनी रौप्यपदक जिंकले. भारताच्या एकूण ५ पदकांतील ४ वेटलिफ्टिंगमध्ये मिळाली. ज्ञानेश्वरीने ५३ किलो वजनी गटात १९९ (८८ किलो स्नॅच + १११ किलो क्लीन अँड जर्क) तर पुरुषांच्या ६५ किलो वजनी गटात राजाने स्नॅचमध्ये १२६ तर क्लीन अँड जर्कमध्ये १६० किलो वजन उचलले. उसने घेतलेले बूट घालून जिंकले होते पदक छत्तीसगडच्या राजनांदगाव जिल्ह्यातील ज्ञानेश्वरी जेव्हा पहिल्यांदा नॅशनल चॅम्पियनशिप खेळायला जात होती तेव्हा तिच्याकडे ना वेटलिफ्टिंगचे बूट होते ना कुटुंबाची आर्थिक स्थिती चांगली होती. तेव्हा तिचे प्रशिक्षक आणि कुटुंबाने मित्रांकडे मदत मागितली. दुसऱ्या लिफ्टरकडून बूट घेतले, जे ज्ञानेश्वरीच्या मापापेक्षा सैल होते. पण तरीही ज्ञानेश्वरीने पदक जिंकले. आईच्या प्रोत्साहनाने पुन्हा वेटलिफ्टर बनवले राजा आणि त्याचा भाऊ केवळ फिटनेससाठी जिम करत होते. एक दिवस जिम प्रशिक्षकाने राजाची शारीरिक क्षमता पाहून त्याला वेटलिफ्टिंग निवडण्याचा सल्ला दिला. याच सल्ल्याने आयुष्य बदलले. मात्र २०२२ मध्ये पायाला झालेल्या गंभीर दुखापतीमुळे तो ४ वर्षे खेळापासून दूर राहिला आणि करिअर जवळपास संपले होते. पण, आईने प्रोत्साहन दिले आणि मेहनत करण्यास सांगितले.