मराठी

गुलाबराव पाटलांच्या विधानावरून नवा वाद:म्हणाले- शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तरी चालेल, पण उद्योजकांना विजेचा तुटवडा नको, रोहिणी खडसेंची सडकून टीका

✍️ ऑथर / संपादक: नातेपुते एक्सप्रेस 📅 28 July 2026, 09:29 AM
गुलाबराव पाटलांच्या विधानावरून नवा वाद:म्हणाले- शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तरी चालेल, पण उद्योजकांना विजेचा तुटवडा नको, रोहिणी खडसेंची सडकून टीका
"एकवेळेस शेतकऱ्यांना लोडशेडिंगचा थोडा त्रास झाला तरी आम्ही सहन करू, पण उद्योजकांना विजेचा तुटवडा होता कामा नये," असे वादग्रस्त विधान राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री आणि जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे. जळगावमधील एका वीज प्रकल्पाच्या लोकार्पण सोहळ्यात बोलताना त्यांनी हे विधान केले असून, यावरून आता राजकीय वाद उफाळून आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) नेत्या रोहिणी खडसे यांनी या विधानावरून गुलाबराव पाटील आणि महायुती सरकारवर सडकून टीका केली आहे. नेमके काय म्हणाले गुलाबराव पाटील? जळगाव येथील अतिरिक्त वीज ट्रान्सफॉर्मरच्या (5 एमव्हीए) लोकार्पण सोहळ्यात बोलताना गुलाबराव पाटील यांनी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना आणि उपस्थित उद्योजकांना संबोधित केले. उद्योजकांची बाजू मांडताना ते म्हणाले की, "आमची हात जोडून विनंती आहे की, एकवेळेस शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तरी आम्ही सहन करून घेऊ, पण उद्योजकांना त्रास होऊ देऊ नका. कारण उद्योजकाला मजुरांना पैसे द्यायचे असतात. लाईट गेली म्हणून तो मजुरांना पैसे नाकारू शकत नाही. त्यात त्याचा प्रोडक्शनचा मोठा लॉस होतो. जर सतत लाईट जात असेल, तर नवीन उद्योजक इथे कारखाने टाकण्यास तयार होणार नाहीत. या उद्योगांमुळेच आमच्या परिसरातील 500-1000 मुलांना किमान रोजगार मिळतो." शेतकऱ्यांना दिवसा लाईट यासोबतच त्यांनी आपल्या मतदारसंघातील कामाचे कौतुक करताना म्हटले की, "जळगाव ग्रामीण हा असा एकमेव मतदारसंघ आहे जिथे आता शेतकऱ्यांना शेतात १००% दिवसा लाईट मिळते. त्यामुळे रात्रीच्या वेळी शेतात जाण्याची आणि सापा-विंचवांची शेतकऱ्यांची धास्ती कमी झाली आहे." "जिल्हा नियोजन समितीतून (DPDC) महावितरणला 130 कोटी रुपये देणारा मी एकमेव पालकमंत्री असेल, ज्यामुळे जिल्ह्यात 750 ट्रान्सफॉर्मर उभे राहिले आणि पेंडन्सी कमी झाली," असा दावाही त्यांनी केला. स्मार्ट मीटरवरून अधिकाऱ्यांना कानपिचक्या भाषणाच्या शेवटी त्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना वाढत्या वीज बिलांवरून चिमटा काढला. "तुमच्या स्मार्ट मीटरचे आमच्यावर लय प्रेम आहे, ते जरा सांभाळा बाबा! लोक रोज सकाळी एवढी मोठी वीज बिले घेऊन माझ्या घरी येतात," असे म्हणत त्यांनी वाढत्या बिलांबाबत नाराजी व्यक्त केली. रोहिणी खडसे यांचा गुलाबराव पाटलांवर घणाघात गुलाबराव पाटलांच्या या विधानानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) नेत्या रोहिणी खडसे यांनी आक्रमक भूमिका घेत त्यांच्यावर 'X' (ट्विटर) द्वारे खरपूस टीका केली आहे. पालकमंत्र्यांना आठवडाभर उपाशी ठेवा रोहिणी खडसे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे, "पालकमंत्री महोदय म्हणतात की शेतकऱ्यांना वीज नसली तरी चालेल, पण उद्योजकांना विजेचा तुटवडा होता कामा नये! वाह रे वाह... यांना आठवडाभर उपाशी ठेवले पाहिजे, तेव्हाच त्यांना अन्नधान्य पिकवणाऱ्या शेतकऱ्यांचे महत्त्व कळेल!" "निवडणुकीत शेतकऱ्यांच्या नावाने मते मागायची आणि सत्तेत आल्यावर उद्योगपतींच्या मांडीवर जाऊन बसायचे... हे सरकारचे चांगलेच चालले आहे," असा घणाघात त्यांनी केला. महायुती सरकारवर निशाणा "या वक्तव्यातून महायुती सरकारचा खरा चेहरा समोर आला असून, हीच या सरकारची शेतकरी आणि शेतीविषयीची भूमिका आहे," असा आरोप रोहिणी खडसे यांनी केला आहे. गुलाबराव पाटील यांच्या या विधानामुळे आणि रोहिणी खडसे यांच्या आक्रमक टीकेमुळे जळगावच्या आणि राज्याच्या राजकारणात 'शेतकरी विरुद्ध उद्योजक' हा मुद्दा पुन्हा एकदा तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हेही वाचा… दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचा काही संबंध नाही; विलिनीकरणाच्या चर्चांवर शरद पवारांचे स्पष्ट उत्तर गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात रंगलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलिनीकरणाच्या चर्चांवर अखेर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)चे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. "दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याचा काही संबंध नाही," असे ठामपणे सांगत त्यांनी विलिनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. बारामती येथे मंगळवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शरद पवार यांना दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार का, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी थोडक्यात "काही संबंध नाही," असे उत्तर दिले. येथे वाचा संपूर्ण बातमी

ही बातमी व्हॉट्सॲपवर शेअर करा

💬 WhatsApp वर पाठवा