मराठी
नीट आंदोलनाच्या आडून गझवा-ए-हिंद खपवून घेणार नाही:नितेश राणेंचा सवाल- आंदोलनात औरंगजेबाचे पोस्टर आणि सर तन से जुदाच्या घोषणा का झाल्या?
✍️ ऑथर / संपादक: नातेपुते एक्सप्रेस
📅 28 July 2026, 10:29 AM
'नीट' (NEET) परीक्षेतील गैरव्यवहाराविरोधात देशभरात झालेल्या आंदोलनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, भाजप नेते आणि राज्याचे मंत्री नितेश राणे यांनी अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. "नीट आंदोलनाच्या नावाखाली काही लोक 'गजवा-ए-हिंद'चा अजेंडा राबवण्याचा प्रयत्न करत आहेत, पण आम्ही ते खपवून घेणार नाही," असा थेट इशारा राणे यांनी दिला आहे. आपल्या 'X' (पूर्वीचे ट्विटर) पोस्टवरून झालेल्या टीकेला उत्तर देताना त्यांनी हे स्पष्टीकरण दिले. 'आंदोलनात जिहादी मानसिकतेचे लोक काय करत होते?' नितेश राणे यांनी या आंदोलनाच्या मूळ स्वरूपावरच थेट सवाल उपस्थित केले आहेत. खऱ्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनात देशविघातक प्रवृत्ती घुसल्याचा दावा करत त्यांनी विचारले, "जर हे खरंच नीट विद्यार्थ्यांचे आंदोलन होते, तर तिथे 'सर तन से जुदा'च्या घोषणा का दिल्या गेल्या? आंदोलनात औरंगजेबाचे पोस्टर्स का झळकावण्यात आले? तिथे उमर खालिदचे (Umar Khalid) समर्थन करणारे लोक काय करत होते आणि जिहादी मानसिकता असलेले लोक तिथे का दिसले? या आंदोलनाचा पाकिस्तानी आणि बांगलादेशी सोशल मीडिया अकाउंट्सशी काय संबंध होता?" सरकार खऱ्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी आपली आणि सरकारची भूमिका स्पष्ट करताना नितेश राणे म्हणाले, "आम्ही सर्वजण नीट विद्यार्थ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे आधीच स्पष्ट केले आहे की, नीट परीक्षेत जे काही गैरप्रकार झाले आहेत, ते नक्कीच सुधारले जातील. केंद्र सरकार आणि केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने यावर आधीच वेगाने काम सुरू केले आहे." एकेकाला शोधून कठोर कारवाई करू खऱ्या विद्यार्थ्यांचा वापर करून देशात अशांतता पसरवण्याचा कट रचला जात असल्याचा आरोप राणे यांनी केला. "जर कोणी नीट विद्यार्थ्यांचा आणि आपल्या देशातील तरुणांचा वापर करून 'गजवा-ए-हिंद'चा अजेंडा पुढे रेटण्याचा प्रयत्न करत असेल, तर आम्ही त्यांच्यापैकी एक-एकाला अचूक शोधून काढू आणि त्यांच्यावर योग्य ती कठोर कारवाई करू," असा सज्जड दम नितेश राणे यांनी दिला आहे. महाराष्ट्र सायबरचा मोठा खुलासा: 'क्रॉस बॉर्डर' कनेक्शन उघड दरम्यान, महाराष्ट्र सायबर विभागाने 27 जुलै रोजी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात महत्त्वाची माहिती दिली आहे. अतिरिक्त पोलीस महासंचालक (महाराष्ट्र राज्य सायबर विभाग) यांच्या कार्यालयाने या आंदोलनावर विशेष तंत्रज्ञान-सहाय्यित पाळत ठेवली होती. या निगराणीत असे आढळून आले की, जनमत प्रभावित करणे, समाजात संभ्रम निर्माण करणे आणि सार्वजनिक सुव्यवस्था बिघडवणे या उद्देशाने एक संघटित जाळे काम करत होते. तांत्रिक विश्लेषणातून हे स्पष्ट झाले आहे की, भारताबाहेरून, विशेषतः पाकिस्तान आणि काही मध्य-पूर्वेतील देशांमधून समाजकंटक सक्रिय होते. ते मुद्दाम भारतीय नागरिकांना लक्ष्य करून दिशाभूल करणारी आणि खोटी माहिती पसरवत होते. 'AI' आणि 'डीपफेक'चा खतरनाक वापर केवळ खोट्या पोस्ट्स नाही, तर या समाजकंटकांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा अत्यंत गैरवापर केल्याचे समोर आले आहे. सायबर फॉरेन्सिक तपासात असे आढळले की, आंदोलनाचे व्हिडिओ मोठे दिसावेत म्हणून डिजिटल पद्धतीने गर्दी फुगवून दाखवण्यात आली. तसेच कृत्रिम आवाज (Synthetic voice), ऑडिओ क्लोनिंग आणि प्रसिद्ध व्यक्तींच्या नावे खोटे व्हिडिओ (Deepfake) तयार करून ते व्हायरल करण्यात आले. सायबर पोलिसांची धडक कारवाई आणि आकडेवारी महाराष्ट्र सायबरने तत्काळ पावले उचलत या फेक अकाऊंट्सविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. इन्स्टाग्राम, एक्स (X), फेसबुक आणि यूट्यूब यांसारख्या प्लॅटफॉर्म्सवरील 429 आक्षेपार्ह पोस्ट्स आणि हँडल्स शोधून काढण्यात आली आहेत. यापैकी सुमारे 100 खाती थेट भारताबाहेरून चालवली जात होती. 140 हून अधिक प्रोफाइल्स आणि पोस्ट्समध्ये 'एआय' (AI) निर्मित खोटा मजकूर असल्याचे अत्याधुनिक ऑडिओ-व्हिडिओ फॉरेन्सिक तपासणीत सिद्ध झाले आहे. हा सर्व आक्षेपार्ह मजकूर संबंधित सोशल मीडिया कंपन्यांमार्फत हटवण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे.