मराठी
सरकारने आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत:तरुणांना त्रास दिला तर सोडणार नाही, MHT-CET प्रकरणी मुख्यमंत्री गप्प का? आदित्य ठाकरेंचा सवाल
✍️ ऑथर / संपादक: नातेपुते एक्सप्रेस
📅 28 July 2026, 07:41 AM
गेल्या 10 ते 12 दिवसांमध्ये एका आंदोलनाने देशाला जागृत केले आहे. या आंदोलनात सहभागी असणाऱ्या तरुणांवर सरकारने गुन्हे दाखल केले आहेत, काही जणांना नोटीस पाठवल्या आहेत. त्या नोटीस आणि गुन्हे मागे घेणार असे वचन सरकारने अभिजीत दिपके यांना दिले आहे ते सरकार पाळणार आहे का? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला आहे. जर सरकारने ते वचन पाळले नाही तर ज्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत आणि नोटीस आल्या आहेत अशा तरुणांनी शिवसेनेसोबत संपर्क साधावा आम्ही त्यांचे हे खटले विनामुल्य लढू असे आदित्य ठाकरेंनी म्हटले आहे. आदित्य ठाकरे म्हणाले की, सरकारविरोधात बोलणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. जगभरात कुठेही विद्यार्थ्यांनी आंदोलन केले म्हणून त्यांच्यावर अशा प्रकारे अमानुष लाठीचार्ज करण्यात आलेला नाही. तरुण मुलांना त्रास देणार असाल, तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही. मुख्यमंत्र्यांना इतक्या तरुणांचे आयुष्य उद्ध्वस्त करायचे आहे का?असा संतप्त सवाल ही त्यांनी केला आहे. भाजपकडून सोशल मीडियाचा गैरवापर आदित्य ठाकरे म्हणाले की, विरोधकांची बदनामी करण्यासाठी सर्वात आधी भाजपच्याच लोकांनी सोशल मीडियाचा गैरवापर सुरू केला होता. आता तीच गोष्ट त्यांच्यावर उलटली आहे, तर त्यांना त्रास होत आहे. जर कोणी सत्य मांडत असेल किंवा जशास तसे उत्तर देत असेल, तर त्यात काय वावगे आहे. भाजपचे हे सरकार पूर्णपणे विद्यार्थी आणि तरुणविरोधी आहे, हे आता जनतेला स्पष्टपणे समजले आहे. हुकूमशहांना घाबरण्याची गरज नाही आदित्य ठाकरे म्हणाले की, MHT-CET पेपरफुटी प्रकरणात एवढा गदारोळ होऊनही मुख्यमंत्री यावर एक शब्दही बोलायला तयार नाहीत, असा आरोप ठाकरेंनी केला. विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करण्याचे अधिकार कोणालाही देण्यात आलेले नाहीत. सरकार तरुणांना घाबरत आहे का? म्हणूनच विद्यार्थ्यांचे रील्स डिलीट करायला लावले जात आहेत. परंतु या हुकूमशहांना घाबरण्याची गरज नाही. आंदोलक विद्यार्थ्यांचे खटले विनामूल्य लढणार आदित्य ठाकरे म्हणाले की, देशातील तरुणांनी एकत्र येऊन आंदोलन छेडल्यामुळेच शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला. अभिजित दीपके यांनी दिल्लीत सरकारशी चर्चा करताना विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे घेण्याचे वचन घेतले होते. तरीही अनेक तरुणांवर एफआयआर दाखल करण्यात आले असून त्यांना नोटिसा पाठवल्या जात आहेत. ज्या ज्या विद्यार्थ्यांना या आंदोलनासंदर्भात नोटीस आली आहे किंवा ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत, त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा; आम्ही त्यांचे सर्व खटले पूर्णपणे विनामूल्य लढू. सरकारला म्हात्रेच्या जामीनाची काळजी आदित्य ठाकरे म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी आजच्या आज विद्यार्थ्यांवरील सर्व नोटिसा आणि एफआयआर रद्द करावेत. तरुणांना न्याय मिळवण्यासाठी मोठे आंदोलन करावे लागले. या आंदोलनादरम्यान काठ्यांना खिळे ठोकून विद्यार्थ्यांवर अमानुष लाठीचार्ज करण्यात आला, अश्रूधूर सोडण्यात आला. सरकारला तरुणांच्या भविष्याची काळजी नाही, उलट कल्याण-डोंबिवलीमध्ये डॉक्टरांवर हल्ला करणाऱ्या रमेश म्हात्रेला जामीन कसा मिळेल, यासाठीच सरकारची संपूर्ण यंत्रणा राबत आहे, असा घणाघाती आरोप त्यांनी केला. मुख्यमंत्र्यांनी प्रवेश प्रक्रियेबाबत भूमिका स्पष्ट करावी आदित्य ठाकरे म्हणाले की, MH-CET परीक्षेत मोठा घोटाळा झाला आहे की नाही, या अत्यंत गंभीर विषयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूर्णपणे मौन बाळगले असून कोणतेही भाष्य केलेले नाही. या संपूर्ण प्रकरणाचे धागेदोर निगडीत आहेत. नांदेडमधील एकाच घरातील भाऊ-बहिणीचे इयत्ता 12 वीचे गुण आणि त्यानंतर त्यांना सीईटी परीक्षेत मिळालेले गुण यांची तुलना करून पाहा. असाच संशयास्पद प्रकार भंडाऱ्यातही समोर आला आहे. उद्यापासून अभियांत्रिकी व इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू होत आहे. मात्र, सीईटी परीक्षेवरच एवढे गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. या सर्व वादानंतर सरकार प्रवेश प्रक्रियेला स्थगिती देणार आहे की हीच प्रक्रिया पुढे सुरू ठेवणार? याबाबत विद्यार्थी आणि पालकांमध्ये मोठा भ्रम पसरला आहे. सरकारने तातडीने प्रवेश प्रक्रियेबाबत निर्णय जाहीर करून विद्यार्थ्यांमधील ही अनिश्चितता दूर करावी.