भरधाव ट्रकच्या धडकेत बिबट्याचा झाला मृत्यू:अमरावती ते चांदूर रेल्वे मार्गावरील घटना
Category: Maharashtra |
04 Oct 2025
रस्ता ओलांडणाऱ्या बिबट्याला भरधाव ट्रकने धडक दिली. यात बिबटचा जागीच मृत्यु झाल्याची घटना राज्य राखीव पोलिस दल वसाहतीसमोर शुक्रवारी ३ ऑक्टोबरला रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली. मृत्यू झालेला बिबट अंदाजे सात ते आठ वर्षांचा नर होता. अमरावती ते चांदूर रेल्वे मार्गावरील वडाळीलगत राज्य राखीव पोलिस दल वसाहतीसमोरील रस्त्यावरून शुक्रवारी रात्री साडेसात ते आठ वाजताच्या सुमारास एक बिबट रस्ता ओलांडत होता. याचवेळी या मार्गावरून भरधाव जाणाऱ्या ट्रकने बिबट्याला धडक दिली. यात बिबट्याचा जागीच मृत्यु झाला. या वेळी या मार्गावरून जाणाऱ्या वाहन चालकांनी घटनास्थळी थांबून पाहिले असता त्यांना बिबट मृत अवस्थेत आढळला. घटनेची माहिती वनविभाग व फ्रेजरपुरा पोलिसांना दिली. पोलिस व वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. बिबट्याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी वडाळी येथील वनविभागाच्या परिसरात नेला. दरम्यान, पोहरा जंगलात बिबट्याचा वावर असून, बिबट अनेकदा चांदूर रेल्वे मार्ग ओलांडत असतात. यापूर्वी देखील एका बिबट्याचा मृत्यु झाल्याची घटना घडली होती.