तणाव:हल्ला झाल्यास अण्वस्त्रांसाठी युरेनियमची क्षमता वाढवणार, इराणचा अमेरिकेला इशारा
तणाव:हल्ला झाल्यास अण्वस्त्रांसाठी युरेनियमची क्षमता वाढवणार, इराणचा अमेरिकेला इशारा
जर अमेरिका किंवा इस्रायलने पुन्हा हल्ला केला, तर युरेनियम संवर्धनाची (एनरिचमेंट) पातळी ९० टक्क्यांपर्यंत नेली जाईल, असा इशारा इराणने दिला आहे. ९०%शुद्धतेचे युरेनियम हे अण्वस्त्र बनवण्यासाठी वापरले जाते. अण्वस्त्र चर्चेसंदर्भात सध्या कोंडी निर्माण झाली असून वॉशिंग्टनमध्ये इराणच्या अणू कार्यक्रमाविरोधात लष्करी पर्यायांवर चर्चा सुरू असल्याच्या बातम्यांदरम्यान हे विधान समोर आले. इराणच्या संसदेतील एका आयोगाचे प्रवक्ते इब्राहिम रेजाई यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर लिहिले की, जर पुन्हा शत्रुत्व सुरू झाले, तर युरेनियमची क्षमता वाढवणे हादेखील आमच्या समोरील एक पर्याय असेल.आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेनुसार, इराणकडे सध्या सुमारे ४४०.९ किलोग्रॅम युरेनियम असे आहे, ज्याची शुद्धता ६०% संवर्धित आहे. इराणने हल्ल्यासाठी पाठवले पथक : कुवेत दुबई | इराणने सशस्त्र पॅरामिलिटरी रिव्होल्युशनरी गार्डचे एक पथक बुबियान बेटावर हल्ला करण्यासाठी पाठवले, असा आरोप कुवेतने मंगळवारी केला. याच बेटावर चीनच्या मदतीने मुबारक अल कबीर पोर्ट प्रकल्प उभारला जात आहे. कुवेतच्या माहितीनुसार, रिव्होल्युशनरी गार्डचे ६ सशस्त्र सदस्य बेटावर घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होते. यापैकी ४ जणांना ताब्यात घेतले आहे. गौप्यस्फोट : इराणवरील हल्ल्यात यूएईचा सहभाग पश्चिम आशियातील संघर्षादरम्यान संयुक्त अरब अमिरातीनेही इराणवर हल्ले केले होते. अमेरिकन वृत्तपत्र वॉल स्ट्रीट जर्नलनुसार, एप्रिलमध्ये इराणच्या लावन बेटावरील तेल प्रकल्पावर हल्ला केला होता, ज्यामुळे तिथे मोठी आग लागली होती. याला प्रत्युत्तर म्हणून इराणने संयुक्त अरब अमिराती आणि कुवेतवर क्षेपणास्त्र आणि ड्रोनद्वारे हल्ले केले. मात्र, यूएईने अधिकृतपणे या लष्करी कारवाईची कबुली दिलेली नाही.