पहाटेच्या अजानचा भोंगा बंद:दिवसाही 55 डेसिबलची अट, कोर्टाच्या आदेशाची कडक अंमलबजावणी

सर्वोच्च न्यायालयाने भोंग्यांबाबत दिलेल्या आदेशाची राज्यात कटाक्षाने अंमलबजावणी केली जाणार आहे. सर्व प्रार्थनास्थळांवर भोंगे वाजवण्यासाठी परवानगी घेणे आवश्यक आहे. तसेच रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत भोंगे कटाक्षाने बंद ठेवले पाहिजेत, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत दिली. तसेच ध्वनी प्रदूषण प्रतिबंध नियमाप्रमाणे दिवसा ५५ आणि रात्री दहा वाजेपर्यंत ४५ डेसिबल आवाजाची मर्यादा आहे. या नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांचे भोंगे जप्त करण्यात येतील. ध्वनी प्रदूषणाची तक्रार प्राप्त झाल्यास तत्काळ कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. सरकारच्या या काटेकोर नियमामुळे मशिदींमधून पहाटे ५ च्या सुमारास होणारी अजान भोंग्यावर करता येणार नाही. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी काही महिन्यांपूर्वी याबाबतची मागणी केली होती. त्यानंतर भाजप आमदार देवयानी फरांदे व इतर सदस्यांनी मंगळवारी विधानसभेत लक्षवेधीद्वारे हा प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना फडणवीस यांनी कोर्टाच्या आदेशानुसार कडक कारवाई केली जाणार असल्याचे सांगितले. हायकोर्टाने बजावले होते… लाऊडस्पीकरचा उपयोग कोणत्याही धर्मासाठी आवश्यक नाही ध्वनी प्रदूषणाच्या याचिकेवर २३ जानेवारी २०२५ रोजी सुनावणी देताना मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती ए.एस. गडकरी व एस.सी. चंदक यांनी लाऊडस्पीकरचा उपयोग करणे कोणत्याच धर्मासाठी आवश्यक नसल्याचे परखड मत व्यक्त केले होते. तसेच ध्वनी प्रदूषण करणाऱ्या भोंग्यांवर लवकरात लवकर कारवाई करण्याचे निर्देशही पोलिस ठाण्यांना व सरकारला दिले होते. नियम काय सांगतो… पर्यावरण (संरक्षण) कायदा १९८६ व ध्वनी प्रदूषण (विनियम व नियंत्रण) अधिनियम २००० अन्वये काही नियम ठरवून दिले आहेत. त्यानुसार रात्री १० ते सकाळी ६ पर्यंत भोंगा बंद असेल. सकाळी ६ नंतर व रात्री १० वाजेपर्यंत ४५ ते ५५ डेसिबल इतक्या मर्यादेतच भोंगे वाजवता येतील. त्याचे उल्लंघन केल्यास कारवाई करण्याची कायद्यात तरतूद आहे. महाविकास आघाडीचे सरकार असताना राज ठाकरेंनी दिला हाेता २०२२ मध्ये आंदोलनाचा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मे २०२२ मध्ये मशिदीवरील भोंग्यांमुळे होणाऱ्या त्रासाचा मुद्दा उपस्थित करून ते बंद करण्याचा इशारा तत्कालीन उद्धव ठाकरे सरकारला दिला हाेता. जर हे भोंगे बंद झाले नाही तर आम्हीसुद्धा भोंग्यावर हनुमान चालिसा वाजवू, असा इशाराही त्यांनी दिला हेाता. त्यांच्या या आंदोलनाला तेव्हा भाजपनेही साथ दिली होती. जबाबदारी कुणाची? एखाद्या भागात भोंग्याद्वारे ध्वनी प्रदूषण होत असल्याची तक्रार कुणी केली, मात्र तरीही दखल घेण्यात आली नाही तर त्याला संबंधित पोलिस निरीक्षक जबाबदार असेल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. कारवाईचे अधिकार कुणाला? भोंग्यांची परवानगी, नियमांच्या पालनाबाबत तपासणी करण्याची जबाबदारी पोलिस स्टेशनच्या निरीक्षकांवर राहील. कुठे नियमाचे उल्लंघन केले जात असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी तक्रार अर्ज पाहणी अहवालासह प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे पाठवणे गरजेचे आहे. यानंतर मंडळाकडून खटला दाखल केला जाईल. तक्रार करणाऱ्याचे नाव उघड करू नका कुर्ला येथील दोन गृहनिर्माण संस्थांनी मशिदीवरील भोंग्याविरुद्ध पोलिस कारवाई करत नसल्याबद्दलची तक्रार एका याचिकेद्वारे दाखल केली होती. त्यावर तातडीने कारवाई करण्याचे आदेश देतानाच न्यायालयाने अशी तक्रार करणाऱ्यांची ओळख उघड न करण्याची खबरदारीही घ्यावी, असेही पोलिसांना बजावले होते.

Share

-