
उद्धव ठाकरे म्हणजे UT अर्थात 'युज अँड थ्रो':ठाकरेंच्या 'एसंशिं' टीकेला एकनाथ शिंदेंचे प्रत्युत्तर; वक्फ विधेयकावर गोंधळल्याची टीका
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी वक्फ सुधारणा विधेयकावरून उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे कालचे कृत्य बाळासाहेबांचे विचार अजूनही ज्यांच्या मनात आहेत, त्यांना मान खाली घालायला लावण्यासारखे होते. काय बोलायचे? काय निर्णय घ्यायचा? व काय करायचे? हे सूचत नसलेले उबाठा नेतृत्व या निमित्ताने महाराष्ट्राला दिसले, असे ते म्हणाले. उद्धव ठाकरे म्हणजे UT अर्थात 'यूझ अँड थ्रो', असा पलटवारही त्यांनी यावेळी ठाकरेंच्या 'एसंशिं' टीकेला प्रत्युत्तर देताना केला. लोकसभेने बुधवारी मध्यरात्री 2 वा. वक्फ सुधारणा विधेयकावर आपली मोहोर उमटवली. यावेळी झालेल्या मतदानात ठाकरे गटाने या विधेयकाविरोधात भूमिका घेतली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी एका पत्रकार परिषदेद्वारे आपली भूमिका स्पष्ट केली. त्यात त्यांनी केंद्राने वक्फ विधेयक जमिनींवर डोळा ठेवून आणल्याचा आरोप केला. त्यांच्या या टीकेवर बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे यांचे विचार अजूनही ज्यांच्या मनात आहेत त्यांना मान खाली घालवण्यासारखे कृत्य काल झाले. त्यांच्या लोकप्रतिनिधींनीही खंत व्यक्त केली. उद्धव ठाकरे पुरते गोंधळलेत कालचा दिवस हा खऱ्या अर्थाने उबाठासाठी अत्यंत दुर्दैवी होता. त्यांनी वक्फ बोर्ड बिल व हिंदुत्वाचा काही संबंध नसल्याचा दावा केला. आमचा वक्फ बिलाला नव्हे तर भाजपच्या ढोंगीपणाला विरोध असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे ते अतिशय गोंधळलेल्या स्थितीत सापडल्याचे स्पष्ट होते. काय बोलायचे, काय निर्णय घ्यायचा, काय करायचे हे सूचत नसलेले उबाठा नेतृत्व काल दिसले. उद्धव ठाकरेंची स्थिती धरले की चावतंय आणि सोडलं की पळतंय अशी झाली आहे. बाळासाहेबांचा राष्ट्रभक्त मुस्लिमांना पाठिंबा होता. तीच भूमिका शिवसेनेची आहे. हीच भूमिका भाजप व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही आहे. जो मुस्लिम देशभक्त व राष्ट्रभक्त आहे, ज्याचे या देशावर प्रेम आहे, त्याला आमचा पाठिंबा आहे. पण देशविरोधी कृत्य करणाऱ्यांना, मग ते कुणीही असले तरी आमचा त्यांना विरोध आहे. ही भूमिका घेऊन बाळासाहेब अखंडपणे घेऊन चालले. तीच भूमिका या वक्फ बोर्डाच्या माध्यमातून भाजपने दाखवली. राहुल गांधींच्या सावलीमुळे ठाकरेंना जिनांची आठवण परंतु, सातत्याने राहुल गांधी यांची सावली मिळाल्यामुळे, त्यांच्या सोबत राहिल्यामुळे उबाठाला सातत्याने व वारंवार मोहम्मद अली जिना यांची आठवण येत आहे. हे दुर्दैव आहे. त्यामुळे मी आपल्याला एवढेच सांगतो की, आता त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. काय करायचे हे त्यांना सुधरत नाही. काय निर्णय घ्यायचे ते समजत नाही. त्यातून त्यांच्यावर आज आपल्या निर्णयाचे समर्थन करण्यासाठी पत्रकार परिषद घेण्याची वेळ आली. त्यातून त्यांनी स्वतःचीच अब्रू काढून घेतली, असे शिंदे म्हणाले. एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, वक्फ बोर्डामुळे काही मूठभर लोकांच्या हातात लाखो, कोट्यवधी एकर जमीन अडकली होती. नव्या विधेयकामुळे त्याला चाप बसेल. काँग्रेसच्या काळात वक्फ बोर्डाच्या 123 जागा डिनोटीफाईड करण्यात आल्या होत्या. त्या काही निवडक लोकांच्या घशात घातल्या गेल्या. आता असे कोणतेही कृत्य करता येणार नाही. पंतप्रधान मोदींच्या वक्फ बोर्डाच्या विधेयकामु्ळे अशा लोकांना चाप बसेल. वक्फच्या प्रॉपर्टीवर शाळा, हॉस्पिटल आदी सुविधा तयार होतील. महिला, मुलांना मुख्य प्रवाहात येण्याची संधी मिळेल. त्यामुळे मुस्लिमांनीही त्याचे स्वागत केले आहे. उद्धव ठाकरे यांनी भाजपवर या विधेयकावर मुस्लिमांचे लांगुलचालन केल्याचा आरोप केला. एकीकडे ते भाजपवर मुस्लिमांच्या बाजूने बोलण्याचा आरोप करतात, दुसरीकडे त्यांचे लांगुलचालन करण्याचाही आरोप करतात. त्यांना नेमके काय म्हणायचे आहे? एखादे नेतृत्व गोंधळलेल्या स्थितीत सापडले असेल तर त्या पक्षाचा इतिहास संपुष्टात येतो. त्यामुळे त्यांच्यावर ओढावलेली परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्र पाहत आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले. यूटी अर्थात युज अँड थ्रो उद्धव ठाकरे गत काही दिवसांपासून एकनाथ शिंदे यांचा उल्लेख 'एसंशिं' असा करत आहेत. पत्रकारांनी याविषयी शिंदे यांना छेडले असता त्यांनी उद्धव ठाकरे यांचा उल्लेख यूटी अर्थात युज अँड थ्रो असा केला. वापरो और फेको ही त्यांची नीती आहे. मला बोलायला लावू नका. माझ्याकडे भरपूर काही आहे. मी शांत आहे. मला शांतपणे काम करू द्या. तुम्ही माझी गद्दार व खोके - खोके म्हणून हेटाळणी केली. अरे तुम्हाला महाराष्ट्रातील जनतेने खोक्यामध्ये बंद करू टाकले. 100 मधून वीसच आले, ते ही आमच्या लोकांच्या काही चुका झाल्यामुळे... आम्ही 80 लढवल्या आणि 60 जागा जिंकल्या. महाराष्ट्रातील जनतेने विधानसभा निवडणुकीत गद्दार कोण व खुद्दार कोण हे स्पष्ट केले, असेही एकनाथ शिंदे यावेळी बोलताना म्हणाले.