
अरे कहना क्या चाहते हो?:भाजपचा उद्धव ठाकरे यांना सवाल; ठाकरेंचे ‘संजयराऊताप्नोटिझम’ पूर्ण, ते संभ्रमात सापडल्याचा खोचक टोला
वक्फ सुधारणा विधेयकावरून भाजपवर टीका करणाऱ्या उद्धव ठाकरेंची अवस्था 'करे तो करे क्या' सारखी झाल्याचा खोचक टोला गुरुवारी भाजप प्रदेशाध्यक्ष तथा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हाणला. उद्धव ठाकरे यांनी वक्फ सुधारणा विधेयकावर आपली भूमिका मांडली हे बरेच झाले. त्यातून ते आम्हाला किती संभ्रमात, एकाकी व खचलेल्या मनस्थितीत आहेत हे कळले, असे ते म्हणालेत. लोकसभेने बुधवारी मध्यरात्री 2 वा. वक्फ सुधारणा विधेयकावर आपली मोहोर उमटवली. उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणी गुरुवारी एका पत्रकार परिषदेद्वारे आपली भूमिका स्पष्ट केली. त्यात त्यांनी केंद्राने वक्फ विधेयक जमिनींवर डोळा ठेवून आणल्याचा आरोप केला. त्यांच्या या टीकेला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिले. ठाकरेंचे ‘संजयराऊताप्नोटिझम’ पूर्ण चंद्रशेखर बावनकुळे या प्रकरणी म्हणाले की, अरे कहना क्या चाहते हो? उद्धव ठाकरे यांनी पत्रपरिषद घेऊन भूमिका मांडली याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. निदान ते किती संभ्रमात, एकाकी आणि खचलेल्या मनस्थितीत आहेत, याचे प्रदर्शन आम्हाला पाहायला मिळाले. संजय राऊत यांचा उद्देश साध्य झालेला आहे. तुमचे ‘संजयराऊताप्नोटिझम’ आता पूर्ण झाले आहे. एकीकडे त्यांना साधी भूमिका घेता येत नाही आणि दुसरीकडे लांगूलचालनही सोडता येत नाही. करे तो करे क्या, अशी त्यांची अवस्था झाली आहे. अरे कहना क्या चाहते हो? असा उच्चार तुम्ही केलात, पण नेमका हाच प्रश्न महाराष्ट्राला, ही पत्रपरिषद ऐकल्यावर तुमच्या बाबतीत पडला आहे, असे ते म्हणाले. आता पाहू काय म्हणाले होते उद्धव ठाकरे? तत्पूर्वी उद्धव ठाकरे यांनी एका पत्रकार परिषदेद्वारे हिंदुत्व व वक्फ सुधारणा विधेयकाचा कोणताही संबंध नसल्याचा दावा केला होता तसेच पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिना यांनी जे केले नाही ते भाजपने केल्याचा आरोपही त्यांनी केला होता. ते म्हणाले होते, फटक्याची वात लावायची आणि पळून जायचे हे भाजपचे धोरण आहे. फटाका फुटल्यावर ते आम्हीच वात लावल्याचे मिरवत सांगतात. पण वाट लावली त्याची जबाबदारी कोण घेणार? वाट लागल्यानंतर आपण यायचे या वृत्तीला आम्ही विरोध केला आहे. जमिनी बळकावून व्यापारी मित्रांना जे देणार आहेत त्यालाही आम्ही विरोध केला आहे. भाजपच्या लोकांनी मोहम्मद अली जिना यांनाही लाज वाटेल अशी भाषणे केली. जे जिनांनी केले नाही ते भाजपचे नेते व त्यांच्या सहकारी पक्षांनी करून दाखवले. ते आमच्यावर हिंदुत्व सोडण्याचा आरोप करतात. पण काल त्यांनी काय सोडले होते? जे तुम्ही करत होतात ते लांगुलचालनच होते. तुम्हाला आता समोर निवडणूक दिसत आहे. फोडा व राज्य करा ही भाजपची नीती आहे. वक्फ सुधारणा विधेयकाचा हिंदुत्वाशी काय संबंध? हे मला सांगा, असे ते म्हणाले. हे ही वाचा... मोहम्मद अली जिना यांना जे जमले नाही, ते भाजपने केले:वक्फ विधेयक मुस्लिमांच्या हिताचे, तर भाजपने हिंदुत्व सोडले का? -ठाकरे मुंबई - मोहम्मद अली जिना यांना जे जमले नाही, ते भाजपने करून दाखवले, अशा जहाल शब्दांत गुरुवारी उद्धव ठाकरे यांनी वक्फ सुधारणा विधेयकाबद्दल मोदी सरकारवर टीका केली. वक्फ विधेयक मुस्लिमांच्या हिताचे असेल, तर तुम्ही हिंदुत्व सोडले का, सवालही त्यांनी केला. पत्रकार परिषद घेऊन त्यांनी आपली भूमिका सविस्तर मांडली. उद्धव ठाकरे म्हणाले की, आम्ही बिलाला विरोध केला नाही तर भाजपच्या ढोंगाला आणि भ्रष्टाचाराला विरोध केला. वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाचे आणि हिंदुत्वाचे काय देणे घेणे? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. तुम्ही मुसलमानांचे लांगुलचलन करत असाल तर हिंदूंनी काय केले? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला. वाचा सविस्तर