
महार रेजिमेंटच्या मुख्यालयात डॉ. आंबेडकरांचा पुतळा उभारण्याची मागणी:45 वर्षांपासून प्रलंबित मागणीसाठी भीम जयंतीला पंतप्रधानांना विनंतीपत्र पाठवणार
मध्य प्रदेशातील सागर येथे असलेल्या महार रेजिमेंटच्या मुख्यालयात घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा, अशी मागणी यश सिद्धी आजी-माजी सैनिक बहुउद्देशीय वेल्फेअर असोसिएशनच्या बैठकीत करण्यात आली. मागील 45 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या मागणीचा पाठपुरावा करण्यासाठी भीम जयंती अर्थात 14 एप्रिल रोजी राज्यभरातील कार्यकर्ते आणि नागरिकांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावे विनंतीपत्र पाठवण्याचे अभियान राबवण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे या मागणीबाबत जनजागृती करण्यासाठी राज्यभरात विविध ठिकाणी पत्रकार परिषदेचे आयोजन केले जाणार आहे. तसेच या मागणीसाठी संसदेच्या पावसाळी अधिवेशन संसद भवनबाहेर आंदोलन किंवा दिल्ली येथे परिषदेचे आयोजन करण्यात येईल, अशी माहिती रिपब्लिकन युवा मोर्चाचे राहुल डंबाळे यांनी या बैठकीत दिली. यावेळी लेफ्टनंट आनंद वाघमारे, सुभेदार मेजर सुभाष कंकाळ, सुभेदार मेजर पोपट आल्हाट, असोसिएशनच्या महाराष्ट्र शाखेचे कोषाध्यक्ष शामराव भोसले सुभेदार मोहन यादव, पुणे शाखाध्यक्ष सुभेदार संतोष वानखेडे, लुकस केदारी , राहुल नागटिळक , किरण सोनावणे , राम डंबाळे , किरण कदम यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. आंबेडकरी चळवळीत कार्यरत असलेल्या उपस्थित कार्यकर्त्यांनी असोसिएशनच्या या मागणीसाठी सक्रिय पाठिंबा या बैठकीत व्यक्त केला. कॅप्टन बाबू पोळके यांचे अध्यक्षीय भाषण झाले तर बुद्ध चव्हाण यांनी महार रेजिमेंटचा इतिहास कथन करून रेजिमेंटच्या मुख्यालयात डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याची आवश्यकता प्रभावीपणे कथन केली. किरण सोनवणे यांनी उपस्थितांचे आभार मानले. यानंतर बैठकीचे अध्यक्ष कॅप्टन बाबू पोळके, राहुल डंबाळे, लेफ्टनंट आनंद वाघमारे यांच्या हस्ते आंबेडकर स्मारक येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात आली.