
अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण:बारा वर्षीय मुलीला लग्नाचे आमिष दाखवून शेजारच्या विद्यार्थ्याने घेतला गैरफायदा
नागपूर येथे एका अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. जरीपटका परिसरातील ही घटना आहे. आरोपी अमित सुखदेव इंगळे (वय 20) हा बी.ए. प्रथम वर्षाचा विद्यार्थी आहे. पीडित मुलगी 12 वर्षांची असून सहावीत शिकते. तिचे आई-वडील वेगळे राहतात. आई दुसरे लग्न करून वेगळ्या घरात राहते, तर वडिलांनीही दुसऱ्या महिलेसोबत संसार थाटला आहे. मुलगी आईसोबत राहते आणि कधीकधी वडिलांकडे भेटायला जाते. शेजारी राहणाऱ्या आरोपीने मुलीशी मैत्री केली. तिच्या अल्पवयीन असण्याचा फायदा घेत तिला प्रेमजाळ्यात ओढले. मुलीची आई कामावर असताना तो तिच्या घरी येत असे. लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. सहा महिने हे कृत्य सुरू होते. घटना उघडकीस तेव्हा आली जेव्हा मुलगी वडिलांकडे मुक्कामी आली होती. तिला मोबाईलवर चोरून बोलताना वडिलांनी पाहिले. विचारपूस केल्यावर तिने सर्व घटना सांगितली. वडिलांनी लगेच जरीपटका पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.