News Image

अर्जुन खोतकर यांनी हात लावला तिथे माती केली:त्यांच्या विरुद्ध मोठा लढा उभारण्याची वेळ आली आहे, अंजली दमानिया यांचा जालन्यातून हल्लाबोल


सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया या बुधवारी जालन्याच्या दौऱ्यावर होत्या. यावेळी त्यांनी जालन्यातील साखर रामनगर सहकारी साखर कारखाना सभासद कामगार शेतकऱ्यांशी संवाद साधला. यानंतर अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेना शिंदे गटाचे नेते अर्जुन खोतकर यांच्यावर हल्लाबोल केला आहे. आताचे राजकारणी बोट लावतील तिथे माती करतात, असे म्हणत अंजली दमानिया यांनी अर्जुन खोतकर यांच्यावर निशाणा साधला आहे. पत्रकार परिषदेत बोलताना अंजली दमानिया म्हणाल्या, एक काळ होता सर्व राजकारणी बहुतांश राजकारणी सिद्धांतवादी होते, आताचे बहुतांश राजकारणी बोट लावतील तिथे माती करतात. त्यातीलच एक अर्जुनराव खोतकर, त्यांनी जिथे जिथे हात लावला तिथे त्यांनी माती केली. सहकारी साखर कारखाना, जालन्याची कृषी उत्पन्न बाजार समिती असो खरेदी विक्री केंद्र असो या प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे त्यांनी हात लावला तिथे तिथे त्यांनी माती केली. अर्जुन खोतकर यांच्या विरुद्ध मोठा लढा उभारण्याची वेळ अंजली दमानिया पुढे म्हणाल्या, अर्जुन खोतकर यांच्या विरुद्ध मोठा लढा उभारण्याची वेळ आली आहे. शेतकऱ्यांसाठी, कामगारांसाठी लढा उभारण्याची गरज आहे. कामगारांची देणी आतापर्यंत 2012 पर्यंत 108 कोटी होती ती मिळाली नाहीत. प्रॉविडंट फंड मिळालेले नाहीत. कारखाना विकत घेताना कामगारांचे शेतकऱ्यांचे देणे द्यावे लागते मात्र तसे न करता कारखाना त्यांना कवडी मोलात मिळालेला आहे. एक दादा म्हणाले त्या साखर कारखान्यावर दरोडा घालण्याचे काम अर्जुन खोतकर यांनी केले आहे. या विरुद्ध अतिशय तीव्र लढा उभा करण्याचे ठरवले आहे. याची सुरुवात एप्रिलच्या शेवटपासून करणार आहोत. पुढे बोलताना अंजली दमानिया म्हणाल्या, शेतकऱ्यांना यात न्याय मिळाला नाही. साखर कारखाना कवडी मोलाने विकत घेतला. कामगारांना न्याय मिळाला नाही आणि हावरटपणाचा कहर म्हणजे सरळ जाणारी जालना नांदेड समृद्धी महामार्गाची लाइन सुद्धा त्यांनी वाकडी करून बदलण्यात आली. 10 साखर कारखान्याची 18 एकर जमीन देऊन 70 कोटींचा मोबदला त्यांना घशात घालायचा होता, असा आरोप अंजली दमानिया यांनी अर्जुन खोतकर यांच्यावर केला आहे. शेतकऱ्यांना घेऊन थेट मंत्रालय गाठणार - अंजली दमानिया अंजली दमानिया म्हणाल्या, या सर्व शेतकऱ्यांना घेऊन मुंबईला जाऊन थेट मंत्रालायात जात मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहोत. आझाद मैदानावर सडत पडणार नाही. हे आंदोलन असे तसे नाही. उपोषण करू नये. यापुढे वेगळ्या पद्धतीने जनजागृतीने आंदोलन करायचे, वेगळा लढा द्यायचा ठरवले आहे. यासाठी आम्ही उपोषण करणार नाही. पूर्वी लोकांना भावना होत्या आताच्या लोकांना काहीही उरलेले नाही. आपण भिंतीवर डोके आपटून प्राण दिला तरी यांच्या पोटातील पाणी हलत नाही. त्यामुळे यापुढे कोणीही उपोषण करू नये, असे आवाहन अंजली दमानिया यांनी केले आहे. पुढे बोलताना अंजली दमानिया म्हणाल्या, ईडीची कारवाई भाजप हवी तशी न करता व्यवस्थित करुन न्याय झाला पाहिजे, यासाठी त्यांच्या पिटीशनमध्ये इंटरवेन्शन फाईल करणार आहे. मुख्यमंत्र्यांना भेटून, त्यांना सांगून, उपमुख्यमंत्री शिंदे यांना भेटणार आहे. वाकडी तिकडी केलेली लाईन रद्द करायला भाग पाडणार आहोत. एप्रिल महिन्याच्या शेवटापासून लढा तीव्र करण्याचे ठरवले आहे.