
रोजगार हमी योजनेच्या पेटीचे दाखवले आमिष:वृध्द महिलेच्या अंगावरील दागिने पळवले, हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
रोजगार हमी योजनेची पेटी देण्याचे अमिष दाखवून भामट्याने एका वृध्द महिलेच्या अंगावरील सोन्या-चांदीचे दागिने पळविल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुरुवारी ता. ३ गुन्हा दाखल झाला आहे. शहर पोलिसांच्या डीबी पथकाने भामट्याचा शोध सुरु केला आहे. हिंगोली तालुक्यातील कनेरगाव नाका येथील विमल विसावे (६५) ह्या हिंगोली येथील शासकिय रुग्णालयात औषधोपचारासाठी आल्या होत्या. रुग्णालयाच्या परिसरात त्या एकट्याच फिरत असल्याचे दिसताच एक भामट्या त्यांच्या जवळ गेला. यावेळी त्याने विमलबाई यांच्या तब्येतीची विचारपूस केली. त्यानंतर तुम्हाला रोजगार हमी योजनेची पेटी मिळाली का अशी विचारणा केली. यावेळी त्यांनी पेटी मिळाली नसल्याचे सांगितल्यानंतर त्याने विमलबाई यांना पेटी मिळवून देतो त्यात भांडे व इतर साहित्य असल्याचे सांगितले. यावेळी त्याने तुम्हाला गरीब दिसावे लागेल अशी अट असून तुमच्या अंगावरील दागिने काढून माझ्याकडे द्या असे सांगितले. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेऊन विमलबाई यांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याचे सात ग्राम वजनाचे सेव्हनपीस तसेच चांदीचे तीस तोळे वजनाचे दंडकडे असा सुमारे ७५ हजार रुपयांचा ऐवज काढून भामट्याकडे दिला. त्यांच्या जवळील दागिने घेतल्यानंतर भामट्याने काही वेळातच पळ काढला. दरम्यान, आपली फसवणुक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी सदर प्रकार त्यांच्या कुटुंबियांना कळविला. त्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी हिंगोली शहर पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. यावरून पोलिसांनी एका भामट्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक नरेंद्र पाडळकर यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकातील जमादार अशोक धामणे, धनंजय क्षिरसागर, गणेश लेकुळे, संतोष करे, मुजीब शेख, विनोद पंडीत, विलास वडकुते यांच्या पथकाने शासकिय रुग्णालयाच्या परिसरात जाऊन पाहणी केली. त्या ठिकाणी असलेल्या सिसीटीव्ही फुटेजवरून आरोपींची ओळख पटविण्याचे काम सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.