
गोगावलेंना पालकमंत्रिपद मिळाले नाही तर मोठा उठाव:अमित शहा यांच्या दौऱ्यापूर्वी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेना नेत्याचा इशारा
कॅबिनेट मंत्री भरत गोगावले यांना रायगड जिल्ह्याचे पालकमंत्रिपद मिळाले नाही, तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्यापूर्वीच मोठा उठाव होईल, असा निर्वाणीचा इशारा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनी दिला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज सायंकाळी महाराष्ट्राच्या 2 दिवसीय दौऱ्यावर येत आहेत. ते उद्या शनिवारी रायगड किल्ल्याला भेट देणार आहेत. त्यानंतर त्यांचे मुंबईतही काही कार्यक्रमात आहेत. तत्पूर्वी, रायगडावरील कार्यक्रम आटोपल्यानंतर ते उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या सुतारवाडी येथील निवासस्थानी भेट देतील. या भेटीद्वारे रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर महेंद्र दळवी यांनी उपरोक्त इशारा दिला आहे. ..तर भविष्यात मोठा उठाव होईल महेंद्र दळवी यासंबंधी बोलताना म्हणाले की, आम्हाला निश्चितच न्याय मिळेल. उद्या देशाचे गृहमंत्री अमित शहा यांचा नियोजित दौरा व सुतारवाडीत भोजन कार्यक्रम आहे. पण यासंबंधी बंद दाराआड चर्चा करण्याची काहीच गरज नाही. भरत गोगावले यांना पालकमंत्रिपद मिळेल याविषयी आम्ही सर्व रायगडवासी आशावादी आहोत. खरे तर या प्रकरणी अगोदरच खूप उशीर झाला आहे. प्रोटोकॉलनुसार गोगावले हे 4 टर्मचे आमदार आहेत. त्यामुळे त्यांना हे पद मिळणे अपेक्षित आहे. सुनील तटकरे यांचा नेहमीच हव्यास असतो. पण आता गोगावले यांना रायगडचे पालकमंत्रिपद मिळाले नाही तर भविष्यात मोठा उठाव होईल. अमित शहांच्या दौऱ्यात आम्हाला न्याय मिळेल असे वाटत आहे. चार टर्म आमदार असणाऱ्या नेत्याला पालकमंत्रिपद द्यायचे की, 2 टर्म आमदार असणाऱ्याला द्यायचे याचा निर्णय वरिष्ठ घेतली. पण आमच्या नेत्याला न्याय मिळाला नाही, तर आम्ही नक्कीच उठाव करू. गोगावले म्हणतात काळजीचे कारण नाही दुसरीकडे, भरत गोगावले यांनी या प्रकरणी आपल्याला काळजी करण्याचे काहीच कारण नसल्याचे स्पष्ट केले आहे. सुनील तटकरे यांनी अमित शहा यांना जेवणाचे निमंत्रण दिले आहे. हे निमंत्रण शहा यांनी स्वीकारले आहे. अशावेळी तिथे जाणे क्रमप्राप्त असते. पण ते तिथे गेले म्हणजे पालकमंत्रिपदाचा तिढा सुटला असे होत नाही. अमित शहा रायगडावर येत आहेत. त्यांचे पहिल्यांदा आम्ही स्वागत करतो. आमचे नेते एकनाथ शिंदे यांचे अमित शहा यांच्याशी चांगले संबंध आहेत. त्यामुळे आम्हाला या प्रकरणी काळजी करण्याची काहीच करज नाही, असे गोगावले म्हणाले. हे ही वाचा... रायगडावरील वाघ्या कुत्रा काढून फेकून द्या:एवढ्या लांब कानाचा कुत्रा भारतीय असू शकतो का? खासदार उदयनराजे भोसले यांचा सवाल मुंबई - भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी किल्ले रायगडावरील वाघ्या कुत्र्याचे शिल्प काढून फेकून देण्याची मागणी केली आहे. रायगडावरील वाघ्या कुत्र्याचे शिल्प काढून फेकून द्या. एवढ्या लांब कानाचा कुत्रा भारतीय असू शकतो का? द्यायचा एक दणका, त्यात काय एवढे? असे ते म्हणालेत. वाचा सविस्तर