News Image

फुले दांपत्याच्या ऐतिहासिक कार्याचा विपर्यास:त्यांनी मुलींची पहिली शाळा सुरू केली नाही असे खासदार उदयनराजेंनी सांगणे दुर्देवी- हर्षवर्धन सपकाळ


मुलींची पहिली शाळा फुले दांपत्य यांनी सुरू केली नाही, असे खासदार उदयनराजे यांनी सांगणे दुर्देवी आहे. इतिहास साक्षी आहे की, सावित्रीबाई फुले यांचे योगदान सर्वांसमोर आहे. सावित्रीबाई फुले यांनी प्रथम मुलींची आणि अस्पृश्य यांच्यासाठी शाळा सुरू केली. पण खरा इतिहास मोडतोड केला जात आहे. महात्मा फुले वाड्यामध्ये जाऊन त्यांचा इतिहास लपवण्याचा प्रयत्न केला जात आहे. प्रशांत कोरटकर, राहुल सोलापूरकर यांच्याबाबत मूग गिळून ते गप्प आहे, असे मत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, महात्मा फुले यांना अभिवादन करण्याच्या अनुषंगाने आणि ईश्वरी भिसे कुटुंब भेट घेऊन सांत्वन केले आहे. फुले यांचे योगदान मोठे असून छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी नेमकी कुठे हे १९८ वर्ष लपवले गेले. ती समाधी फुले यांनी शोधली आणि खरा इतिहास जनतेसमोर आणला. सावित्रीबाई फुले यांना महिलांची पहिली शाळा काढत असताना अनेक अपमान सहन करावे लागले. भारतीय लोकांनी त्यांना छळले त्यांना विदेशी लोकांनी त्रास दिला नाही. फुले यांच्यावर चित्रपट आला असून त्याला विरोध केला जात आहे, त्यातील दृष्य आणि मान्यता याची लपवाछपवी केली जात आहे. चित्रपट माध्यमातून काही वाद निर्माण झाले कारण सावित्रीबाई फुले यांना जो त्रास दिला गेला तो सोईस्कर लपवला गेला पाहिजे याबाबत सेन्सॉर बोर्ड एका दिशेने भूमिका घेत आहे. त्यांना छळणारे कोण लोक होते याची लपवाछपवी केली जात आहे. मंगेशकर रुग्णालय राजकीय पक्षाच्या इशाऱ्यावर चालणारे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात ईश्वरी भिसे या रुग्णालयात गंभीर अवस्थेत साडेपाच तास असताना त्यांना धर्मादाय रुग्णालय यांनी दाखल करून घेतले नाही. आर्थिक कारणामुळे त्यांना दाखल करून घेतले गेले नाही. याबाबत हलगर्जीपणा केल्याने भिसे यांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. मंगेशकर रुग्णालयाची रिकाम्या देव्हारा प्रमाणे अवस्था झाली आहे. आपल्या श्रद्धा ज्या आवाज आणि मूल्यांवर होता ते पायदळी तुडवले गेल्याचे दिसून येते. एका राजकीय पक्षाच्या इशाऱ्यावर हे रुग्णालय चालत आहे. सदर रुग्णालय पैशाशिवाय सध्या कामकाज करत नाही. सावकारी कृत्याला लाजवेल अशी वागणूक रुग्णांना मिळत आहे. त्यामुळे रुग्णालय कार्यकारी मंडळ सरकारने बरखास्त करून रुग्णालय ताब्यात घ्यावे. नवीन कार्यकारी मंडळ स्थापन करावे. धर्मादाय अटी यांचा भंग करण्यात आला आहे. सदोष मनुष्यवधाचा गुन्हा रुग्णालय प्रमुख डॉ. केळकर आणि संचालक मंडळ यांच्यावर दाखल करण्यात यावा, अशी मागणी सपकाळ यांनी केली. उदयनराजेंचे वक्तव्य काय? महात्मा ज्योतिबा फुले यांनी एका दृष्टीकाेनातून थाेरले प्रतापसिंह महाराज यांचे अनुकरण केले आहे. स्त्री शिक्षणाच्या बाबतीत सर्वप्रथम काेणी पाऊल उचलले असल तर ते थाेरले प्रतापसिंह महाराज हाेते. त्यांनी स्वत:च्या सातारा येथील राजवाड्यात स्त्रियांसाठी शाळा सुरु केली हाेती. विशेष म्हणजे याच राजवाड्यात देशाचे संविधान निर्माण करणारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे देखील प्राथमिक शिक्षण झाले असे, मत खासदार उदयनराजे भाेसले यांनी पत्रकारांशी बाेलताना व्यक्त केले होते.