
चिंता करू नका, नीतेश राणेंही एकदिवस जेलमध्ये जातील:अंबादास दानवे यांनी राणे यांच्या वादग्रस्त विधानांचा दाखला देत केला दावा
माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे एक दिवसच जेलमध्ये राहिले होते. पण नीतेश राणे यांचा तुरुंगातील मुक्का फार लांब असू शकतो, असा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते तथा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे. दरम्यान, बघू, तुरुंगात ते जातात की मी, असे म्हणत नीतेश राणे यांनी दानवे यांना आव्हान दिले आहे. नीतेश राणे यांनी गुरुवारी सायंकाळी सिंधुदुर्गात आयोजित एका कार्यक्रमात बोलताना महाविकास आघाडीच्या काळात नारायण राणेंना झालेल्या अटकेवर भाष्य केले होते. नारायण राणे यांना पोलिसांनी जेवणाच्या ताटावरून उठवून अटक केली होती. या अटकेचा क्षण अजूनही माझ्या मोबाईलमध्ये सेव्ह आहे. ज्या दिवशी मी याची परतफेड करेन त्या दिवशी मी हा व्हिडिओ डिलीट करेन. राणे साहेबांना ज्यांनी - ज्यांनी त्रास दिले, ते कुठेही सुटणार नाहीत. एवढे मी विश्वासाने सांगतो. सर्वांचा हिशेब होणार, असे ते म्हणाले होते. नीतेश राणेंचा जेलमधील मुक्काम वाढू शकतो नीतेश राणे यांच्या या विधानाविषयी ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांना छेडले असता त्यांनी नीतेश राणे यांनाही नारायण राणेंसारखे एकदिवस तुरुंगात जावे लागेल असे स्पष्ट केले. नीतेश राणे यांनाही एकदिवस असेच जावे लागणार आहे. त्याची चिंता करू नका. ज्या पद्धतीने वक्तव्य नीतेश राणेंकडून महाराष्ट्रात होत आहे. त्यांना (नारायण राणे) तरी एक दिवस झाले. मला वाटते त्यांचा लांबचा मुक्का होऊ शकतो, असे ते म्हणाले. नीतेश राणे यांचा पलटवार दुसरीकडे, अंबादास दानवे यांच्या या विधानाविषयी पत्रकारांनी नीतेश राणे यांना छेडले असता त्यांनी पुन्हा एकदा ठाकरे गटाला आव्हान दिले. ते म्हणाले, हो ना. बघू ते जातात की मी जातो. माझे जेलमध्ये जाण्याचे दिवस आता काही येत नाहीत. पण कदाचित त्यांचे दिवस जवळ आले असतील. त्यांचे किंवा त्यांच्या मालकाचे. तेव्हा पाहू. तेव्हा जेवणाचा डब्बा मीच पाठवतो, पाहिजे तर, असे ते म्हणाले. दानवे - राणेंमधील वाक्युद्ध फार जुने विशेष म्हणजे अंबादास दानवे व नीतेश राणे यांच्यात शाब्दिक होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. दानवे यांनी यापूर्वीही नीतेश याच्यावर टोकाची तिखट टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर अजित पवार आपल्या सहकाऱ्यांसह महायुती सरकारमध्ये सहभागी झाले होते. या घटनाक्रमाचा दाखला देत अंबादास दानवेंनी नीतेश यांचा उल्लेख थेट टिल्ल्या म्हणून केला होता. टिल्ल्या जा देवगिरी बंगल्यावर सकाळी सकाळी सलाम ठोकून ये. झालं गेलं विसरून जा, असे ते म्हणाले होते.