
आखाडा बाळापूर शिवारात गायी नेणारा पीकअप पकडला:टायर फुटले तरी वाहन चालकाचा वाहन पळविण्याचा प्रयत्न, 14 जनावरांची सुटका
हदगावकडून अवैधरित्या गायींची वाहतूक करणाऱ्या पीकअपच्या पाठीमागे काही कार्यकर्ते लागल्यानंतर चालकाने वाहनाचे टायर फुटल्यानंतरही तब्बल तीन ते चार किलो मिटर वाहन पळविले. मात्र आखाडा बाळापूर पोलिसांनी शेवाळा रोड भागात वाहन पकडले. मात्र चालक वाहन सोडून फरार झाला होता. या वाहनातील 14 जनावरांची शनिवारी ता 12 सुटका करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हदगाव भागातून एका पीकअप वाहनामध्ये 14 गायींची कत्तलीसाठी वाहूतक होत असल्याची माहिती हदगाव भागातील कार्यकर्त्यांना मिळाली होती. त्यावरून काही कार्यकर्त्यांनी एका पीकअप वाहनाचा पाठलाग सुरु केला होता. कार्यकर्ते पाठीमागे लागल्याचे लक्षात येताच चालकाने वाहन शेवाळा मार्गे आखाडा बाळापूरकडे वळविले. यावेळी वाहनाने टायर देखील फुटले. मात्र या परिस्थितीतही चालकाने वाहन भरधाव वेगाने पळविण्यास सुरवात केली. या प्रकाराची माहिती पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांना मिळताच त्यांनी आखाडा बाळापूर पोलिसांना नाकेबंदीच्या सुचना दिल्या. त्यावरून पोलिस निरीक्षक विष्णुकांत गुठ्ठे, उपनिरीक्षक गणेश घोटके, जमादार पिराजी बाले, शेख अन्सार, राजीव जाधव, शिवाजी पवार, विजय जाधव यांच्या पथकाने सकाळी सात वाजण्याच्या सुमारास शेवाळा रोड भागात नाकाबंदी केली. दरम्यान, सदर वाहन आखाडा बाळापूर शिवारात आल्यानंतर चालकाने वाहन सोडून पळ काढला. त्यानंतर पोलिसांनी सदर वाहन ताब्यात घेऊन आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात आणले. या वाहनात 13 गायी व एक वासरू असल्याचे दिसून आले. पोलिसांनी त्यांना वाहनातून खाली उतरवून त्यांच्या चाऱ्याची व पाण्याची व्यवस्था केली. त्यानंतर सदर जनावरे गोशाळेत सोडण्याची तयारी पोलिसांनी केली आहे. वाहनाच्या क्रमांकावर वाहन मालक व चालकाचा पोलिसांनी शोध सुरु केला आहे. या प्रकरणी पुढील कारवाई केली जात असल्याचे पोलिस विभागाच्या सुत्रांनी सांगितले.