
दिव्य मराठी मुलाखत:बालविवाहाच्या प्रश्नाकडे प्राधान्याने लक्ष दिले जाणार; नव्या मुख्यकार्यकारी अधिकारी अंजली रमेश यांचा निर्धार
हिंगोली जिल्ह्यात आगामी काळात पिण्याचे काम, आरोग्य, समाज कल्याण या सोबतच शिक्षण व बाल विवाहाच्या प्रश्नाकडे प्राधान्याने लक्ष दिले जाणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश यांनी 'दिव्य मराठी'शी बोलतांना दिली आहे. हिंगोली जिल्हा परिषदेचा पदभार स्वीकारल्यानंतर त्या बोलत होत्या. जिल्ह्यात सध्या पाणी प्रश्न गंभीर असल्याचे चित्र असून जल जीवन मिशन अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजनांची कामे पूर्ण करून या महिना अखेर जास्तीत जास्त गावांना पाणी पुरवठा होईल याकडे लक्ष दिले जाणार आहे. यामध्ये भौतिकदृष्ट्या पूर्ण झालेल्या योजनांचा पाणी पुरवठा सुरु होईल हे लक्षात घेऊन त्यानुसार कंत्राटदारांना सुचना दिल्या जातील. त्यातून ग्रामीण भागात महिलांची पाण्यासाठी होणारी भटकंती थांबविण्यास मदत होणार आहे. हिंगोली जिल्ह्यात मुलींच्या शिक्षण अभावी बाल विवाहाचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येत आहे. त्यानुसार मुलींच्या शिक्षणावर भर देऊन बालविवाह मुक्त हिंगोली जिल्हा करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.त्यासाठी शिक्षण विभाग, आरोग्य विभाग, महिला बालविकास विभागाच्या माध्यमातून बाल विवाहाचे हॉट स्पॉट असलेल्या ५० गावांमध्ये शिबीर घेऊन त्याठिकाणी मार्गदर्शन केले जाणार आहे. यामध्ये बाल विवाहाचे दुष्परिणाम, मुलींच्या आरोग्यावर होणारे परिणाम याची माहिती केवळ मुलींनाच नव्हे तर मुलांना व पालकांना देखील दिली जाणार आहे. यातून जिल्हा बालविवाह मुक्त केला जाईल. कर्करोग संशयित महिलांची आरोग्य तपासणी हिंगोलीचे तत्कालीन जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या संकल्पनेतून राबविला जात असलेले संजीवनी अभियान सुरुच ठेवले जाणार आहे. त्यातून महिलांच्या आरोग्याकडे लक्ष दिले जाणार आहे. सध्या या अभियानाच्या सर्वेक्षणातून आढळून आलेल्या कर्करोग संशयित महिलांची आरोग्य तपासणी करून त्यातून नेमक्या किती महिलांना कर्करोग निदान झाले त्यांची माहिती घेऊन त्यांच्यावर मोफत शस्त्रक्रिया व औषधोपचारासाठी प्रयत्न केले जातील. या शिवाय महिलांच्या इतर आरोग्याच्या प्रश्नावरही लक्ष दिले जाईल. शाळांची गुणवत्ता वाढवण्यावर भर हिंगोली जिल्ह्यातील ग्रामीण भागात समाज कल्याण विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या योजनांकडे विशेष लक्ष देऊन या योजना परिमाण कारण राबवण्यावर भर दिला जाणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देऊन शाळांची गुणवत्ता वाढवण्यावर भर दिला जाणार आहे. या बाबींना प्रथम प्राधान्य असणार असून या शिवाय ग्रामीण भागातून पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यावर आपला भर असणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या शिवाय इतर विभागांच्या योजनांची परिणामकारक अंमलबजावणी होईल याकडे लक्ष दिले जाणार असल्याचेही मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश यांनी सांगितले.