
आखाडा बाळापूर येथील कृषी पर्यवेक्षकाचे खून प्रकरण:आरोपीची माहिती देणाऱ्यास पारितोषिकाची रक्कम 75 हजारावरून 1 लाख रुपये
आखाडा बाळापूर येथील कृषी पर्यवेक्षक राजेश कोल्हाळ खून प्रकरणाला एक वर्षापेक्षा जास्त कालावधी होऊनही आरोपी पोलिसांच्या हाती लागला नाही. त्यानंतर आता पोलिसांनी आरोपीची माहिती देणाऱ्यास 1 लाखांचे परितोषिक जाहीर केले आहे. विशेष म्हणजे पूर्वी ही रक्कम 50 हजार त्यानंतर 75 हजार तर आता 1 लाख रुपये केली आहे. आता तरी आरोपीची माहिती मिळेल अशी अपेक्षा पोलिस विभागाकडून व्यक्त केली जात आहे. आखाडा बाळापूर येथील तालुका बिज गुणन केंद्रात कार्यरत कृषी पर्यवेक्षक राजेश कोल्हाळ यांचा ता. 14 मार्च 2024 रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास कार्यालयातच खून झाला होता. या प्रकरणात त्या ठिकाणी मजूरी करणाऱ्या पांडूरंग कचरू भालेराव याच्या विरुध्द आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मात्र खूनाच्या घटनेपासून पांडूरंग पोलिसांच्या हाती लागलाच नाही. दरम्यान, या प्रकरणात आखाडा बाळापूर सह स्थानिक गुन्हे शाखेनेही आरोपीचा शोध सुरु केला आहे. मात्र त्याचा कुठेही ठावठिकाणा लागला नाही. त्यानंतर पोलिसांनी आरोपीची माहिती देणाऱ्यास 50 हजार रुपयांचे पारितोषीक देण्याचे जाहिर केले होते. मात्र पोलिसांना माहिती मिळालीच नाही. त्यानंतर या रकमेच वाढ करून पारितोषीकाची रक्कम 75 हजार रुपये करण्यात आली होती. मात्र पारितोषिकाच्या रकमेत वाढ करूनही आरोपीचा कुठेही शोध लागलाच नाही. त्यानंतर आता पोलिसांनी पारितोषिकाच्या रकमेत वाढ केली असून आता आरोपीची माहिती देणाऱ्यास 1 लाख रुपयांचे पारितोषिक जाहिर केले असून माहिती देणाऱ्याचे नांव गुप्त ठेवले जाणार असल्याचे पोलिस विभागाच्या सुत्रांनी सांगितले. आता या प्रकरणातील आरोपीची माहिती मिळू शकेल अशी अपेक्षा पोलिस विभागाकडून व्यक्त केली जात आहे.