
लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी न्यायालयाचा मान ठेवणार का?:फडणवीसांची टीका; म्हणाले- 'ठाकरे गटाला जनता माफ करणार नाही'
स्वातंत्र्यवीर सावरकरांवर आक्षेपार्ह टिप्पणी बद्दल सर्वोच्च न्यायालयाने काँग्रेस खासदार आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना फटकारले आहे. आम्ही कोणालाही स्वातंत्र्य सैनिकांविरुद्ध असे बोलण्याची परवानगी देऊ शकत नसल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. राहुल गांधी यांनी भविष्यात असे कोणतेही विधान केले तर आम्ही स्वतःहून दखल घेऊन कारवाई करणार असल्याचेही न्यायालयाने म्हटले आहे. यावरुन आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे. हातात लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी आता सर्वोच्च न्यायालयाचा मान ठेवणार का? असा प्रश्न फडणवीस यांनी विचारला आहे. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले की, राहुल गांधी हे आता सर्वोच्च न्यायालयाचा मान ठेवणार का? असा आमचा प्रश्न आहे. देशाच्या स्वातंत्र्यसैनिकांचा मान ठेवायला सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधी यांना सांगितले आहे. त्यामुळे मी सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानतो, असे देखील देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. पहलगाम हल्ल्यावर चर्चा करण्यासाठी आयोजित सर्वपक्षीय बैठकीला उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या अनुपस्थिती बाबतही फडणवीस यांनी टीका केली. न्यायालयाने राहुल गांधी यांना जोरदार फटकारले सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधी यांना जोरदार फटकारले आहे. यासाठी मी न्यायालयाचे आभार व्यक्त करत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. राहुल गांधी वारंवार स्वातंत्र्यसैनिकांचा आणि नायकांचा अपमान करत होते. ज्या भाषेचा त्यांनी वापर केला, त्यामुळे देश दु:खी असल्याचेही ते म्हणाले. मात्र, आता हातात लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी कमीत कमी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे तरी पालन करतील का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. ते आता स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विरोधात बोलणे बंद करतील, असे देखील देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. देशाची जनता ठाकरे गटाला माफ करणार नाही बांगलादेश संदर्भातील युद्धाच्या वेळी स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांनी स्वर्गीय इंदिरा गांधी सरकारला समर्थन दिले होते. मात्र आता सर्व पक्षीय बैठकीला उद्धव ठाकरे पक्षाच्या अनुपस्थिती वरुन देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे गटावर टीका केली आहे. ज्या - ज्या वेळी युद्धाची वेळ असते, युद्ध सादृश्य परिस्थिती निर्माण होते, देशावर हल्ला होतो, किंवा देशाचा एखादा विषय असतो, त्या-त्या वेळी या देशातील पक्षांनी कधीही पक्ष बघितला नाही. हीच आपली परंपरा राहिली आहे. बांगलादेश युद्धात देखील त्यावेळी अटल बिहारी वाजपेयी यांनी इंदिरा गांधी पूर्णतः समर्थन दिले होते. हीच या देशाची परंपरा राहिली आहे. मात्र अशावेळी देखील टीका करणे, उपहास करणे, मूर्खासारखे स्टेटमेंट देणे, हे उद्धव ठाकरे गटाचे सुरू आहे. याला देशाची जनता कधीही माफ करणार नाही, असे देखील देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. शरद पवार यांना सल्ला धर्म विचारुन पहलगाम येथील अतिरेक्यांनी मारले, या वृत्ताला शरद पवार यांनी नकार दिला होता. यावर फडणवीस म्हणाले की, शरद पवार साहेब काय म्हणाले हे मी ऐकले नाही. मात्र त्या ठिकाणी मारल्या गेलेल्यांचे नातेवाईक उपस्थित होते. ते जे काही म्हणाले, ते मी ऐकले आहे. शरद पवार यांनी ते ऐकले नसेल तर त्यांनी नातेवाइकांचे म्हणणे ऐकावे, असा सल्ला देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांना दिला आहे.