
विठ्ठलाच्या दर्शनासाठी लाखो भाविकांची रांग:तरीही आमदाराला कार्यकर्त्यांसाठी हवे VIP दर्शन, संतोष बांगरांचे पंढरपूर मंदिराला पत्र
मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांच्या स्पष्ट आदेशानंतर पंढरपुरातील विठ्ठल मंदिरात व्हीआयपी दर्शनावर बंदी घालण्यात आली असताना, काही राजकीय नेते मात्र या नियमाला बगल देण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येतंय. शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी आपल्या 21 कार्यकर्त्यांना व्हीआयपी दर्शन मिळावे, यासाठी पंढरपूर देवस्थान समितीला पत्र दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरात सातही मानाच्या पालख्या आणि हजारो भाविक दाखल होत आहेत. यामुळे दर्शनासाठी प्रचंड गर्दी होत असून, दर्शनाची रांग गोपाळपूरच्या बाराव्या पत्रा शेडच्या पुढे गेलेली आहे. शुक्रवारी देवाचा पलंग निघाल्यानंतर 24 तास दर्शन सुरू झाले. 24 तास दर्शन सुरू असल्यामुळे हजारो भक्त रात्री-दिवस विठ्ठलाच्या दर्शनासाठी थांबले आहेत. दर्शन रांगेत एक लाखापेक्षा जास्त भाविक उभे आहेत. आमदार संतोष बांगर यांनी थेट पंढरपूर देवस्थान समितीला २१ जणांच्या नावाची यादी देत, त्यांच्या दर्शनाची व्यवस्था करण्याची विनंती केली आहे. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर भाविकांची विक्रमी गर्दी झाली असताना, राजकीय नेत्यांचा आपल्या कार्यकर्त्यांसाठी व्हीआयपी दर्शनाचा आग्रह धक्कादायक ठरला आहे. दरम्यान, एकीकडे सामान्य भाविक तासन् तास रांगेत उभे असताना, दुसरीकडे आपल्या कार्यकर्त्यांना दर्शन मिळावे म्हणून आमदारच प्रयत्न करत असल्याचे समोर आले आहे. या प्रकारामुळे सामान्य वारकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. गजानन महाराज पालखीचे सोलापूर जिल्ह्यात आगमन दरम्यान, ज्ञानोबा-तुकारामांचा अखंड नामघोष, गजानन महाराजांचा जयघोष, भजनांची मांदियाळी अशा भक्तिमय आणि मंगलमय वातावरणात शेगावच्या श्री गजानन महाराजांचा पालखी सोहळा शनिवारी सायंकाळी तुळजापूर मार्गे ‘श्रीं’च्या पालखीचे तामलवाडी गाव ओलांडून सोलापूर जिल्ह्यात कसेगावाच्या शिवारात आगमन झाले. या पालखी सोहळ्यात शिस्तीचे व भक्तीचे वातावरण पाहावयास मिळाले. २६ दिवसांचा पायी प्रवास करीत सोलापूर जिल्ह्यात आगमन झालेल्या या पालखी सोहळ्यात पांढऱ्याशुभ्र पोशाखातील ६५० भगव्या पताकाधारी वारकरी एका रांगेत चालत होते. यात तरुणांचा सहभाग उल्लेखनीय आहे. ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा फलटणमध्ये दाखल दुसरीकडे, संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा सातारा जिल्ह्यातील फलटणमध्ये दाखल झाला आहे. टाळ-मृदुंगाच्या गजरात आणि 'ज्ञानोबा-तुकाराम' नामाच्या जयघोषात वारकरी फलटण शहरात दाखल झाले. फलटण नगर परिषदेच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. पालखीचा आज फलटण शहरात मुक्काम असणार आहे. उद्या 29 जून रोजी सकाळी पालखीचे बरडच्या दिशेने प्रस्थान होईल. बरड येथे गोल रिंगण होणार आहे.