बाप-लेकीच्या पवित्र नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना नागपुरातील पाचपावली परिसरात उघडकीस आली आहे. अवघ्या 10 वर्षांच्या चिमुरडीवर तिच्याच सावत्र वडिलांकडून वारंवार लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा गंभीर आरोप आहे. विशेष म्हणजे, मुलीच्या शरीरावर दिसणाऱ्या संशयास्पद खुणांमुळे आईला पतीच्या वागणुकीबाबत शंका आली. मात्र, घरात नेमके काय घडत आहे, हे समजत नसल्याने तिने सत्य शोधण्यासाठी घरात गुपचूप सीसीटीव्ही कॅमेरा बसवला. टीव्हीच्या मागे लपवून ठेवलेल्या या कॅमेऱ्याच्या माध्यमातून आरोपीचे कृत्य समोर आल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी पोलिसांनी 45 वर्षीय आरोपीला अटक केली असून न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. मुलीच्या शरीरावरील खुणांमुळे आईला संशय मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आपल्या आई आणि सावत्र वडिलांसोबत नागपुरातील पाचपावली परिसरात राहत होती. गेल्या काही दिवसांपासून मुलीच्या शरीरावर काही संशयास्पद खुणा आईच्या निदर्शनास येत होत्या. मुलीच्या वागण्यातही काही बदल जाणवत असल्याने आई अस्वस्थ झाली होती. मुलीसोबत घरात काहीतरी चुकीचे घडत असल्याची शक्यता तिला वाटू लागली. सुरुवातीला तिने मुलीशी संवाद साधण्याचा आणि परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, नेमके सत्य समोर येत नसल्याने तिने पतीच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याचा निर्णय घेतला. टीव्हीच्या मागे लपवला सीसीटीव्ही कॅमेरा घरात कॅमेरा बसवल्याची माहिती पतीला समजू नये, यासाठी आईने अतिशय सावधगिरी बाळगली. तिने घरातील टीव्हीच्या मागील बाजूस कोणाच्याही लक्षात येणार नाही अशा पद्धतीने सीसीटीव्ही कॅमेरा बसवला.
या कॅमेऱ्याचे लाईव्ह फुटेज पाहण्याची व्यवस्था तिने स्वतःच्या मोबाईलऐवजी एका विश्वासू मैत्रिणीच्या मोबाईलवर केली होती. त्यामुळे घरात प्रत्यक्ष उपस्थित नसतानाही घरातील हालचालींवर लक्ष ठेवणे तिला शक्य झाले. या कॅमेऱ्याच्या माध्यमातून जवळपास वर्षभर घरातील हालचालींचे रेकॉर्डिंग सुरू होते. दरम्यान, या फुटेजमध्ये सावत्र वडिलांकडून चिमुरडीचे लैंगिक शोषण होत असल्याचे निदर्शनास आल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यानंतर आईला आपल्या मुलीबाबत वाटत असलेली भीती खरी असल्याचे स्पष्ट झाले. हा प्रकार समोर आल्यानंतर तिने मुलीशी विश्वासाने संवाद साधून घडलेल्या प्रकाराबाबत विचारणा केली. अत्याचाराची माहिती कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी आईने धीर देत विचारल्यानंतर चिमुरडीने तिच्यासोबत घडत असलेल्या प्रकाराची माहिती दिली. आरोपी सावत्र वडिलांकडून तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार करण्यात येत असल्याचे तिने सांगितले. एवढेच नव्हे, तर हा प्रकार कोणालाही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी आरोपीने दिली होती. त्यामुळे भीतीपोटी चिमुरडी इतके दिवस आपल्यासोबत घडणारा प्रकार कोणालाही सांगू शकली नव्हती. मुलीने सांगितलेली आपबिती ऐकल्यानंतर आईला मोठा धक्का बसला.
मुलीच्या सुरक्षिततेचा प्रश्न लक्षात घेऊन तिने विलंब न करता पोलिसांकडे धाव घेतली. पाचपावली पोलीस ठाण्यात जाऊन तिने संपूर्ण घटनाक्रम सांगत आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. आरोपी सावत्र वडिलांना अटक; तीन दिवसांची पोलीस कोठडी या तक्रारीची दखल घेत पाचपावली पोलिसांनी 45 वर्षीय आरोपी सावत्र वडिलांविरोधात गुन्हा दाखल केला. बलात्कार, गंभीर लैंगिक अत्याचार, जीवे मारण्याची धमकी आणि पोक्सो कायद्यातील संबंधित कलमांनुसार कारवाई करण्यात आली आहे. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली. अटकेनंतर आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात सीसीटीव्ही फुटेज, पीडित मुलीचा जबाब आणि इतर पुराव्यांच्या आधारे पोलीस पुढील तपास करत आहेत. दरम्यान, मुलीच्या शरीरावर दिसलेल्या खुणांमुळे आईला आलेला संशय, त्यानंतर तिने घरात गुपचूप बसवलेला सीसीटीव्ही कॅमेरा आणि मैत्रिणीच्या मोबाईलवरून पाहिलेले लाईव्ह फुटेज, या संपूर्ण घटनाक्रमामुळे एका चिमुरडीवरील कथित अत्याचाराचा प्रकार समोर आला. या घटनेने नागपूर परिसरात संताप व्यक्त केला जात असून, मुलांच्या सुरक्षिततेचा आणि घरातीलच व्यक्तींकडून होणाऱ्या अत्याचारांचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.