मराठा आरक्षणाच्या प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलनाची भूमिका कायम ठेवणारे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील सध्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. सांगलीनंतर आता ते सातारा जिल्ह्याच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर दाखल झाले आहेत. आज मायणी, मसूर आणि पाचवड येथे त्यांच्या बैठका आणि सभा होणार असून, उद्या पाटणमध्ये जाहीर सभा आणि साताऱ्यात पत्रकार परिषद होणार आहे. दरम्यान, जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्टपासून अंतरवाली सराटी येथे उपोषणाचा इशारा दिल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारही सक्रिय झाले आहे. मराठा आरक्षण उपसमितीची आज सह्याद्री अतिथीगृहावर महत्त्वाची बैठक होणार आहे. या दौऱ्यावेळी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेत सरकारने झालेली चूक मान्य करून ती दुरुस्त करावी, अशी मागणी केली आहे. मराठा आरक्षणाशी संबंधित निर्णय, प्रमाणपत्रे आणि प्रलंबित मागण्यांवरून त्यांनी सरकार तसेच अधिकाऱ्यांना सुनावले. "तुम्ही चूक मान्य करा आणि ती दुरुस्त करण्याच्या मागे लागा. मी आता तुम्हाला सोडणार नाही," असा इशारा जरांगे यांनी दिला. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सरकारकडून सुरू असलेल्या प्रक्रियेबाबत काही अधिकारी आणि माध्यमांमध्ये करण्यात येत असलेल्या दाव्यांवरही जरांगे यांनी नाराजी व्यक्त केली. मराठ्यांच्या प्रश्नात अधिकाऱ्यांनी खोलात जाऊ नये, असा इशारा देत त्यांनी अधिकाऱ्यांना आपल्या पदाची आणि जबाबदारीची जाणीव ठेवण्याचे आवाहन केले. 'सरकारने चूक मान्य करून दुरुस्ती करावी' मराठा समाजाच्या मागण्यांबाबत सरकारने काही चुका केल्या असतील तर त्या मान्य करून दुरुस्त करणे गरजेचे आहे, अशी भूमिका जरांगे यांनी मांडली.
"चूक मान्य करा, दुरुस्त करण्याच्या मागे लागा," असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी शिवसेना नेते उदय सामंत यांनी घेतलेल्या भूमिकेचाही उल्लेख केला. सरकारकडून झालेली चूक सुधारण्याची भूमिका घेतली जात असेल तर त्याचे स्वागतच आहे, असे जरांगे यांच्या वक्तव्याचा सूर होता. 'मराठ्यांच्या प्रश्नात खोलात जाऊ नका' मराठा आरक्षणाशी संबंधित कागदपत्रे, प्रमाणपत्रे आणि शासन निर्णयांबाबत काही अधिकाऱ्यांकडून करण्यात येणाऱ्या वक्तव्यांवर जरांगे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. संबंधित अधिकाऱ्यांनी माध्यमांसमोर वक्तव्य करण्यापूर्वी वस्तुस्थिती तपासावी, असे त्यांनी म्हटले. "मराठ्यांच्या भानगडीत पडू नका, प्रवक्तेपणा किंवा वकिली करू नका," अशा शब्दांत जरांगे यांनी अधिकाऱ्यांना सुनावले. संबंधित निर्णय कोणत्या पत्राच्या आधारे घेण्यात आले आणि नंतर ते रद्द झाले असल्यास त्याचा परिणाम काय, याबाबत त्यांनी प्रश्न उपस्थित केले. मराठा समाजाशी संबंधित निर्णयांबाबत कोणत्या मंत्र्याने काय सांगितले, यावरून माध्यमांमध्ये माहिती देण्याआधी अधिकाऱ्यांनी पूर्ण माहिती घ्यावी, अशी मागणीही त्यांनी केली. 'मराठ्यांना फक्त प्रचारासाठी वापरायचे का?' मराठा समाजाच्या मागण्यांवरून सरकारमधील विविध खात्यांवरही जरांगे यांनी निशाणा साधला. मुंबईतील मराठा समाजाच्या मागण्यांशी संबंधित परिवहन आणि उद्योग खात्याचे शासन निर्णय निघाले असल्याचा उल्लेख करत त्यांनी या दोन्ही खात्यांकडे शिवसेनेचे मंत्री असल्याचे सांगितले. "भाजपकडे असलेल्या खात्यांमधूनही मराठा समाजाच्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय व्हायला हवेत," अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. मराठा समाजाला केवळ निवडणुकीच्या काळात प्रचारासाठी, पत्रके वाटण्यासाठी किंवा सभांसाठी गर्दी करण्यासाठी वापरले जाते, असा गंभीर आरोपही जरांगे यांनी केला. 2014 पासून प्रलंबित नोकऱ्यांचा मुद्दा मराठा समाजातील तरुणांच्या नोकरीच्या प्रश्नावरही जरांगे यांनी सरकारला घेरले. 2014 पासून प्रलंबित असलेल्या तरुणांना नोकऱ्या देण्याची मागणी त्यांनी केली. एसटी महामंडळ आणि एमआयडीसीमध्ये नोकऱ्यांच्या संधींबाबत त्यांनी सरकारला प्रश्न विचारले. "त्या मुलांना नोकऱ्या द्या," अशी मागणी करत सरकारने मराठा तरुणांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहावे, असे त्यांनी सांगितले.
मराठा समाजातील तरुणांना त्यांच्या पात्रतेनुसार संधी न देता त्यांचा अपमान केला जात असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. नवनाथ बन यांच्यावर पलटवार दरम्यान, जरांगे यांच्या या वक्तव्यांवर भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी टीका केली आहे. भारतीय जनता पक्षावर टीका करणे किंवा भाजप नेत्यांविरोधात खालच्या पातळीवरील भाषा वापरणे चुकीचे असल्याचे त्यांनी म्हटले. यावर जरांगे यांनी नवनाथ बन यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. "हे कोण आलं मधेच? भाजपचे मुख्य प्रवक्ते कोण आहेत, हे मला माहिती नाही," अशा शब्दांत त्यांनी बन यांच्यावर निशाणा साधला. सरकारला प्रश्न विचारणे आणि आपल्या मागण्यांसाठी आवाज उठवणे सुरूच ठेवणार असल्याचे जरांगे यांनी स्पष्ट केले. काँग्रेसलाही जरांगेंचा इशारा मनोज जरांगे यांनी यावेळी काँग्रेसलाही लक्ष्य केले. मराठा समाजाच्या प्रश्नावर काँग्रेसच्या नेत्यांनी एकजुटीने भूमिका घ्यावी, असे आवाहन करताना त्यांनी पक्षातील काही नेत्यांचा उल्लेख केला. अमित देशमुख, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, हर्षवर्धन सपकाळ आणि नाना पटोले यांसारखे नेते मराठा समाजाच्या प्रश्नावर सकारात्मक भूमिका घेत असतील तर त्यात अडथळा आणू नये, असे जरांगे म्हणाले. राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या नेत्यांना मराठा समाजाच्या विरोधात बोलण्यास सांगितले आहे का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
'कितीही विरोध झाला तरी आरक्षण घेणारच' मराठा आरक्षणाच्या मागणीवर आपण ठाम असल्याचे मनोज जरांगे यांनी पुन्हा स्पष्ट केले. "कितीही बोललं तरी मी आरक्षण घेणारच आहे," असे त्यांनी ठामपणे सांगितले. मराठा समाजाला मोठे होऊ द्यायचे नाही, असा काहींचा डाव असल्याचा आरोपही त्यांनी केला. मराठा समाजाचा वापर केवळ राजकीय प्रचारासाठी केला जात असल्याचे सांगत त्यांनी अशा राजकारणाला विरोध केला. मायणीपासून सातारा दौऱ्याला सुरुवात मनोज जरांगे पाटील आज सकाळी 11 वाजता मायणी येथे मराठा समाजाशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर दुपारी 1 वाजता कराड तालुक्यातील मसूर येथे मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांशी आणि नागरिकांशी चर्चा होणार आहे. त्यानंतर संध्याकाळी ते पाचवड येथे दाखल होतील. आजचा त्यांचा मुक्काम कराड येथे असणार आहे. उद्या सकाळी जरांगे पाटील पाटण येथे जाणार असून, तेथे त्यांची जाहीर सभा होणार आहे. त्यानंतर संध्याकाळी सातारा येथे पत्रकार परिषद घेऊन ते आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. मराठा आरक्षणाच्या प्रलंबित मागण्यांची अंमलबजावणी लवकरात लवकर व्हावी, या मागणीसाठी जरांगे पाटील राज्यभर दौरा करत आहेत.
7 ऑगस्टपासून त्यांनी पश्चिम महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात केली असून, सांगलीनंतर आता सातारा जिल्ह्यात त्यांच्या बैठका आणि सभा होत आहेत. 29 ऑगस्टच्या उपोषणासाठी राज्यभर दौरा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर पुन्हा एकदा आंदोलनाची भूमिका घेतली आहे. 29 ऑगस्टपासून अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. या पार्श्वभूमीवर मराठा समाजातील नागरिक आणि कार्यकर्त्यांना मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यासाठी ते राज्यभर दौरा करत आहेत. सातारा हा मराठा समाजासाठी महत्त्वाचा जिल्हा मानला जात असल्याने जरांगे पाटील यांच्या या दौऱ्याकडे विशेष लक्ष लागले आहे. त्यांच्या बैठका आणि सभांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. साताऱ्यात सापडल्या सुमारे 14 हजार कुणबी नोंदी सातारा जिल्ह्यात कुणबी-मराठा नोंदींचाही मुद्दा महत्त्वाचा ठरत आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे 14 हजार कुणबी-मराठा नोंदी सापडल्याची माहिती समोर आली आहे. या नोंदींच्या आधारे प्रशासनाकडून संबंधितांना कुणबी प्रमाणपत्रेही देण्यात आली आहेत. मात्र, सातारा गॅझेट लागू करण्याची मागणी अद्याप पूर्ण झालेली नाही. त्यामुळे या प्रश्नावर मनोज जरांगे पाटील आक्रमक भूमिकेत कायम आहेत. 29 ऑगस्टच्या प्रस्तावित आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सातारा दौऱ्यात या मुद्द्यावरही चर्चा होण्याची शक्यता आहे. जरांगेंच्या उपोषणाआधी सरकारची महत्त्वाची बैठक दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषणाचा इशारा दिल्यानंतर राज्य सरकारच्या पातळीवरही हालचालींना वेग आला आहे. मराठा आरक्षण उपसमितीची आज सह्याद्री अतिथीगृहावर महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीचे नेतृत्व मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील करणार आहेत. या बैठकीत मराठा आरक्षणाशी संबंधित विविध मुद्द्यांचा सविस्तर आढावा घेतला जाणार आहे. विशेषतः मराठा-कुणबी नोंदी, कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया आणि या प्रक्रियेत शासनाच्या पातळीवर येणाऱ्या अडचणी यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. कुणबी प्रमाणपत्रांच्या प्रक्रियेचा आढावा मराठा समाजातील नागरिकांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. या प्रक्रियेत आतापर्यंत झालेली कार्यवाही, प्रलंबित प्रकरणे आणि प्रशासनासमोरील अडचणी याचा आढावा उपसमितीच्या बैठकीत घेतला जाणार आहे.
याशिवाय मराठा समाजासाठी सरकारकडून राबवल्या जाणाऱ्या विविध योजना आणि सुविधांच्या अंमलबजावणीचाही आढावा घेतला जाणार आहे. मात्र, आजच्या बैठकीत मराठा-कुणबी नोंदींचा प्रश्न आणि मनोज जरांगे पाटील यांनी घेतलेली आक्रमक भूमिका हा प्रमुख चर्चेचा विषय राहण्याची शक्यता आहे. सरकार शिष्टमंडळ पुन्हा जरांगेंच्या भेटीला जाणार? यापूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर सरकारकडून राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली होती. आता पुन्हा एकदा सरकारकडून शिष्टमंडळ जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी जाणार का, याकडेही लक्ष लागले आहे. मराठा आरक्षण उपसमितीच्या आजच्या बैठकीनंतर सरकारची भूमिका स्पष्ट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकीकडे जरांगे पाटील यांचा पश्चिम महाराष्ट्र दौरा आणि दुसरीकडे सरकारची उपसमितीची बैठक, यामुळे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा राजकीय आणि प्रशासकीय हालचालींना वेग आला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या सातारा दौऱ्यातील सभा आणि बैठकींमध्ये ते मराठा आरक्षण, कुणबी नोंदी, कुणबी प्रमाणपत्रे आणि 29 ऑगस्टच्या आंदोलनाबाबत काय भूमिका मांडतात, याकडे मराठा समाजासह राज्याचे लक्ष लागले आहे.