राजकारणात एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करणारे नेते जेव्हा एकाच मंचावर येतात, तेव्हा काहीतरी वेगळेच राजकीय रंग पाहायला मिळतात. असाच एक प्रसंग परळीत पाहायला मिळाला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते आणि आमदार धनंजय मुंडे एकाच मंचावर आले होते. यावेळी बोलताना सुषमा अंधारे यांनी धनंजय मुंडे यांना थेट मंत्रीपदाच्या आणि 'भावाचं राज्य येऊ दे' अशा अनोख्या शुभेच्छा दिल्या, ज्यामुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे. नेमके काय म्हणाल्या सुषमा अंधारे? परळीमध्ये आयोजित एका सार्वजनिक कार्यक्रमात सुषमा अंधारे आणि धनंजय मुंडे एकाच मंचावर उपस्थित होते. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना अंधारे यांनी धनंजय मुंडेंच्या लोकप्रियतेचे आणि मतदारसंघातील त्यांच्या पकडीचे कौतुक केले. त्या म्हणाल्या, "तुम्ही अडीच तास उशिरा आलात, तरीही ही माणसं इथे थांबली आहेत, हे याचंच प्रमाण आहे की पदं येतील आणि जातील, पण तुमची लोकांमधील क्रेझ कायम आहे. अर्थात तुम्हाला 'माजी' म्हणायला आमच्या जीवावर आताही येतंय. देव करो आणि पुढच्या दिवाळीला आम्ही तुमचा उल्लेख 'माजी' म्हणून अजिबात करू नये."
'इडा-पिडा टळू दे आणि भावाचं राज्य येऊ दे' अंधारे पुढे म्हणाल्या, "परळीला कायम सत्ता केंद्रासोबत ठेवायची सवय आहे, त्यामुळे केंद्र आपल्यासोबत असलं पाहिजे. जिथं आपण दिवाळीत 'इडा-पिडा जाऊ दे आणि बळीचं राज्य येऊ दे' म्हणतो, परंतु माझ्यासारख्या बहिणीला कायम लक्षात राहील आणि आजच्या दिवशी भाऊ, तुम्हाला या खास शुभेच्छा असतील आमच्याकडून की, 'इडा-पिडा जाऊ दे आणि भावाचं राज्य येऊ दे. भाऊ माझा मंत्री होऊ दे, भावाला माझं सुख लाभू दे." राजकीय चर्चांना उधाण सुषमा अंधारे या त्यांच्या आक्रमक भाषणांसाठी आणि विरोधकांवर, विशेषतः महायुतीच्या नेत्यांवर, कठोर टीका करण्यासाठी ओळखल्या जातात. मात्र, धनंजय मुंडे यांच्यासोबत एकाच मंचावर आल्यानंतर त्यांनी बहिणीच्या नात्याने दिलेल्या या शुभेच्छा सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत.