मुंबईत रात्रभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे घाटकोपर-साकीनाका परिसरात एक अत्यंत भीषण दुर्घटना घडली आहे. येथील चिरागनगर परिसरात गौसिया चाळीवर अचानक डोंगराचा मोठा कडा (दरड) कोसळल्याने दोन ते तीन घरे ढिगाऱ्याखाली दबली गेली आहेत. या दुर्घटनेत आतापर्यंत दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली असून, आणखी 5 ते 6 जण या ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. पहाटेच्या गाढ झोपेतच काळ आला! स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्रभर पावसाचा जोर कायम होता. याच दरम्यान, पहाटे 3 ते 4 वाजण्याच्या सुमारास अचानक डोंगराचा काही भाग खचला आणि माती, तसेच दगडांचे मोठे ढिगारे खाली असलेल्या दोन-तीन घरांवर येऊन कोसळले. सर्वजण गाढ झोपेत असतानाच हा प्रकार घडल्याने घरातील नागरिकांना जीव वाचवून बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही. अरुंद गल्ल्यांमुळे अडथळे- महापौर महापौर रितू तावडे यांनी दुर्घटनास्थळी भेट देऊन बचावकार्याची पाहणी केली.
काही जण अद्याप ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती असून अग्निशमन दल, मुंबई महापालिका आणि इतर यंत्रणा युद्धपातळीवर मदतकार्य करत असल्याचे त्यांनी सांगितले. परिसरातील अरुंद गल्ल्यांमुळे यंत्रसामग्री नेणे शक्य नसल्याने दगड आणि माती हाताने हटवावी लागत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दोन मृतदेह हाती; युद्धपातळीवर बचावकार्य सुरू घटनेची माहिती मिळताच घाटकोपर पोलीस, अग्निशमन दल, मुंबई महानगरपालिका (BMC) आणि आपत्ती व्यवस्थापन दलाच्या (NDRF) पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. या दुर्घटनेबाबत माहिती देताना पोलीस उपायुक्त (DCP) गणेश शिंदे म्हणाले, “पहाटे 3 वाजेच्या सुमारास पावसामुळे घाटकोपर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हे भूस्खलन झाले आहे. बचाव पथकांनी आतापर्यंत ढिगाऱ्याखालून दोन मृतदेह बाहेर काढले आहेत.
अद्याप 4 ते 5 लोक आत अडकले असण्याची शक्यता असून, सर्व संबंधित यंत्रणांकडून बचावकार्य अत्यंत वेगाने सुरू आहे.” सध्या घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली असून, बचावकार्यात अडथळा येऊ नये यासाठी प्रशासनाने संपूर्ण परिसराची नाकेबंदी केली आहे. तसेच, आजूबाजूच्या घरांनाही धोका असू शकतो, त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक त्या सर्व उपाययोजना प्रशासनाकडून केल्या जात आहेत. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी बचाव पथकांची धडपड सुरू आहे. हेही वाचा.. मुंबई- आगीत अडीच वर्षांच्या मुलासह दोघांचा मृत्यू:चौघांवर रुग्णालयात उपचार सुरू; अग्निशमन दल घटनास्थळी; कारण अस्पष्ट मुंबईतील विलेपार्ले परिसरात मंगळवारी रात्री एका निवासी इमारतीला लागलेल्या आगीत अडीच वर्षांच्या मुलासह दोघांचा मृत्यू झाला. ही आग इमारतीच्या 11 व्या मजल्यावर आग लागली. अग्निशमन दलाने दोन महिला, एक पुरुष आणि एका मुलासह चार जणांना वाचवून रुग्णालयात पाठवले. शांता भवन नावाच्या इमारतीत रात्री 10 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. महापालिका अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे.