"या सरकारने सगळ्यांवर अन्याय केला आहे. धनगरांवर अन्याय केला, मायक्रो ओबीसींचे वाटोळे केले, बंजारा समाजाचे वाटोळे केले, आदिवासींचा उद्ध्वस्त कार्यक्रम लावला आणि आता दलित-मुस्लिमांचाही कार्यक्रम लावून टाकला आहे. ही जी खदखद आहे, ती कुठेतरी बाहेर काढावी लागते. त्यासाठी मराठा समाजाने एकजूट असणे खूप महत्त्वाचे आहे," असा घणाघाती आरोप मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. छत्रपती संभाजीनगर येथील गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना त्यांनी आज (16 ऑगस्ट) पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी राज्य सरकार, चंद्रशेखर बावनकुळे, संजय शिरसाट आणि मराठा समाजाच्या पुढील रणनीतीवर सविस्तर भाष्य केले.
बावनकुळे आणि शिरसाटांचा जातीय तेढ निर्माण करण्याचा डाव चंद्रशेखर बावनकुळे आणि संजय शिरसाट यांच्यावर थेट निशाणा साधत जरांगे पाटील म्हणाले, "बावनकुळे आणि शिरसाट यांनी मराठा समाज उद्ध्वस्त करण्याचे ठरवले आहे. त्यांनी जो जातीय तेढ निर्माण केलाय आणि मराठ्यांवर जो अन्याय करण्याचे ठरवले आहे, तो आपल्याला मोडून काढावाच लागेल. त्यांना 28 तारखेपर्यंत वेळ दिला आहे, त्यानंतर पुढची रणनीती आपण ठरवू. पण मराठ्यांच्या लेकरांचे एकही कुणबी प्रमाणपत्र रद्द होऊ द्यायचे नाही आणि जाऊ द्यायचे नाही." 29 ऑगस्टला अंतरवाली सराटीत यायचेच! आंदोलनाची पुढची दिशा स्पष्ट करताना त्यांनी सर्व मराठा बांधवांना 29 ऑगस्ट रोजी अंतरवाली सराटी येथे जमण्याचे आवाहन केले आहे. "ज्यांना कुणबी नोंदी सापडूनही अधिकाऱ्यांनी प्रमाणपत्रे दिली नाहीत. ज्यांना प्रमाणपत्रे मिळाली, पण अधिकारी जाणीवपूर्वक जात पडताळणी देत नाहीत. ज्यांनी कुणबी कोट्यातून ॲडमिशन घेतले आहे, पण व्हॅलिडिटी नसल्यामुळे अडचण येत आहे. ईडब्ल्यूएस आणि एसईबीसी मधून निवड होऊनही ज्या उमेदवारांना शासनाने अद्याप नियुक्तिपत्रे दिली नाहीत.
सारथी (आणि अण्णासाहेब पाटील महामंडळांतर्गत ज्यांचे व्याज परतावे प्रलंबित आहेत. ...या सर्व घटकांनी आपले अर्ज घेऊन 29 ऑगस्ट रोजी अंतरवाली सराटीत यायचे आहे. जोपर्यंत नियुक्ती आणि कामे मार्गी लागत नाहीत, तोपर्यंत इथून कुणीही माघारी जायचे नाही," असा स्पष्ट मत जरांगे यांनी व्यक्त केले. नेत्यांचे पाय चाटणाऱ्यांनी इकडे येऊ नये काही अभ्यासक आणि नेत्यांवर टीका करताना ते म्हणाले, "काहींचा सरकार आणि नेत्यांना खुश करण्यासाठी डाव सुरू आहे. त्यांना समाजाचे हित बघायचे नाहीये, तर दोन्ही डगरींवर पाय ठेवून फक्त आपले स्वार्थ साधायचे आहेत. अशा 'दोन खेळी'वाल्यांना मी इथून पुढे टिकून देणार नाही. ज्यांना सोशल मीडियावर आणि नेत्यांपुढे बोंबलायचे आहे, त्यांनी तिकडेच राहावे, अंतरवालीत पाय ठेवायची गरज नाही." गावोगावी बैठका घ्या, वाट बघू नका मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील बांधवांना आवाहन करताना जरांगे म्हणाले, "माझी तब्येत सध्या खराब आहे, त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र किंवा इतर भागात दौरा शक्यतो होणार नाही. पण विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील बांधवांनी माझी वाट पाहू नये.
तुम्ही आपापल्या गावात, घराघरात बैठका सुरू करा आणि 29 ऑगस्टला अंतरवालीत येण्याचे नियोजन करा. यावेळेस मराठ्यांचा शेवटचा आणि निर्णायक लढा करायचा आहे." तुमची खुन्नस, तर आमचीही खुन्नस राज्य सरकारला थेट इशारा देताना जरांगे यांनी सांगितले, “यांनी फडणवीस आणि शिंदे यांना बोलल्यामुळे खुन्नस धरून मराठ्यांची प्रमाणपत्रे रद्द करण्याचे किंवा न देण्याचे धोरण अवलंबले आहे. जर तुम्ही खुन्नस धरून मराठ्यांचे वाटोळे करणार असाल, तर आम्हीही खुन्नस धरून तुमचा राजकारणात पूर्ण वाटोळा करून टाकू. तुमचा एकही उमेदवार निवडून येऊ देणार नाही, मग त्याऐवजी दुसरा कुणी आला तरी चालेल.” मनोज जरांगे पाटील यांनी आता थेट कागदपत्रे आणि अर्जांसह सरकारला घेरण्याची तयारी सुरू केल्याने, 29 ऑगस्टला अंतरवाली सराटीत होणाऱ्या या महामेळाव्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.