बार्शी तालुक्यातील कळंबवाडी (पा.) ते पानगाव तसेच कळंबवाडी (पा.) ते ढाळे पिंपळगाव या दोन्ही रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याच्या मागणीसाठी ॲड. विकास जाधव यांनी 15 ऑगस्टपासून बार्शी तहसील कार्यालयापुढे बेमुदत उपोषण करण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे. निवेदनात म्हटले की, कळंबवाडी (पा.) ते पानगाव या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून, रस्त्याची अक्षरशः दुरवस्था झाली आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी तसेच वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत आहे. तसेच कळंबवाडी (पा.) ते ढाळे पिंपळगाव या रस्त्याचे कामही अपूर्ण अवस्थेत असून, काही ठिकाणी केवळ खडी अंथरून रस्ता सोडण्यात आला आहे.
या रस्त्याच्या कामासाठी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मंजुरी मिळालेली असतानाही काम पूर्ण झाले नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. संबंधित ठेकेदाराने काम न करता बिल उचलल्याची माहिती असल्याचा आरोपही करण्यात आला असून, याप्रकरणी संबंधित अधिकारी व ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. दोन्ही रस्त्यांची तातडीने पाहणी करून दुरुस्तीचे काम सुरू करावे, तसेच अपूर्ण रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करावे, अशी मागणी ॲड. जाधव यांनी केली आहे. दरम्यान या आंदोलनाला कळंबवाडी गावातील तरुणांनी पाठिंबा दर्शवला आहे.