नीरा उजवा कालवा विभागातील पाण्याच्या आवर्तनाला राजकीय हस्तक्षेप, मनुष्यबळाचा प्रचंड तुटवडा आणि बेसुमार पाणी चोरीचा फटका बसला आहे. एकीकडे तिसंगी तलाव अद्याप कोरडाठाक पडलेला असताना दुसरीकडे कालव्यातून सोडलेले पाणी अपेक्षित गतीने पुढे सरकत नसल्याने लाभक्षेत्रातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. तिसंगी तलावात पाणी तातडीने सुरू करण्यासाठी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. नीरा उजवा कालवा विभाग मात्र या कोंडीत हतबल झाल्याचे दिसत आहे. नीरा उजवा कालव्यास 14 जुलैपासून वीर धरणातून सोडलेले पाणी सुरू आहे.
पंढरपूर तालुक्यातील रांजणी ते उंबरगाव, तिसंगी गावापर्यंतच्या लाभक्षेत्रातील उभ्या पिकांना प्राधान्यक्रमाने पाणी सोडण्यात आले आहे. परंतु वरच्या तालुक्यातील राजकीय नेत्यांचा हस्तक्षेप, कासेगाव, टाकळी, अनवली, बोहाळी, उंबरगाव, खर्डीसारख्या मोठ्या गावातील बड्या बागायतदार शेतकऱ्यांची शेततळी भरण्यापासून ते सांगोला आणि माळशिरस तालुक्यात पाणी वळवणे असे प्रकार वाढले आहेत.
त्यामुळे 35 दिवस झाले तरीही बोहाळी हद्दीपर्यंत पाण्याचे आवर्तन आलेले नाही. याच दरम्यान पाच नंबरचे गेट काढून सांगोला तालुक्यात पाणी चालू झाले आहे. तिसंगी हद्दीतील दारे काढून कालव्यातून पाणी पळवले जात असल्याचे समोर आले आहे. यामुळे आवर्तन विस्कळीत झालेले आहे. तलाव कोरडा राहिल्याने आणि आवर्तनाचा बोजवारा उडाल्याने तिसंगी तलाव लाभक्षेत्रातील शेतकरी कमालीचे संतापले आहेत. राजकीय हस्तक्षेप थांबवून पाणी चोरीवर तत्काळ बंदी घालावी आणि तलाव पूर्ण क्षमतेने भरावा, अन्यथा रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा संतप्त शेतकऱ्यांनी दिला आहे. डिझेल अनुदान नाही म्हणून झाडा-झुडुपांनी कालवा पोखरला नीरा उजवा कालव्याचे सुमारे 20 वर्षांपूर्वी अस्तरीकरण झालेले आहे.
कालव्याच्या दोन्ही बाजूनी प्रचंड प्रमाणात झाडे, झुडपे वाढलेली आहेत. डिझेल अनुदान वेळेवर मिळत नसल्यामुळे यंत्रसामग्री असूनही कालव्यातील झाडे, झुडपे आणि अडथळे काढण्याचे काम ठप्प झाले आहे. नीरा उजवा कालवा विभागाकडे प्रचंड कमतरता आहे. क्षमतेच्या आणि गरजेच्या केवळ 25 टक्के कर्मचारी उपलब्ध आहेत.
एकूण आवश्यक 80 कर्मचाऱ्यांपैकी प्रत्यक्षात केवळ 20 कर्मचारी कार्यरत आहेत. पाण्याचे आवर्तन सुरळीत पार पाडण्यासाठी 40 पाटकऱ्यांची गरज असताना फक्त 15 पाटकरी उपलब्ध आहेत, आणि या पैकी 4 महिला कर्मचारी आहेत. 25 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबरपर्यंत पाणी सोडणार सध्या पावसाअभावी उभ्या पिकांना पाणी द्यावे लागत असले, तरी प्रशासनाकडून 25 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर या कालावधीत नीरा उजवा कालवा पूर्ण क्षमतेने चालवण्याचे नियोजन आहे. या काळात तिसंगी तलाव जास्तीत जास्त भरून घेतला जाईल, असा दावा प्रशासनाकडून केला जात आहे.