News Image

तनिषाच्या प्रसूतीसाठी 10 लाख रुपये का मागितले?:रुग्णालयाने स्पष्ट केले कारण; गर्भधारणेत जोखीम असल्याची पूर्वकल्पना दिल्याचा दावा


दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर कारवाईची मागणी केली जात असतानाच आता दुसरी बाजू समोर आली आहे. रुग्णालयाच्या प्रशासनातर्फे एक अहवाल सादर करण्यात आला आहे. या अहवालात डॉक्टरांनी भिसे कुटुंबाला पूर्वीच प्रेगनन्सीसंदर्भात जोखीम असल्याची कल्पना देण्यात आली असल्याचे म्हटले आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने तज्ञांची समिती स्थापन केली होती. या तज्ञांनी समितीचा अहवाल सादर केला आहे. संचालक डॉ. धनंजय केळकर, डॉ. अनुजा जोशी, डॉ. समीर जोग आणि डॉ. सचिन व्यवहारे या चौघांची समिती नेमण्यात आली होती. त्यांनी सादर केलेल्या अहवालानुसार, सौ. भिसे या 2022 पासून रुग्णालयात वेळोवेळी उपचार घेत असल्याचे म्हटले आहे. तसेच 2022 मध्ये सदर महिलेवर 50 टक्के चॅरिटीचा लाभ घेऊन शस्त्रक्रिया झाल्याचे देखील यात म्हटले आहे. 2023 साली रुग्णाला रुग्णालयातर्फे सुखरूप गर्भार्पण व प्रसूती शक्यता नसल्याने मुल दत्तक घेण्याविषयी सल्ला देण्यात आला होता. अहवालात पुढे म्हटले आहे की, सर्व रुग्णालयांचा असा संकेत असतो की आई व बाळाच्या सुरक्षेसाठी प्रसूतिपूर्व तपासणी कमीत कमी 3 वेळा करून घेणे आवश्यक असते तो त्यांनी (मृत सौ. भिसे) या रुग्णालयात केला नाही व याची रुग्णालयास माहिती नाही. 15 मार्च रोजी इंदिरा आयव्हीएफचे रीपोर्ट घेऊन त्या डॉ. घैसास यांना भेटल्या. अतिशय जोखमीचे व धोकादायक प्रेगनन्सीबद्दल डॉ. घैसास यांनी त्यांना माहिती दिली होती. तसेच 7 दिवसांनी त्यांना तपासणीसाठी बोलावले होते. त्यानुसार 22 तारखेला येणे अपेक्षित होते, मात्र त्या आल्या नाहीत, असे या अहवालात म्हटले आहे. पुढे अहवालात म्हटले की, 28 मार्च 2025, शुक्रवार रोजी सकाळी 11.30 वाजता सदर रुग्ण पती व नातेवाईक डॉ. घैसास यांच्या बाह्यरुग्ण विभागात आले होते. ते इमर्जन्सीमध्ये आले नव्हते याची कृपया नोंद घ्यावी. डॉ. घैसास यांनी रुग्णाची तपासणी केली. तपासणीनंतर असे दिसून आले की रुग्ण पूर्ण बरी होती व कुठल्याही तातडीच्या उपचाराची गरज नव्हती असे सांगण्यात आले. परंतु जोखमीची अवस्था लक्षात घेता अबॉरशनसाठी भरती होण्याचा सल्ला देखील डॉक्टरांनी दिला होता. त्याचसोबत प्रेगनन्सी व संबंधित धोक्यांची माहिती देण्यात आली होती. तसेच नवजात अर्भक कक्षाच्या डॉक्टरांची भेट त्यांची करून देण्यात आली होती. कमी वाजनांची 7 महिन्यांची जुळी मुले, जुन्या आजाराची गुंतागुंत व कमीत कमी दोन ते अडीच महिन्याचे उपचार लागतील हे समजावून सांगितले व रुपये 10 ते 20 लाख खर्च एकंदर येऊ शकतो याची कल्पना देण्यात आली. त्यावर रुग्णाच्या नातेवाईकांनी तुम्ही भरती करून घ्या व मी प्रयत्न करतो असे सांगितले, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. रुग्णाच्या नातेवाईकांनी वैद्रद्यकीय संचालक डॉक्टर केळकर यांना फोन केला व आपली अडचण सांगितली. त्यावर डॉक्टर केळकरांनी जमतील तेवढे पैसे भरा (नातेवाईकांप्रमाणे रुपये 2 ते 2.5 लाख), म्हणजे मी डॉक्टर घैसास यांना सांगतो, असे सांगितले. असाच सल्ला एका दूरच्या नातेवाईकांना श्री सचिन व्यवहारे यांनी फोनवर दिला. रुग्णाचा कोणीही नातेवाईक प्रशासन अथवा चॅरिटी डिपार्टमेंट इथे प्रत्यक्ष भेटला नाही याची कृपया नोंद घ्यावी. जेव्हा डॉक्टर केळकर यांचे ऑपेरेशन संपले व त्यांनी डॉक्टर घैसास यांना फोन केला तेव्हा त्यांनी रुग्ण न सांगता निघून गेल्याचे कळवले. डॉक्टर घैसास ह्यांना असे वाटत होते की रुग्ण पैश्याची तजवीज करत आहे. तशी तजवीज न झाल्यास रुग्णाच्या पतीला ससून येथे जाण्याचा सल्ला दिला होता. जेणेकरून आईची गुंतागुंतीची शस्त्रक्रिया व होणाऱ्या अपुऱ्या वाढीच्या गर्भाची शुश्रूषा ससून येतील NICU मध्ये व्यवस्थित होईल. दरम्यानच्या काळात एका नर्सने रुग्ण /नातेवाईक आपली बॅग उचलून चालत गेल्याचे सांगितले. थोड्या वेळाने रुग्णाच्या नातेवाईकांकडून काहीच हालचाल न झाल्याने डॉ. घैसास यांनी रुग्णाच्या पतीला फोन केला, तो त्यांनी उचलला नाही. त्यामुळे २८ मार्च च्या दुपारनंतर रुग्णाचे काय झाले याबद्दल डॉ. घैसास व रुग्णालय प्रशासन यांना काहीच कल्पना नव्हती.यानंतर डेली मिररमध्ये आलेल्या बातमीनंतर सर्वांना कळले की रुग्णाचा सिझेरियनमध्ये झालेल्या गुंतागुंती मुळे मृत्यू झाला. वृत्तपत्रातील माहिती प्रमाणे, 28 मार्च रोजी सायंकाळी 5.30 वाजता सूर्या हॉस्पिटल वाकड येथे भरती झाली व 29 मार्च राजी सकाळी सिझेरियन झाले. दीनानाथमधून सदर रुग्ण ससून व तिथून सूर्या हॉस्पिटलमध्ये स्वतःच्या गाडीने गेला व सिझेरियन सुद्धा दुसऱ्या दिवशी झाले ह्याची नोंद घ्यावी. तसेच सूर्या हॉस्पिटलमधील माहितीनुसार आधीच्या ऑपरेशनची व कॅन्सर संबंधीची व तिच्या नातेवाईकांनी माहिती लपवून ठेवली असे समजते, असे रुग्णालयाकडून आलेल्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.