
महाराष्ट्रातील एक बकरा खाटकाच्या लाकडावर उभा:संजय राऊत यांचे शिंदे - अमित शहा भेटीवर भाष्य; बकऱ्याचा फोटो पोस्ट करत उडवली खळबळ
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी एका बकऱ्याचा फोटो पोस्ट करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. या फोटोवर भाष्य करताना महाराष्ट्रातील एक बकरा खाटकाजवळ उभा असून, त्याला कापण्यासाठी लाकडावर उभे करण्यात आले आहे, असे ते म्हणालेत. त्यांचा रोख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीकडे होता असा दावा केला जात आहे. एकनाथ शिंदे यांनी शनिवारी अमित शहा यांची भेट घेतली. संजय राऊत यांनी शनिवारी या भेटीवर भाष्य करताना उभय नेत्यांवर सडकून टीका केली. तत्पूर्वी, शुक्रवारी त्यांनी एक्सवर बकऱ्याचा एक फोटो पोस्ट केला होता. हा बकरा लाकडाच्या ओंडक्यावर उभा होता. तसेच त्याच्याखाली ए सं शी गट असा उल्लेख केला होता. पत्रकारांनी शनिवारी त्यांना त्यांच्या या पोस्टचा अर्थ विचारला असता त्यांनी महाराष्ट्रातील एक बकरा खाटकाच्या लाकडावर उभा असल्याची खोचक टिप्पणी केली. तसेच या ट्विटचा तुम्हीच अभ्यास करा, असेही ते म्हणाले. एकनाथ शिंदे यांना बकऱ्याची उपमा संजय राऊत म्हणाले, तुम्ही सगळेजण पत्रकार आहात. तुम्ही त्या फोटोचा अर्थ काढू शकता. महाराष्ट्रातला एक बकरा आहे. हा बकरा सध्या खाटकाच्या लाकडावर उभा आहे. तुम्ही ते लाकूड पाहिले असेल. गावात, खाटकाच्या दुकानात ते पाहिले असेल. तसे महाराष्ट्रातल्या एका बकऱ्याला खाटकाच्या लाकडावर उभे करण्यात आले आहे. त्याला दिल्लीतून सांगितले आहे की, फार शहाणपणा केलास तर मान उडवेन. गप्प उभे राहायचे आणि बे बे करायचे. त्या बकऱ्याच्या कानात दिल्लीत कुणीतरी सांगितले आहे. ए सं शी गट म्हणजे काय ते तुम्हाला कळले पाहिजे. पुढच्या दोन ते तीन दिवसांत माझ्या ट्वीटचा अर्थ तुम्हाला कळेल. आज अमित शाह महाराष्ट्रात येत आहेत. मी सध्या बोलणार नाही. मात्र एवढेच सांगू इच्छितो की आता बकरा कापण्याची सगळी तयारी झाली आहे. वेळ आल्यावर मी सांगेनच किंवा त्याआधी तुम्हालाही कळेल. उल्लेखनीय बाब म्हणजे उद्धव ठाकरे सातत्याने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचा उल्लेख एसंशि म्हणून करत आहेत. एसंशि म्हणजे एकनाथ संभाजी शिंदे. उद्धव यांची री ओढत संजय राऊत यांनीही शिवसेनेचा उल्लेख एसंशी असा केला आहे. फडणवीसांनी नुसती चिडचिड सुरू संजय राऊत यांनी यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही टोला हाणला. देवेंद्र फडणवीस यांनी आमचा उल्लेख मूर्ख असा केला. ठीक आहे. पण माझा त्यांना सल्ला आहे की, एवढी चिडचिड करू नका. कारण, जेव्हा समोरचा माणूस सत्य बोलतो आणि आपल्याकडे त्याला उत्तर द्यायला काहीही नसते तेव्हा अशी चिडचिड होते. देवेंद्र फडणवीस यांना मी प्रश्न विचारतो, तेव्हा त्यांच्याकडे द्यायला उत्तर नाही. त्यामुळे ते अशी चिडचिड करत आहेत, असे ते म्हणआले.