
मनसेकडून मुख्यमंत्र्यांना 'हिंदीहृदयसम्राट'ची खोचक उपाधी:मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी म्हणत देवेंद्र फडणवीसांना डिवचले
राज्यात सक्तीच्या हिंदीविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना एकत्र येत 5 जुलै रोजी मुंबईत विराट मोर्चा काढणार आहेत. या मोर्चाची जय्यत तयारी सुरू झाली असून दोन्ही पक्षांकडून जोरदार नियोजन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर मनसेकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ट्विटरवरून डिवचण्यात आले आहे. मनसेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना “हिंदीहृदयसम्राट” अशी उपाधी देत, “मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवक” अशी टीका केली. राज्यात शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी शिकवण्याच्या निर्णयाविरोधात राज्यभरात रोष आहे. अनेकांनी एकमुखाने या निर्णयाविरोधात आवाज उठवला असून सरकारने निर्णय मागे घ्यावा अशी मागणी केली जात आहे. मात्र, अद्याप शासनाच्या पातळीवर ठोस निर्णय झालेला नाही. भाजप सरकार हिंदी सक्तीचा अजेंडा पुढे रेटत असताना, महायुतीतील इतर घटक पक्ष म्हणजेच शिवसेना शिंदे गट आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात मात्र संमिश्र भूमिका दिसून येत आहे. यामुळे महायुतीमध्येही मतभेदाचे चित्र स्पष्ट झाले आहे. दरम्यान, मनसे आणि उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या मोर्चाला काँग्रेस आणि शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही पाठिंबा मिळाला आहे. त्यामुळे 5 जुलै रोजी होणाऱ्या मोर्चाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. अमेय खोपकर यांचा मराठी कलाकारांना इशारा दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून मराठी कलाकारांना मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “ज्या मराठी भाषेमुळे, मराठी प्रेक्षकांमुळे आपण मोठे झालो त्यांची आठवण ठेवून कृतज्ञतेने मोर्चात सहभागी व्हा.” तसेच, 5 जुलै रोजी मराठी मालिकांचे आणि चित्रपटांचे शूटिंग बंद ठेवण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. मोर्चाची वेळच येऊ नये, असा आमचा प्रयत्न हिंदीच्या मुद्द्यावर मोर्चाची वेळच येऊ नये, असा आमचा प्रयत्न आहे. चर्चेतून चांगला मार्ग निघू शकतो, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. तर आज आमची कॅबिनेट आहे त्यामध्ये आम्ही या विषयावर चर्चा करु, असे अजित पवारांनी म्हटले आहे. कोणतीही आघाडी किंवा युती असेल तर थोडाफार मतप्रवाह वेगळा असू शकतो, पण राज्याच्या हिताचे काय आहे जनतेच्या हिताचे काय, भवितव्याच्या दृष्टीने काय महत्त्वाचे आहे हे पाहणं महत्त्वाचे असते. त्यावर चर्चा करायची असते, चर्चेतून मार्ग निघतो, असेही अजित पवार म्हणाले.