
धूर ओकणारे कारखाने येऊ देणार नाही:नाशिकमध्ये चौपदरी डबलडेकर उड्डाणपुलासाठी पुढाकार घेणार; मंत्री छगन भुजबळ यांची ग्वाही
नाशिकचे पर्यावरण चांगले आहे. ते कायम राखणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत धूर ओकणारे कारखाने शहरात येऊ देणार नाही, अशी ठाम भूमिका राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी मांडली. ‘दिव्य मराठी’च्या नाशिक कार्यालयात १४व्या वर्धापन दिनानिमित्त ‘दहा दिवस, दहा मंत्री’ या विशेष उपक्रमात उपस्थित राहून त्यांनी विविध क्षेत्रांतील मान्यवरांशी साधलेला हा संवाद... ॲड. नितीन ठाकरे, सरचिटणीस, मविप्र समाज संस्था
प्रश्न : सिंहस्थ कुंभमेळा एक वर्षावर आला आहे. गोदावरी प्रदूषणमुक्त होणार का? त्यासाठी निधी वाढवून देणार का?
छगन भुजबळ यांचे उत्तर : गोदावरी प्रदूषणमुक्तीसाठी शासनाने खास आराखडा तयार केला आहे. सिंहस्थानिमित्त गोदाप्रेमी संघटनांना सोबत घेऊन आम्ही काम सुरू केले आहे. गोदावरीचे पाणी तीर्थ म्हणून पिण्यायोग्य करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. गौरव ठक्कर, अध्यक्ष, क्रेडाई
प्रश्न : कुंभमेळ्यात जास्तीत जास्त लोकांचा सहभाग वाढवण्यासाठी काय करणार? ब्रॅण्ड अम्बेसेडर नियुक्त करणार का?
उत्तर : कुंभमेळ्याचे काम मी पहात नाही. मात्र, तुमच्या सूचना योग्य ठिकाणी पोहोचवल्या जातील. मागील काळात आउटर रिंगरोड केले, विमानतळही उभारले. सप्तशृंग गडावर फनिक्युलर ट्रॉली बसवली. ॲड. जयंत जायभावे, माजी अध्यक्ष, बार असोसिएशन
प्रश्न : नाशिकच्या सांस्कृतिक जीवनाचा ऱ्हास होत आहे. तरुणांमध्ये ड्रग्जचे प्रमाण वाढले आहे. सरकारची भूमिका काय?
उत्तर : सरकाररमध्ये नाशिकचे इतरही तीन मंत्री आहेत. माझ्याप्रमाणे त्यांनीही या महत्त्वाच्या प्रश्नाकडे लक्ष देण्याची गरज आहे. त्यामुळे मी मुख्यमंत्र्यांकडे, मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा मुद्दा उपस्थित करणार आहे. नीलेश चव्हाण, आर्किटेक्ट
प्रश्न : कुंभमेळ्याचे नियोजन आणि विविध यंत्रणा यांच्यात समन्वय साधण्यासाठी काय उपाययोजना करणार?
उत्तर : मागील सिंहस्थात जवळच्या इमारतीतील लोकांनी खाली येऊ नये, व्यवसाय बंद ठेवावे, असे आदेश होते. १० किमीपर्यंत बॅरिकेडिंग केले. मात्र, या वेळेस मुख्यमंत्र्यांशी संवाद साधून एआयचा वापर करून नियोजन करणार. अविनाश शिरोडे , बांधकाम व्यावसायिक
प्रश्न : कुंभमेळ्याच्या भूसंपादनाला गती येण्यासाठी काय करणार? शेतकऱ्यांना बेस रेट वाढवून देण्याचा विचार आहे का?
उत्तर : कुंभमेळ्यासाठी एमएमआरडीएकडून डीपी प्लॅनचे काम सुरू आहे. शेतकऱ्यांना तीनपट बेस रेट मिळावा यासाठी प्रयत्न करू. त्यासाठी शासनदरबारी पाठपुरावा करण्यात येईल. डॉ. ज्ञानेश्वर थोरात, संचालक, शताब्दी हॉस्पिटल
प्रश्न : शहर मेडिकल हब बनते आहे? त्यासाठी शासनाचे काय धाेरण असणार? त्यासाठी तुमचा प्राधान्यक्रम काय असेल?
उत्तर : आरोग्य विद्यापीठात १०० विद्यार्थी क्षमतेचे वैद्यकीय महाविद्यालय, ४३० खाटांचे रुग्णालय व पदव्युत्तर शिक्षण व संशोधन संस्था इमारतीसाठी ६०० कोटी मंजूर करून घेऊ. तीन महिन्यांत हे काम सुरू करण्याची योजना आहे. किशोर राठी, उपाध्यक्ष, निमा
प्रश्न : नाशिकचा विकास व्हावा यासाठी जास्तीत जास्त रिसर्च सेंटर होणे आवश्यक आहे. त्यासाठी काय करणार?
उत्तर : नाशिकमध्ये रिसर्च सेंटर उभारण्याबाबत नेमक्या कोणत्या अडचणी येतात याबाबतची माहिती संबंधित अधिकाऱ्यांकडून जाणून घेऊन त्या सोडवू. त्यामुळे रिसर्च सेंटर सुरू होण्यास काहीही अडचणी येणार नाहीत. कृणाल पाटील , माजी अध्यक्ष, क्रेडाई
प्रश्न : वाडीवऱ्हे ते समृद्धी या १६ किमी रस्त्याचे काम झाल्यास लवकर महामार्ग गाठता येईल. काय करणार?
उत्तर : आपली सूचना खूपच चांगली आहे. जुना रस्ता ४ लेनचा असून त्याची दुरुस्ती करण्याचा प्रयत्न करू. वाडीवऱ्हे ते समृद्धी महामार्ग या १६ किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे काम झाल्यास नाशिककरांना लवकर समृद्धी महामार्ग गाठता येईल. नागरिकांची दुहेरी टोलमधूनही सुटका होईल. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र देण्यात येईल. उत्तरा खेर , पर्यावरण अभ्यासक
प्रश्न : सर्वाधिक मोठ्या वायनरी असलेल्या भागात चांगला रस्ताच नाही. मग पर्यटक कसे येणार?
उत्तर : हे खरे आहे. त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्या भागात अनेक मोठमोठ्या लोकांचेही रिसॉर्ट आहेत. त्या भागातील लोकांनीही एकत्र येऊन चांगले रस्ते, पोलिस चौकीची स्थापना यासंदर्भात प्रयत्न करण्याची गरज आहे. मी यात लक्ष घालतो. तेथे रस्ते, वीज या सुविधा असाव्यात तसेच पोलिस चौकीही असावी यासाठी प्रयत्न केले जातील. सचिन बागड, बांधकाम व्यावसायिक
प्रश्न : सार्वजनिक वाहतूक प्रणालीचा वापर करण्याबाबत जनजागृतीसाठी सरकारने कोणती पावले उचलली?
उत्तर : दिल्ली, ठाणे, मुंबईप्रमाणे शहरात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था प्रभावीपणे राबवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आम्ही महापालिकेला पर्यावरणपूरक बस दिल्या. नागरिकांनीच सार्वजनिक वाहतूक प्रणालीचा वापर करावा. अनिल आहेर, उपाध्यक्ष, क्रेडाई
प्रश्न : नाशिकमधील तरुण रोजगारासाठी बाहेर जातात. नाशिकमध्ये रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी काय कराल?
उत्तर : कृषी, पर्यटनावर आधारित उद्योग वाढवण्याचे प्रयत्न करू. एज्युकेशन हब, मेडिकल हब, आयटी पार्कच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध होतील. मात्र, कोणत्याही परिस्थितीत धूर ओकणारे कारखाने येऊ देणार नाही. जांबुटके, सिन्नर, दिंडोरीला उद्योग उभारू. उमेश कोठावदे, उपाध्यक्ष, आयमा
प्रश्न : शहरात आयटी पार्क व्हावे, याबाबत तुमचे व्हिजन काय आहे?
उत्तर : नाशिकमध्ये आयटी पार्क व्हावे यासाठी राज्याच्या उद्योगमंत्र्यांनीही सकारात्मक भूमिका घेतली आहे. पुण्यातील हिंजवडी येथे आयटी पार्कसाठी सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत. तशाच प्रकारच्या सुविधा नाशिकमधील आयटी पार्कसाठी उपलब्ध व्हाव्यात यासाठी प्रयत्न करू. शिलापूरला इलेक्ट्रॉनिक्स गुड्ससाठी जागा घेतली. या प्रकल्पाची गती वाढविण्याचा प्रयत्न आहे. मिलिंद राजपूत, उद्योजक
प्रश्न : आपण सिंहस्थ कुंभमेळ्याचे स्वागताध्यक्ष व्हावे, अशी भावना आहे. याबाबत भूमिका काय आहे?
उत्तर : नाशिक हे माझे शहर आहे. मी शहरावर प्रेम करतो. मला कुठल्याही पदाची लालसा नाही आणि कुठले श्रेयही नको. मी आधी नाशिककर आहे. आमदार, मंत्री नंतर. राजेंद्र पानसरे, उद्योजक
प्रश्न : पाण्याअभावी डीएमआयसी प्रकल्प संभाजीनगरला गेला. नाशिकच्या आयटी पार्कसाठी काय प्रयत्न करणार?
उत्तर : नाशिकचा प्रकल्प संभाजीनगरला गेल्यावर किती लोकांनी त्याला विरोध केला? आता डीएमआयसीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी प्रयत्न करू. आयटी पार्कसाठी सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचा माझा प्रयत्न आहे. मंजूर शेख, सचिव, रहबर-ए-तालीम
प्रश्न : अल्पसंख्याक शाळांना मिळणारे अनुदान पाच वर्षांपासून बंद आहे. ते सुरू करण्यासाठी काय प्रयत्न करणार?
उत्तर : अल्पसंख्याक शाळांना मिळणाऱ्या अनुदानाबाबत शालेय शिक्षण विभागाकडून माहिती घेऊन त्वरित कारवाई करण्यात येईल. अल्पसंख्याक शाळांचे आणखी काही प्रश्न असतील तर संबंधित मंत्र्यांशी चर्चा करावी. मकसूद साबीर अली पीरजादे, ट्रस्टी, बडी दर्गाह
प्रश्न : आयटी पार्कसाठी स्पेशल टॅक्स बेनिफिट दिल्यास उद्योग येतील. त्यासाठी प्रयत्न करणार का?
उत्तर : तुमची सूचना चांगली आहे. त्यासाठी प्रयत्न केले जातील. आयटी उद्योगाला सुरुवातीची पाच वर्षे टॅक्स बेनिफिट देण्याबाबतचा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळासमोर मांडला जाईल. पतंगराव कदम मंत्री असताना आम्ही मोठी इमारत बांधली. पण तिथे कोणीही आले नाही. गुजरातमध्ये मल्टिप्लेक्स आहेत, आपल्याकडे का नाही, असा प्रश्न मी तेव्हा उपस्थित केला होता.
द्वारका- नाशिकरोड चौपदरी डबलडेकर उड्डाणपुलासाठी घेणार पुढाकार शहरात द्वारका सर्कल येथे वाहतुकीची समस्या गंभीर आहे. त्यामुळे सारडा सर्कल ते नाशिकरोड येथील घंट्या म्हसोबा मंदिरापर्यंत चौपदरी डबलडेकर उड्डाणपुलासाठी पुढाकार घेणार, अशी ग्वाही भुजबळ यांनी दिली. ‘भविष्यात देशातील स्वच्छ, सुंदर शहरांपैकी एक शहर अशी नाशिकची ख्याती असावी यादृष्टीने काम करण्यात येईल. उद्योजकांच्या मागणीनुसार इलेक्ट्रॉनिक टेस्टिंग लॅबचा प्रकल्प सुरू करण्यासाठी प्रयत्नशील आहे. नाशिकला शैक्षणिक, वैद्यकीय आणि पर्यटन हब बनविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आयटी उद्योगाला सुरुवातीची ५ वर्षे टॅक्स बेनिफिट देण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर मांडला जाईल. दिल्लीच्या धर्तीवर हाट बाजार उभारण्याची गरज
दिल्लीच्या धर्तीवर नाशिकमध्ये हाट बाजार उभा करण्याची गरज आहे. नमामि गोदा (गोदावरी नदी स्वच्छतेसाठी कालबद्ध कार्यक्रम) प्रकल्पासाठी निधी आणणार, याशिवाय नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे, सुरत-चेन्नई ग्रीन फील्ड रोड, नाशिक मेट्रो, गोवर्धन-नाशिकसह दोन ठिकाणी कृषी टर्मिनल, एअर क्लिनिंग प्रोग्रामांतर्गत इलेक्ट्रिक बस, द्वारका ते नाशिकरोड चौपदरी डबलडेकर उड्डाणपूल, गोवर्धन कलाग्राममधील अपूर्ण कामे पूर्ण करून घेणे, नाशिक शहरातील जुने गावठाण पुनर्विकास योजनेसाठी प्रयत्न करणार. गुगुळ, पायरपाडा, चिमणपाडा, कळमुस्ते, अंबड, कापवाडी, आंबोली-वेळुंजे इ. प्रवाही वळण योजना, पार गोदावरी एकात्मिक नदी जोड योजना (९.७५ टीएमसी), दमणगंगा-वैतरणा-गोदावरी (कडवा देव) नदी जोड प्रकल्प (७.१३ टीएमसी), दमणगंगा-एकदरे-गोदावरी नदी जोड प्रकल्प (५ टीएमसी), नार-पार-गिरणा नदी जोड प्रकल्प (१०.७६ टीएमसी), भावली धरण पर्यटन विकास, ओझरखेड धरण पर्यटन विकास आदी योजना आणणार आहोत. आयटी पार्क, लॉजिस्टिक पार्क, ॲग्रीकल्चर कन्व्हेन्शन सेंटर
आयटी पार्कसाठी सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. आयटी उद्योगाला सुरुवातीची पाच वर्षे टॅक्स बेनिफिट देण्याचा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळासमोर मांडला जाईल. त्याशिवाय लॉजिस्टिक पार्क आणि ॲग्रीकल्चर कन्व्हेन्शन सेंटर सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जातील. नाशिक-सिन्नर-इगतपुरी डीएमआयसीच्या (इंडस्ट्रिअल कॉरिडॉर) दुसरा टप्पा व्हावा यासाठी प्रयत्न करणार. शिलापूर येथे इलेक्ट्रिक टेस्टिंग लॅब सुरू करणे, वडगाव पिंगळा येथे मेगा फूड पार्क, गंगापूर मेगा पर्यटन संकुलात कन्व्हेन्शन सेंटर आणि साहसी क्रीडा संकुल, पिंप्री सद्रोद्दीन (इगतपुरी) येथे आदिवासी क्रीडा प्रबोधिनी, सय्यदपिंप्री (ता. नाशिक) येथे कृषी टर्मिनल मार्केटची स्थापना, इगतपुरी हिल स्टेशन (गिरिस्थान पर्यटनस्थळ), कौशल्य विकास विद्यापीठ, महाज्योती नाशिक विभागीय केंद्रासाठी इमारत, विभागीय क्रीडा संकुलात वाढीव अनुदानातून क्रीडा संकुलाचे काम, मल्टी मॉडेल ट्रान्सपोर्ट हब आदी कामे करण्यासाठी पुढाकार घेणार. इतर 3 मंत्र्यांकडे जास्त ताकद, त्यांनीही विकासाकडे लक्ष द्यावे