अक्कलकोट सहा महिन्यांपूर्वी अर्धवट दुरुस्त केलेल्या बाबलाद (ता. अक्कलकोट) येथील जिल्हा परिषद कन्नड शाळेच्या छताचा प्लास्टरचा काही भाग कोसळून दोन शिक्षकांसह 13 विद्यार्थी जखमी झाले. ही दुर्घटना मंगळवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली. याबाबतची अधिक माहिती अशी, बबलाद (ता. अक्कलकोट) येथे जिल्हा परिषदेची कन्नड शाळा आहे. ही इमारत जीर्ण झाली असून, सहा महिन्यांपूर्वी तात्पुरती डागडुजी केली होती. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी सकाळी गावातून विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढली होती. नंतर ते विद्यार्थी शाळेत आले आणि शाळेतील व्हरांड्यात थांबून 15 ऑगस्टच्या ध्वजवंदन कार्यक्रमाची तयारी करत होते. त्यावेळी अचानक जीर्ण झालेल्या इमारतीच्या छताच्या प्लास्टरचा काही भाग व्हरांड्यात उभ्या विद्यार्थ्यांच्या अंगावर कोसळला. त्यात 13 विद्यार्थी आणि दोन शिक्षक जखमी झाले. त्यावेळी ग्रामस्थ तत्काळ मदतीसाठी धावले. सदर कन्नड शाळा जुनी झालेली असून येथे पहिली ते आठवीपर्यंतचे वर्ग आहेत.
सहा महिन्यांपूर्वी छताचा काही भाग दुरुस्त करण्यात आला होता. त्या व्यतिरिक्त इतर काही छताचा प्लास्टरचा काही भाग कोसळला. यातील सात विद्यार्थी आणि एका शिक्षकाला अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयात उपचार केले. उर्वरित विद्यार्थी आणि एका शिक्षकावर मैंदर्गी आणि दुधनी आरोग्य केंद्रातील डॉ. मंजुनाथ पाटील यांच्यासह वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी उपचार केले. प्राथमिक उपचारानंतर विद्यार्थांना सायंकाळी घरी सोडण्यात आले. या घटनेचे वृत्त कळताच उपसभापती सागर कल्याणशेट्टी, गटविकास अधिकारी शंकर कवतिके, गटशिक्षणाधिकारी प्रशांत आरबाळे, दुधनीचे नगराध्यक्ष प्रथमेश म्हेत्रे, पंचायत समिती सदस्य संगीता बिराजदार यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली.
स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर शाळेत लगबग सुरू असताना छताचे धपले पडले. त्याखाली असलेल्या विद्यार्थ्यांना डोक्यात जखमा झाल्या. त्यांना उपचारासाठी ग्रामस्थ, शिक्षक यांनी विद्यार्थ्यांना तत्काळ उपचारसाठी दाखल केले. काही विद्यार्थ्यांना अक्कलकोटमध्ये काहींना दुधनीत उपचार केले. रमेश शिवमूर्ती, जखमी शिक्षक मुले थांबली होती. सकाळी अचानक छताचा काही भाग कोसळला. छत वरून पाहिले तर चांगलेच वाटत होते. विद्यार्थी घाबरले होते. पालकांच्या व स्थानिकांच्या मदतीने तातडीने प्राथमिक उपचार करून उर्वरित जखमींना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. येथील डॉक्टरांनी उपचार करून सायंकाळी घरी सोडले. सर्व मुलांना घरी पोहोचवले. मला डोक्यात लागल्याने दोन टाके पडले. मी दोन वर्षांपासून या शाळेत कार्यरत आहे. दुरुस्ती केलेल्या भागाव्यतिरिक्त इतर भाग कोसळला.
शाळांचे स्ट्रक्चरल ऑडिओ हे केवळ कपाटातील फाइलपुरतीच किंवा प्रशासकीय सोपस्कार पूर्ण करण्यासाठी नसावे. धोकादायक शाळा वर्गखोल्या आढळल्या आहेत, त्यांच्या बांधकामासाठी तातडीने दुरुस्तीचे काम करावे. बसवराज गुरव, राज्याध्यक्ष, कन्नड शाळा परिषद.धोकादायक इमारतीमध्ये विद्यार्थ्यांना न बसवण्याबाबत या आधीच माहिती घेऊन सूचना देण्यात आल्या आहेत. गटविकास अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली परत एकदा सर्व माहिती घेऊन संयुक्तपणे निर्णय घेणार आहोत. प्रशांत अरबाळे, गटशिक्षणाधिकारी अक्कलकोट तालुक्यात 19 वर्गखोल्या जीर्ण झाल्या आहेत. त्यापैकी काही पाडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार अद्याप काही शाळा खोल्या पाडणे बाकी आहे. तालुक्यातील जीर्ण खोल्या पाडणे आवश्यक आहे. तालुक्यात 6 वर्गखोल्या पाडणे बाकी आहे