राज्यातील तीन महामार्गावर असणाऱ्या मोहोळ बसस्थानकाची बिकट अवस्था पाहता परिवहनमंत्री प्रतापसिंह सरनाईक यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून मोहोळ बसस्थानकाला पाच बसेस मंजूर केल्या आहेत. त्या बसेसचा आज लोकार्पण सोहळा करण्यात आला असून, या बसचा वापर तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांसाठी केला जाईल, असे सांगत लवकरच मोहोळ तालुक्याच्या सुसज्ज अशा बसस्थानकाच्या कामाच्या शुभारंभाचा नारळ परिवहनमंत्री व माझ्या हस्ते फोडल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही, असे आश्वासन आमदार राजू खरे यांनी दिले.
पुणे-हैदराबाद, मुंबई-विजापूर या महामार्गासह पंढरपूर पालखी महामार्गावर मध्यवर्ती असणाऱ्या मोहोळ शहराच्या बसस्थानकाची दुरवस्था लक्षात घेता आमदार राजू खरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून परिवहनमंत्री प्रतापसिंह सरनाईक यांच्याकडे पाठपुरावा करून मोहोळ बसस्थानकाला नवीन पाच बस मंजूर केल्या आहेत, याचा लोकार्पण सोहळा आमदार राजू खरे यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी आमदार राजू खरे यांनी सांगितले. मोहोळ शहराच्या बसस्थानकाची दुरवस्था लक्षात घेता प्रारंभी आमदार फंडातून 50 लाख रुपयांचे प्रकरण केले असून, सहा लाख रुपयांचा पाण्याचा प्लांट आपण चालू केला.
मोहोळ शहराला बस डेपो नाही त्यामुळे नुकत्याच पार पडलेल्या परिवहन विभागाच्या बैठकीत राज्यात नव्याने मंजूर करण्यात आलेल्या 137 बसस्थानकाच्या यादीत मोहोळ बसस्थानकाचे नाव प्राधान्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे. त्यामुळे अल्पावधीतच मोहोळ शहराच्या सुसज्ज अशा मोहोळ बसस्थानकातून पंढरपूर आणि पुण्याकडे जाणाऱ्या एसटी बसचीही मोठ्या प्रमाणात वर्दळ आहे. मात्र बसस्थानकाची जागा अपुरी आणि पावसाळ्यात चिखल होत होता. मात्र मागील महिन्यात काँक्रिटीकरणाचेही काम पूर्ण झाले. बसस्थानकाच्या कामाचा शुभारंभाचा नारळ परिवहनमंत्री प्रताप सरनाईक व माझ्या हस्ते केल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही.
यावेळी नगर परिषदेच्या नगराध्यक्ष सिद्धी वस्त्रे, ज्येष्ठ नेते पद्माकर देशमुख, नगरसेवक चैतन्य देशमुख, शिवसेनेचे तालुकाप्रमुख अशोक भोसले, पंचायत समितीचे गटनेते बाळासाहेब गायकवाड, सत्यवान देशमुख, सरफराज सय्यद, सचिन जाधव, एसटी महामंडळाचे विभाग नियंत्रक अमोल गोंजारी, सोलापूरचे आगार व्यवस्थापक उत्तम जोंधळे, मोहोळचे वाहतूक नियंत्रक तानाजी गायकवाड आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते आमदार राजू खरे आणि पोलिस निरीक्षकांचा बसमधून फेरफटका मोहोळचे ग्रामदैवत नागनाथ महाराजांच्या मंदिरापर्यंत बस नेऊन पूजा करण्यात आली. या वेळी आमदार राजू खरे, पोलिस निरीक्षकांसह उपस्थित नेतेमंडळी, अधिकाऱ्यांनी बसमधून फेरफटका मारला.