मराठा समाजाची कुणबी प्रमाणपत्रे रद्द करण्यात येत असल्याच्या मुद्द्यावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक पवित्रा घेत पुन्हा एकदा राज्य सरकारवर, विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर सडकून टीका केली आहे. "सत्तेचा गैरवापर करून मराठ्यांची कुणबी प्रमाणपत्रे जाणीवपूर्वक रद्द केली जात आहेत. मात्र, फडणवीसांचे आता सर्व डाव संपले असून, आता माझा डाव सुरू होईल," असा उघड इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे. सोलापूरच्या शिवाजी चौकात जरांगे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे उद्घाटन करण्यात आले. यानंतर जिल्ह्यातील प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना जरांगे यांनी काही कागदोपत्री पुरावेही माध्यमांसमोर सादर केले. एकाची व्हॅलिडिटी होते आणि दुसऱ्याची रद्द कशी? मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देताना होणाऱ्या दुजाभावावर जरांगे पाटील यांनी संताप व्यक्त केला. ते म्हणाले, "मी काहीही चुकीचे बोलत नाही. मी स्वतः इथं पत्रे आणि पुरावे घेऊन आलो आहे.
बोडके नावाच्या एका व्यक्तीच्या भावाची जात पडताळणीतून व्हॅलिडिटी पूर्ण होते, मात्र त्याच व्यक्तीच्या सख्ख्या बहिणीची व्हॅलिडिटी रद्द केली जाते, हे कसे शक्य आहे? दहीहंडे प्रकरणात जात पडताळणी समिती स्वतः सांगते की प्रमाणपत्र वैध करा, तरीही दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांचे प्रमाणपत्र रद्द केले जाते. हे सर्व कोणाच्या इशाऱ्यावर सुरू आहे?" बावनकुळेंच्या पत्रावरून नोंदी रद्द करण्याचा घाट महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर थेट आरोप करताना जरांगे म्हणाले, "बावनकुळे यांनी एक गुप्त पत्र देऊन मराठ्यांच्या कुणबी नोंदी आणि प्रमाणपत्रे रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. ते पत्रही माझ्या हाती लागले आहे. फडणवीसांच्या सांगण्यावरून आणि बावनकुळेंच्या माध्यमातून हे सर्व सुरू आहे. शिंदे समितीने आणि अधिकाऱ्यांनी मूळ नोंदी शोधून काढल्या आहेत, मग त्या रद्द कशा केल्या जात आहेत? मराठ्यांच्या लेकराबाळांचे वाटोळे करण्याचा हा डाव मी उधळून लावेन."
29 ऑगस्टला एकही मराठा घरी बसणार नाही आगामी आंदोलनाची हाक देताना जरांगे म्हणाले, "राजकारण्यांच्या डोक्यात हवा गेली आहे. त्यांना वाटते की आम्ही सत्तेत आहोत, बहुमतात आहोत, त्यामुळे आमचे कोणी काहीही करू शकत नाही. पण 29 ऑगस्ट रोजी मराठा समाज आपली ताकद दाखवून देईल. मी सर्व मराठा बांधवांना आवाहन करतो की, 29 ऑगस्टला एकही मराठा घरी बसता कामा नये. आपल्या सर्व गाड्या घेऊन अंतरवाली सराटीकडे निघा. मराठ्यांच्या लेकरांच्या हक्काचे हे पक्के आरक्षण आहे, ते मिळवल्याशिवाय आपण गप्प बसायचे नाही." माझ्यावर अटकेची कारवाई करण्याचा डाव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करताना जरांगे यांनी एक खळबळजनक दावा केला.
"फडणवीस यांनी मराठ्यांमध्ये फूट पाडण्याचे सर्व डाव खेळून पाहिले. काल रात्री मला खात्रीलायक माहिती मिळाली की, माझ्यावर हल्ला करण्याचा किंवा मला अटक करण्याचा त्यांचा शेवटचा डाव होता. यासाठी त्यांनी पोलिसांचा बंदोबस्तही बाजूला काढला होता. पण मराठ्यांना आणि मला कुणाचीही भीती वाटत नाही. तुम्हाला अटक करायची असेल तर करून दाखवा, मराठे काय आहेत हे तुम्हाला समजेल," असे थेट आव्हान त्यांनी दिले. फोन आणि राजकीय हस्तक्षेपावर भाष्य नेत्यांचे फोन येत आहेत का, यावर विचारले असता ते म्हणाले, “संजय शिरसाट आणि अनेक नेत्यांचे मला शेकडो मिसकॉल आले आहेत. ते म्हणताहेत की आम्ही आमची चूक सुधारतो. माझी एकच अट आहे, तुम्ही तुमची चूक सुधारा, आमची प्रमाणपत्रे पुन्हा द्या, मग सर्व पहिल्यासारखे सुरळीत होईल. तुम्ही आमच्यावर अन्याय केला तर दुसऱ्या वेळी मराठे तुम्हाला पाडल्याशिवाय राहणार नाहीत.”
तसेच एका ब्राह्मण महिलेने बोगस ओबीसी प्रमाणपत्र काढून लाभ घेतल्याची बाब निदर्शनास आल्याचे सांगत, आपण या प्रकरणाची रीतसर माहिती घेतली असून त्यावरही लक्ष ठेवून असल्याचे जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले. हेही वाचा.. तुळजाभवानीच्या साक्षीने सांगतो, मराठ्यांवर अन्याय सुरू आहे: मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर थेट हल्लाबोल; 29 ऑगस्टच्या 'आरपार' आंदोलनाची हाक "आई तुळजाभवानीच्या पवित्र दरबारातून आणि साक्षीने सांगतो, सध्याच्या सरकारकडून मराठ्यांवर उघड अन्याय सुरू आहे. मराठ्यांच्या हक्काची कुणबी प्रमाणपत्रे रद्द करण्याचे मोठे षडयंत्र रचले जात आहे. मात्र, आता हा अन्याय सहन केला जाणार नाही. 29 ऑगस्टपासून अंतरवाली सराटीत सुरू होणारे आंदोलन हे मराठ्यांचे शेवटचे आणि निर्णायक आंदोलन असेल," असा थेट आणि आक्रमक इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.