"दिशा सालियन प्रकरणात केवळ ठाकरे कुटुंबावर चिखलफेक करून प्रसिद्धी मिळवण्यासाठी काही लोकांना हाताशी धरून हा घाणेरडा राजकीय खेळ सुरू आहे. अब्रूची भाषा बोलणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे की, आमचीही प्रतिष्ठा आणि मानमर्यादा आहे. कोणाच्या तरी हातचे बाहुले बनून आरोप करणाऱ्यांच्या पाठीशी कोणती अदृश्य शक्ती आहे आणि या संपूर्ण प्रकरणासाठी अर्थपुरवठा कुठून केला जातोय, हे आम्हाला पक्के ठाऊक आहे," असा सणसणीत प्रतिहल्ला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे मुख्य प्रवक्ते व खासदार संजय राऊत यांनी चढवला आहे. मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊत यांनी दिशा सालियन मानहानी प्रकरणातील नोटीस, मंत्री नितेश राणे यांच्या विधानांवरून कणकवलीतील जुन्या गुन्ह्यांचा पाढा, केंद्रीय निवडणूक आयोगाचा बेमुर्वतखोरपणा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरसंघचालकांचे 'सूर्यास्ता'चे वक्तव्य आणि यूपीआय शुल्कावरून केंद्र सरकारवर जोरदार प्रहार केला. आदित्य ठाकरेंनी कधी मृत व्यक्तीला पाहिलेही नाही; बदनामीचे षडयंत्र दिशा सालियन यांच्या वडिलांकडून आदित्य ठाकरे यांना पाठवण्यात आलेल्या 500 कोटी रुपयांच्या मानहानीच्या कायदेशीर नोटीसवर बोलताना संजय राऊत म्हणाले, "2020 सालची ही दुर्दैवी घटना आहे. दिशा सालियन हिचा मृत्यू अत्यंत दुर्दैवी होता. त्या वेळी तिच्या वडिलांनी स्वतः सर्व वस्तुस्थिती समजून घेतली होती. ही हत्या किंवा आत्महत्या नसून एक दुर्दैवी अपघात असू शकतो, यावर त्यांचे समाधान झाले होते. मात्र, तब्बल 6 वर्षांनंतर अचानक जेव्हा ठाकरे कुटुंब महाराष्ट्रात जनतेच्या हितासाठी आक्रमकपणे पुढे जात आहे, तेव्हा अशी जुनी प्रकरणे उकरून काढून बदनामीची यंत्रणा उभी केली जात आहे." संबंध नसताना चिखलफेक "आदित्य ठाकरे यांनी या विषयावर आधीच सविस्तर निवेदन दिले आहे. ज्या व्यक्तीने त्या मृत तरुणीला कधी पाहिले नाही, कधी भेट झाली नाही, कोणताही संबंध आला नाही, तिच्या मृत्यूवरून आदित्य ठाकरेंवर चिखलफेक केली जात आहे. मुंबई उच्च न्यायालयानेही या प्रकरणात सध्या कोणीही आरोपी नसून कोणालाही लक्ष्य करता येणार नाही, असे स्पष्ट केले असतानाही काही उरबडवे आणि उपटसुंभ मंडळी अर्थपुरवठा घेऊन ठाकरे कुटुंबाला बदनाम करण्याचे कारस्थान करत आहेत." कणकवलीतले खून पचवण्यासाठीच तुम्हाला सत्तेची गरज!; राणेंवर हल्लाबोल मंत्री नितेश राणे यांनी 'दिशाच्या कुटुंबीयांवर दबाव आणल्यास आदित्य ठाकरेंना अटक होऊ शकते' असा इशारा दिला होता. त्यावर राऊत यांनी अतिशय आक्रमक प्रत्युत्तर दिले, "अटक कोणाला व्हायला पाहिजे होती, हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. गेल्या 20 वर्षांत कणकवलीमध्ये जे अनेक संशयास्पद खून झाले, त्याबाबत आधी बोला. श्रीधर गोवेकरचे अपहरण करून कोणी मारले? अंकुश राणेचा खरा मारेकरी कोण होता? सत्यविजय भिसे आणि रमेश नाईक यांचा खून कोणी केला? या निष्पाप लोकांच्या खुनांचा तपास जर महाराष्ट्रातील पोलीस आणि सीबीआयने कोणत्याही राजकीय हस्तक्षेपाशिवाय निःपक्षपातीपणे केला असता, तर आज ही मंडळी राजकारणात बोलायला उरलीच नसती." हाताला आणि जिभेला रक्ताचा डाग "ज्यांच्या स्वतःच्या अंगावर, हाताला आणि जिभेला रक्ताचे डाग लागले आहेत, ते आज दुसऱ्यांच्या प्रतिष्ठेवर बोलत आहेत. केवळ स्वतः केलेले खून पचवण्यासाठी आणि दडपण्यासाठीच अशा लोकांना सत्तेची गरज भासते. आम्ही पुरावे असल्याशिवाय कधी बोलत नाही, पण आमच्या संयमाचा बांध तुटला तर या सगळ्यांची कुंडली बाहेर काढू," असा सज्जड इशारा त्यांनी दिला. निवडणूक आयोग हा अमित शहांचा घरगडी; ममता बॅनर्जींच्या पक्षचिन्हावर संताप पश्चिम बंगालमधील राजकीय घडामोडींवर आणि तृणमूल काँग्रेसचे चिन्ह गोठवण्यावरून राऊत यांनी निवडणूक आयोगाची जोरदार कानउघाडणी केली.
"निवडणूक लढण्यापूर्वीच काँग्रेस उमेदवाराला 10 ते 12 वर्षांपूर्वीच्या एका आंदोलनाच्या गुन्ह्यात अटक केली जाते, ज्या आंदोलनाचे नेतृत्व भाजपचे नेते सुवेंदू अधिकारी यांनी केले होते. अशा अमानुष आणि लोकशाहीविरोधी पद्धतीने निवडणुका जिंकण्याचे कारस्थान सुरू आहे." "ममता बॅनर्जी यांनी स्वतः आपल्या हाताने काढलेले तृणमूल काँग्रेसचे तीन पानांचे चिन्ह केंद्रीय निवडणूक आयोगाने जप्त केले. महाराष्ट्रात जेव्हा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे 'घड्याळ' चिन्ह गोठवण्याची मागणी केली, तेव्हा हा आयोग मूग गिळून बसला होता. केंद्रीय निवडणूक आयोग हा निव्वळ अमित शाहंचा 'घरगडी' म्हणून काम करत असून, जगाच्या इतिहासात इतका बेमुर्वतखोर आयोग कधी झाला नसेल," असा थेट आरोप त्यांनी केला. चढता सूरज धीरे-धीरे ढल जाएगा; सरसंघचालकांच्या विधानाचा दाखला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या एका विधानाचा व्हिडिओ ट्विट केल्याबाबत विचारले असता ते म्हणाले, "चढता सूरज धीरे-धीरे ढलता है, ढल जाएगा' हे सरसंघचालकांचे विधान थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारलाच तंतोतंत लागू पडते.
जो सूर्य उगवतो, तो कधी ना कधी मावळतोच. आता या जुलमी सत्तेचा सूर्यास्त सुरू झाला आहे. देशात महागाई, बेरोजगारी आणि आर्थिक पिळवणुकीविरुद्ध जनतेमध्ये प्रचंड असंतोष खदखदत आहे. 2029 पूर्वीच मोदींना पायउतार व्हावे लागेल, अशी राजकीय कोंडी देशभरात निर्माण होत आहे." यूपीआय शुल्क म्हणजे अमेरिकेला ‘प्रोटेक्शन मनी’ "यूपीआय व्यवहारांवर छुपे शुल्क आकारून जनतेची जी लूट चालवली आहे, ती एका अर्थाने अमेरिकेला दिली जाणारी खंडणी आहे. अंडरवर्ल्डमध्ये जशी खंडणी दिली जाते, तशीच आंतरराष्ट्रीय स्तरावर गुप्त फाईल्स आणि प्रकरणे दडपण्यासाठी ही खंडणी पुरवली जात असल्याचा संशय जनतेला आहे."
'मंगळ' स्वाभिमानी असतो भाजपच्या टीकेला प्रत्युत्तर देताना राऊत म्हणाले की, "जर भाजप मला शिवसेनेचा 'मंगळ' म्हणत असेल, तर मंगळ हा अतिशय तेजस्वी, आक्रमक आणि स्वाभिमानी ग्रह आहे. मंगळ कधीही स्वाभिमानाशी तडजोड करत नाही आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची ठाम दिशा दाखवतो." हेही वाचा… कर्नाटकने दुष्काळ जाहीर केला, महाराष्ट्र 5 ऑक्टोबरची वाट का पाहतोय?: शेतकऱ्यांची थट्टा करू नका; रोहित पवारांची सरकारवर टीका राज्यात पावसाने ओढ दिल्याने खरीप हंगाम पूर्णतः वाया गेला असून शेतकरी हवालदिल झाला आहे. अशा भीषण परिस्थितीत राज्य सरकारने अद्याप दुष्काळ जाहीर न केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. "शेजारचे कर्नाटक सरकार जर दुष्काळ जाहीर करून केंद्राकडे मदतीचा प्रस्ताव पाठवू शकते, तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री 5 ऑक्टोबरची वाट का पाहत आहेत?" असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. सोशल मीडियावर एक सविस्तर पोस्ट करत त्यांनी सरकारच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.