मंगळवेढा महाराष्ट्रातील समाजसुधारकांच्या प्रयत्नांमुळे जातीभेद व लिंगभेदाची दरी कमी होऊन शिक्षण सर्वांपर्यंत पोहोचले. मात्र अलीकडच्या काळात सरकारी शाळांच्या भवितव्यापुढे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अशैक्षणिक कामे, अनाठायी उपक्रम, भौतिक सुविधा व पुरेशा मनुष्यबळाचा अभाव यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा मागोवा लेखमालेच्या रूपाने घेण्यात आल्याचे प्रतिपादन भाऊ चासकर यांनी केले. ते महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे माजी राज्य संपर्कप्रमुख सुरेश पवार यांनी लिहिलेल्या चक्रव्युहात शिक्षण या पुस्तकाच्या द्वितीय आवृत्तीचे प्रकाशन शिक्षणतज्ज्ञ भाऊ चासकर यांच्या हस्ते व आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख अध्यक्षतेखाली संपन्न झाले. त्याप्रसंगी बोलत होते.
या वेळी व्यासपीठावर युवक नेते सागर पाटील, सभापती पूनम इंगवले, आटपाडीचे नगराध्यक्ष यू. टी. जाधव, जिल्हा परिषद सदस्य दादासाहेब लवटे, अनिल कादे, वर्षाताई केनवडे, प्रकाशक इंद्रजित घुले यांच्यासह महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे अनेक मान्यवर नेते या वेळी उपस्थित होते. या वेळी माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील, माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत, शिक्षक समितीचे नेते उदयराव शिंदे, राज्याध्यक्ष विजय कोंबे यांनीही मनोगतातून पुस्तकाला शुभेच्छा दिल्या. राज्यभरातील शिक्षक व शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांकडून या पुस्तकाचे उत्सफुर्त स्वागत करण्यात येत आहे.
ऑनलाइन बुकगंगासह, मागणीनुसार सवलतीच्या दरात पोस्टाने घरपोच पुस्तके पाठवण्याची सोय शब्दशिवारच्या वतीने करण्यात आली आहे. वैचारिक बळ देणारे हे पुस्तक आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख म्हणाले, गोरगरीब व बहुजन समाजाचे शिक्षण वाचवण्यासाठी व्यवस्थेच्या विरोधात लढा उभारला जात असून, या लढ्यातील कार्यकर्त्यांना वैचारिक बळ देण्यासाठी हे पुस्तकं दिशादर्शक आहे. त्यातून नव्या वाटा चोखाळण्याची संधी मिळेल. अवघ्या चार महिन्यांत दुसरी आवृत्ती निघाली महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रातील अस्वस्थ वेदनांचा हुंकार म्हणून या पुस्तकाच्या पहिल्या आवृत्तीचे वाचकातून उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात आले होते अवघ्या चार महिन्यांत या पुस्तकाची दुसरी आवृत्ती नव्या रूपात प्रकाशित झाली आहे. प्रसिद्ध शब्दशिवार या प्रकाशन संस्थेने हे पुस्तक प्रकाशित केले असून, मागील काही वर्षात शिक्षण क्षेत्रात घडत असलेल्या विविध प्रश्नांचा व घडामोडींचा मागोवा 35 लेखातून घेण्यात आला आहे.