राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावर काँग्रेसने केलेल्या टीकेवरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आज पत्रकार परिषद घेत काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. सुनेत्रा पवार यांच्याबद्दल गुंगी गुडीया असा शब्दप्रयोग करत काँग्रेसने आपली वैचारिक दिवाळखोरीच दाखवून दिली आहे, अशा शब्दांत तटकरे यांनी काँग्रेसचा तीव्र निषेध केला. केवळ दिलगिरीने विषय संपत नाही काँग्रेसच्या या वक्तव्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या वाढत्या रोषाची दखल घेत काँग्रेसने काल रात्री उशिरा एक ट्विट करून दिलगिरी व्यक्त केली. यावर बोलताना तटकरे म्हणाले की, "मी काँग्रेसचे ते दिलगिरी व्यक्त करणारे ट्विट पाहिले आहे. मात्र, केवळ दिलगिरी व्यक्त करून विषय संपत नसतो. राजकारणात टीका करताना काही वेळेला भान असायला हवे, पण काँग्रेस ते पूर्णपणे विसरली आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातून काँग्रेसविरोधात संतप्त भावना उमटत असल्याचे त्यांच्या लक्षात आले, त्यामुळेच पश्चात्ताप होऊन त्यांनी ही दिलगिरी व्यक्त केली असावी." संजय राऊतांनाही दिले प्रत्युत्तर सुनेत्रा पवार किंवा सत्ताधाऱ्यांनी प्रत्येक विषयावर आपली भूमिका मांडली पाहिजे, अशी टीका ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केली होती. यावर उत्तर देताना तटकरे म्हणाले की, "संजय राऊत साहेबांना बहुधा माहिती नाही की, पक्षसंघटनेत काम करणारी व्यक्ती आपले विचार आणि स्पष्ट मत कशा पद्धतीने मांडत असते." धनंजय मुंडेंच्या प्रश्नावर काय म्हणाले? बीडमध्ये झालेल्या एका पत्रकार परिषदेत मंत्री धनंजय मुंडे यांनी पत्रकारांना प्रश्न विचारण्यापासून अडवल्याचा आरोप होत आहे. यासंदर्भात पत्रकारांनी विचारले असता, तटकरे म्हणाले, त्या पत्रकार परिषदेबद्दल मला सविस्तर माहिती नाही.
मात्र, सध्या काँग्रेसने सुनेत्रा पवार यांच्यावर जी टीका केली आहे, ती अत्यंत निंदनीय आहे," असे म्हणत त्यांनी पुन्हा एकदा आपला मोर्चा काँग्रेसकडेच वळवला. काँग्रेसने केलेली पोस्ट.. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले- गुंगी गुडिया ही शिवी नाही, सुनेत्रा पवारांनी स्वतःला 'दुर्गा' सिद्ध करावं दरम्यान, काल दुपारी काँग्रेसचे प्रेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकारळ यांनी पत्रकार परिषद घेतली होती. ते म्हणाले, "गुंगी गुडिया हा अपशब्द नसून त्यांच्या मुकेपणाचे ते वर्णन आहे. सुनेत्रा पवारांनी आमच्या टीकेला सकारात्मक घेत इंदिरा गांधींप्रमाणे स्वतःला 'दुर्गा' सिद्ध करून दाखवावे," असे आव्हान सपकाळ यांनी दिले. सपकाळ यांची ही पत्रकार परिषद सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यालयात घुसून जोरदार घोषणाबाजी आणि आंदोलन केले.
'धनंजय मुंडेंची ओळख लोकप्रतिनिधीपेक्षा गुंड म्हणून जास्त' बीडमधील व्हायरल व्हिडिओचा संदर्भ देत हर्षवर्धन सपकाळ यांनी धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली. "पत्रकारांनी आणि नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांना लोकप्रतिनिधींनी उत्तरे दिली पाहिजेत. मात्र, महाराष्ट्रात ज्यांची ओळख एका लोकप्रतिनिधीपेक्षा 'गुंड' म्हणून अधिक आहे, ते धनंजय मुंडे पत्रकारांना गप्प बसायला सांगत आहेत. मुंडे पत्रकारांना चुप करत असताना बाजूलाच बसलेल्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार मात्र एक शब्दही बोलल्या नाहीत. त्यामुळे काँग्रेसने वापरलेला 'गुंगी गुडिया' हा शब्दप्रयोग अतिशय योग्य आहे," असा दावा सपकाळ यांनी केला