ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या हॉटेल आणि रेस्टॉरंटविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) धडक कारवाई केली आहे. ‘सुरक्षित अन्न, सुरक्षित महाराष्ट्र’ मोहिमेअंतर्गत कॅम्प आणि एम.जी. रोड परिसरातील २० हॉटेल्स व रेस्टॉरंटची तपासणी करण्यात आली. यामध्ये अन्न सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन आढळलेल्या आठ आस्थापनांचे परवाने तात्काळ निलंबित करण्यात आले आहेत. तपासणीदरम्यान अनेक हॉटेल्सच्या स्वयंपाकघरांमध्ये अत्यंत अस्वच्छता, मोठ्या प्रमाणात झुरळे व इतर कीटकांचा प्रादुर्भाव आढळला. काही ठिकाणी खाद्यपदार्थांमध्ये कृत्रिम रंगांचा वापर होत असल्याचेही निदर्शनास आले. मेट्रो रेस्टॉरंटमध्ये कृत्रिम रंगांसह अजिनोमोटोचा (एमएसजी) अतिरिक्त वापर होत असल्याचे आढळले. कारवाई करण्यात आलेल्या आस्थापनांमध्ये पुणे स्टेशन येथील मेट्रो रेस्टॉरंट आणि शिवाय कॉर्नर, ईस्ट स्ट्रीटवरील सहाना व्हेज रेस्टॉरंट, कॅम्पमधील ग्रँड दिल्ली दरबार हॉस्पिटॅलिटी आणि बाबाजान चौकातील राजे चायनीज फास्ट फूड अँड ज्यूस बार यांचा समावेश आहे. तसेच एम.जी. रोडवरील द बर्गर बार कॅफे, ससाणेनगर येथील महादेव फूड्स आणि एनआयबीएम, कोंढवा खुर्द येथील फिरोज केटरर्स यांच्यावरही कारवाई करण्यात आली. काही ठिकाणी कृत्रिम रंगांचाही वापर या आठही आस्थापनांच्या स्वयंपाकघरांमध्ये स्वच्छतेचा अभाव आणि कीटकांचा प्रादुर्भाव ही प्रमुख कारणे आढळली. त्यापैकी काही ठिकाणी कृत्रिम रंगांचाही वापर होत असल्याचे स्पष्ट झाले. सहआयुक्त (अन्न) श्रीकांत करकळे यांच्या नेतृत्वाखाली सहायक आयुक्त नारायण सरकटे यांच्या पथकाने ही तपासणी केली. अन्न सुरक्षा अधिकारी सतीश हाके, प्रिया राजगोळकर, दीपाली घोडके आणि पूजा बागडे यांनी कारवाईत सहभाग घेतला. कारवाईचा इशारा ग्राहकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्या आणि अन्न सुरक्षा कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही आस्थापनांची गय केली जाणार नाही. हॉटेल व्यावसायिकांनी परवान्याच्या अटी, स्वच्छता आणि अन्न साठवणुकीच्या नियमांचे काटेकोर पालन करावे. अन्यथा परवाने निलंबित करण्यासह ते रद्द करण्याचीही कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा सहआयुक्त श्रीकांत करकळे यांनी दिला. -------------------- हेही वाचा.. भोसरीत भीषण आग; 3 लाकडी वखारींसह रसायन कंपनी जळाली: 53 लाखांचे नुकसान; चारही कंपन्यांकडे फायर एनओसी आणि विमा नव्हता
भोसरी परिसरात शनिवारी पहाटेच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत तीन लाकडी वखारींसह एका रसायन कंपनीला आग लागून मोठे नुकसान झाले. या दुर्घटनेत चारही कंपन्यांमधील साहित्य, यंत्रसामग्री आणि माल जळून खाक झाला. आगीत सुमारे ५३ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान, संबंधित चारही कंपन्यांकडे अग्निशमन विभागाचे ना-हरकत प्रमाणपत्र (फायर एनओसी) आणि विमा नसल्याची बाब समोर आली आहे. सविस्तर वाचा