पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 75 वा वाढदिवस नुकताच साजरा झाला. या निमित्ताने भाजपकडून देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. याच कार्यक्रमांवरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी मोदी आणि भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. "अशुभ काळाची चाहूल लागल्यामुळेच सत्तेच्या स्थैर्यासाठी आणि मोदींना ऊर्जा मिळण्यासाठी भक्तांना आशिर्वादाचे दिवे लावायला सांगितले जात आहे. पण दिवे लावा, काहीही करा... ग्रह कधीच रजेवर जात नाहीत!", असा खोचक टोला राऊत यांनी लगावला आहे. वाढदिवसाच्या कार्यक्रमांवरून राऊतांचा सवाल संजय राऊत यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत भाजपच्या आध्यात्मिक कार्यक्रमांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ते म्हणाले की, "भाजपने आवाहन केले की मोदींच्या वाढदिवशी दिवे पेटवा. काही ठिकाणी गणेशोत्सवात आरती आणि महाआरतीचे आयोजन झाले. यज्ञ आणि होमहवन केले गेले. हे सर्व कशासाठी? तर मोदी यांना पुढच्या काळासाठी ऊर्जा मिळावी म्हणून. अचानक असे काय झाले की मोदींसाठी आशिर्वादांचे दिवे पेटवण्याचे फर्मान सुटले?"
ज्योतिषशास्त्रीय दाखले देत सत्तेला धोक्याचा इशारा संजय राऊत म्हणाले, मी ज्योतिषशास्त्राचा अभ्यासक आहे पण अंधश्रद्धाळू नाही, असे म्हणत त्यांनी काही ज्योतिषशास्त्रीय दाखले दिले. त्यांच्या दाव्यानुसार, मोदींची पुढील ग्रहदशा त्यांना सत्तेच्या राजयोगापासून दूर नेणारी आहे. 17 सप्टेंबरला सूर्य कन्या राशीत प्रवेश करतोय आणि 18 सप्टेंबरला मंगळ कर्क राशीत जातोय, जिथे तो नीच स्थानी (कमजोर) असतो. राऊत यांच्या मते, हा कमजोर मंगळ सरकार आणि सत्तेला सुरंग लावेल, तसेच संघर्ष आणि तीव्र आंदोलनाचा माहोल तयार करून राजकीय भूकंपाचे धक्के देईल. "देशात असंतोषाचा भडका उडेल" सध्याची ग्रहदशा आजच्या राज्यकर्त्यांसाठी अशुभ असल्याचे सांगत राऊत यांनी म्हटले आहे की, "देशात असंतोषाचा मोठा भडका उडेल. आंदोलने होतील. आंतरराष्ट्रीय कारस्थानांचा फटका बसेल. अंतर्गत बंडाळी वाढेल आणि त्यात सत्तापरिवर्तनही घडू शकते." या सर्व अशुभ काळाची चाहूल लागल्यामुळेच गेल्या बारा वर्षांत पहिल्यांदाच अशा प्रकारे दिवे लावायला सांगितले जात असल्याचा दावा त्यांनी केला.
पोस्टच्या शेवटी राऊत यांनी म्हटले आहे की, "17 तारखेपासून कठीण काळ सुरू होत आहे. ग्रहदशा कुणालाही बदलता येत नाही. दिवे लावा, काहीही करा… ग्रह कधीच रजेवर जात नाहीत, ते सदैव ड्युटीवर असतात." मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांनी आपली पोस्ट 'जय महाराष्ट्र'ने संपवली आहे. संजय राऊत यांची जशीच्या तशी पोस्ट.. पंतप्रधान मोदींचा 75 वा वाढदिवस साजरा झाला. ते आता 76 वर्षांचे झाले. त्यांना उत्तम दीर्घायुष्य लाभो. विषय थोडा वेगळा आहे. भाजपने आवाहन केले की मोदींच्या वाढदिवशी दिवे पेटवा.(त्यासाठी लाखो लिटर तेल,कापूर आणि माचीस बॉक्स ची व्यवस्था करण्यात आली)काही ठिकाणी गणेशोत्सवात आरती आणि महाआरतीचे आयोजन झाले. यज्ञ आणि होमहवन केले गेले.का? तर मोदी यांना पुढच्या काळासाठी ऊर्जा मिळावी म्हणून अनेक आध्यात्मिक कार्यक्रम राबवले. अचानक असे काय झाले?की मोदींसाठी आशिर्वादांचे दिवे पेटवण्याचे फर्मान सुटले? विषय थोडा वेगळा आहे. मी ज्योतिषशास्त्राचा अभ्यासक आहे. पण अंधश्रद्धाळू नाही. 17 सप्टेंबर मोदींचा जन्मदिवस आहे. मोदींच्या पुढील ग्रहदशा त्यांना सत्तेच्या राजयोगापासून दूर नेणारी आहे.
17 सप्टेंबरला सूर्य कन्या राशीत प्रवेश करतोय. 18 सप्टेंबरला मंगळ कर्क राशीत जातोय. कर्क राशीत मंगळ नीच स्थानी असतो. म्हणजे कमजोर होतो. हे सोप्या भाषेत सांगायचे तर हा कमजोर मंगळ दोन गोष्टी नक्की घडवतो:
• सरकार आणि सत्तेला धक्का देतो, सुरंग लावतो.
• संघर्ष आणि तीव्र आंदोलनाचा माहौल तयार करतो.राजकीय भूकंपाचे धक्के देतो, नीच स्थानातला हा मंगळ सत्तेच्या दहाव्या भावाकडे पाहतो. संघर्षाच्या सहाव्या भावाकडे पाहतो. आणि त्या सहाव्या भावाचा स्वामी शुक्राकडेही पाहतो. दहाव्या भावात राहू बसला आहे.
हा योग आजच्या राज्यकर्त्यां टोळ्यांसाठी अशुभ आहे. त्यामुळे काय होईल? देशात असंतोषाचा मोठा भडका उडेल. आंदोलने होतील. आंतरराष्ट्रीय कारस्थानांचा फटका बसेल. अंतर्गत बंडाळी वाढेल,त्यात सत्तापरिवर्तनही घडू शकते. या अशुभ काळाची चाहूल लागल्यामुळे गेल्या बारा वर्षांत पहिल्यांदाच सत्तेच्या स्थैर्यासाठी आणि मोदींच्या आरोग्यासाठी भक्तांना आशिर्वादाचे दिवे लावायला सांगितले जात आहे. त्यातून मोदींना ऊर्जा मिळेल, असे सांगितले जात आहे. 17 तारखेपासून कठीण काळ सुरू होत आहे. ग्रहदशा कुणालाही बदलता येत नाही. दिवे लावा, काहीही करा… ग्रह कधीच रजेवर जात नाहीत! होय ग्रह कधीच सुट्टीवर जात नाहीत ते सदैव ड्यूटी वर असतात पंतप्रधान मोदी यांना शुभेच्छा! जय महाराष्ट्र!