पक्क्या घराचे स्वप्न पाहणाऱ्या पंढरपूर तालुक्यातील कुटुंबांसाठी प्रधानमंत्री आवास योजना आशेचा किरण ठरणार आहे. योजनेच्या लाभासाठी वर्षभरापूर्वी केलेल्या सर्वेक्षणात तालुक्यातील 95 गावांमधून तब्बल 31 हजार 167 कुटुंबांची नोंद झाली आहे. गावोगावी विशेष ग्रामसभा घेऊन या संभाव्य लाभार्थींच्या यादीचे वाचन करण्यात येत आहे. या ग्रामसभेत नागरिकांकडून हरकती व सूचनांची पडताळणी करुनच अंतिम यादी अपलोड केली जाणार आहे. तालुक्यातील विविध गावांमधून 18 हजार 51 नागरिकांनी स्वतः ऑनलाइन घरकुलांसाठी माहिती भरली असून, 13 हजार 116 कुटुंबांचे सर्वेक्षण ग्रामविकास अधिकाऱ्यांमार्फत केले आहे.
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पात्र कुटुंबांना पक्क्या घरासाठी शासनाकडून 1 लाख 20 हजारांची आर्थिक मदत दिली जाते. लाभार्थी निश्चित करण्याच्या प्रक्रियेत स्वतः ऑनलाइन सर्वेक्षण करून माहिती नोंदवण्याची संधी वर्षभरापूर्वी देण्यात आली होती. दोन्ही सर्वेक्षणातून तालुक्यात एकूण 31 हजार 167 नवीन संभाव्य लाभार्थींची यादी तयार झाली आहे. सध्या या यादीचे प्रत्येक गावात विशेष ग्रामसभा घेऊन वाचन केले जात आहे. ऑनलाइन सर्व्हेच्या वेळी नाव नोंदवले होते; मात्र सध्या वाचन करण्यात येत असलेल्या यादीत नाव आलेले नाही, अशा नागरिकांनाही आपले नाव नोंदवण्याची संधी देण्यात आली आहे.
घरकुलासाठी 1 लाख 20 हजारांचे अनुदान प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पात्र लाभार्थींना घरकुल बांधण्यासाठी शासनाकडून 1 लाख 20 हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. याशिवाय रोजगार हमी योजनेतून 28 हजार रुपये, सौर ऊर्जेसाठी 50 हजार रुपये, तसेच घरात शौचालय नसल्यास शौचालय बांधण्यासाठी 12 हजार रुपयांचे अनुदान देण्यात येते. यादीत नाव नोंदवले नसेलतर नव्याने नोंदवण्याची संधी ग्रामसभेत हरकत नोंदवण्याचे आवाहन ^घरकुल यादी बाबत ज्यांना आक्षेप आहेत, तसेच सर्वेक्षणावेळी ज्यांची नावे यादीत आलेली नाहीत,अशा नागरिकांनी विशेष ग्रामसभेत आपली हरकत नोंदवावी. छाननी व पडताळणी नंतर यादीमधील अपात्र नावे कमी तर पात्रता निकष पूर्ण करणारी नवीन नावे समाविष्ट होऊ शकतात. गरजूंनी नावे दाखल करावीत.ग्रामसभेत आलेल्या हरकतींची चौकशी करुनच अंतिम यादी अपलोड केली जाणार आहे. अंतिम मंजुरी शासनाच्या निकषांनुसारच होणार आहे.
- अमोल जाधव, गटविकास अधिकारी, पंढरपूर