महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे (मनविसे) अध्यक्ष अमित ठाकरे सध्या विदर्भ दौऱ्यावर असून, त्यांनी नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत भाजप आणि राज्य सरकारवर जोरदार तोफ डागली. मुंबई भाजपचे आमदार अमित साटम यांनी राज ठाकरे यांच्या नातवाच्या शाळेवरून केलेल्या टीकेला अमित ठाकरे यांनी अत्यंत आक्रमक शब्दांत प्रत्युत्तर दिले. "अमित साटम यांना भुंकायलाच ठेवले असून, ते त्यांचे काम अगदी उत्तम पद्धतीने करत आहेत," असा घणाघाती पलटवार अमित ठाकरे यांनी केला. नागपुरातील पाचपावली येथील सिंधू महाविद्यालयात मनविसेच्या सभासद नोंदणी मोहिमेची पाहणी केल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. माझा मुलगा कोणत्या शाळेत जाणार, हे साटम ठरवणार का? अमराठी रिक्षाचालकांच्या कार्यक्रमात अमित साटम यांनी केलेल्या टीकेबाबत विचारले असता अमित ठाकरे म्हणाले की, "स्वतःच्या पक्षाच्या नेत्यांनी आणि परिवहन मंत्र्यांनी मराठी सक्तीची केल्याचे सांगितले, तरी हे लोक हिंदीत भाषण करतात. यावरूनच यांना मराठी भाषेची किती काळजी आहे हे दिसून येते. अमित साटम हा तोच माणूस आहे जो मुंबईत रस्त्यावरील खड्ड्यांमुळे आणि झाड अंगावर पडून झालेल्या निष्पापांच्या मृत्यूवर हसला होता. लोकांच्या मृत्यूवर हसणारा माणूस माझा मुलगा कुठल्या शाळेत शिकणार हे ठरवणार का?" "आम्ही परिस्थितीनुसार लोकांच्या दुःखात जाऊन त्यांच्याशी संवाद साधतो. पण जर कोणी आमच्या मराठी भाषेवर आले, तर आम्ही अंगावर गेल्याशिवाय राहणार नाही." MPSC आणि NEET पेपरफुटीवर सरकारला धारेवर धरले राज्यातील वारंवार घडणाऱ्या पेपरफुटीच्या घटनांवरून त्यांनी सरकारवर तीव्र संताप व्यक्त केला. "पेपर फुटल्यानंतर चौकशी आणि परीक्षा रद्द करण्यापेक्षा पेपरफुटी होणारच नाही, यासाठी सरकारने काय उपाययोजना केल्या? परीक्षा घोटाळ्यांमुळे आतापर्यंत राज्यातील 20-21 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या, तरीही या सरकारला पाझर फुटला नाही." "
आजची तरुण पिढी अत्यंत हुशार आहे. त्यांना नीट कळते की त्यांच्या पाठीशी कोण खंबीरपणे उभे आहे. हे सरकार उत्तरदायी (Accountable) राहिलेले नाही. तरुणांनी स्वतःहून प्रश्न विचारायला सुरुवात केली, तर ते सत्ताधाऱ्यांना सत्तेचा बाहेरचा रस्ता दाखवतील." ‘आदिवासी विद्यार्थ्यांचं आंदोलन संपेपर्यंत प्रश्न संपलेला नाही’ अमित ठाकरे यांनी आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरही भाष्य केले. आदिवासी विद्यार्थी मागील अनेक दिवसांपासून आंदोलन करत असल्याचे सांगत, केवळ शासन निर्णय रद्द करणे पुरेसे नसल्याचे त्यांनी म्हटले. “आदिवासी विद्यार्थी 14 दिवसांपासून आंदोलन करत आहेत. आज जीआर रद्द झाल्याचे कळले. पण जीआर रद्द होणे आणि विद्यार्थ्यांचे समाधान होणे यात मोठा फरक आहे,” असे ते म्हणाले. या आंदोलनादरम्यान मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना जाहीर करण्यात आलेली आर्थिक मदत अद्याप मिळाली नसल्याचा दावाही त्यांनी केला.
सरकारने केवळ घोषणा न करता प्रत्यक्ष मदत पोहोचवणे आवश्यक आहे, अशी भूमिका त्यांनी मांडली. अमित ठाकरे यांनी या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज आदिवासी विद्यार्थ्यांना भेटण्यासाठी जाणार असल्याचेही सांगितले. एमपीएससी पेपरफुटीवरून सरकारला सवाल नागपुरातील पत्रकार परिषदेत एमपीएससी परीक्षेतील कथित पेपरफुटीच्या मुद्द्यावरही अमित ठाकरे यांनी सरकारला घेरले. “पेपरफुटी होणार नाही, यावर आपण कधी काम करणार आहोत? पेपरफुटी झाल्यानंतर कारवाई करण्यापेक्षा ती होऊच नये यासाठी सरकार कधी काम करणार?” असा थेट सवाल त्यांनी केला. एमपीएससीने सुरुवातीला काही घडलेच नसल्याची भूमिका घेतली आणि आता काही बाबी मान्य केल्या जात असल्याचा दावा त्यांनी केला. पेपरफुटीच्या घटनांमुळे तरुणांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. याच संदर्भात त्यांनी ‘जेन झी’ अर्थात तरुण पिढीचा उल्लेख करत सरकारने या पिढीला गृहीत धरू नये, असा इशारा दिला. “हे लोक खूप शार्प आहेत. त्यांच्या पाठीशी कोण उभं राहतं हे त्यांना कळतं,” असे अमित ठाकरे म्हणाले. सरकारने आंदोलक तरुणांच्या प्रश्नांना सामोरे जाऊन त्यांची उत्तरे दिली पाहिजेत. केवळ स्वतःला सोयीचे प्रश्न घेऊन सभा घेण्याऐवजी आंदोलक आणि प्रश्न विचारणाऱ्या तरुणांना समोर घेऊन संवाद साधला पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली. सरकार अकाउंटेबल आणि आन्सरेबल नाही तरुणांच्या आत्महत्यांच्या घटनांवरूनही अमित ठाकरे यांनी सरकारवर निशाणा साधला. आंदोलन करणाऱ्या तरुणांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्याने परिस्थिती गंभीर बनत असल्याचे ते म्हणाले. “सरकार अकाउंटेबल नाही, आन्सरेबल नाही,” अशी टीका करत त्यांनी आंदोलकांशी संवाद साधण्याची मागणी केली. एका विद्यार्थिनीच्या आत्महत्येचा संदर्भ देत तिच्या कुटुंबाची परिस्थितीही त्यांनी मांडली. संबंधित विद्यार्थिनीच्या वडिलांनी शेती विकल्याचे आणि घरातील मुलगा अद्याप नववीत असल्याचे सांगत, अशा कुटुंबांकडे सरकारने संवेदनशीलतेने पाहिले पाहिजे, असे ते म्हणाले.
31 ऑगस्टनंतरही महाराष्ट्र दौरा सुरूच राहणार आपला महाराष्ट्र दौरा केवळ काही दिवसांपुरता मर्यादित नसल्याचे अमित ठाकरे यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्रातील 36 जिल्हे आणि 255 तालुक्यांमध्ये पोहोचण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. विदर्भ आणि नागपूरकडे ठाकरे कुटुंबाचे लक्ष कमी असते, अशी भावना काही वेळा व्यक्त केली जाते. मात्र, नागपूरसह विदर्भात सातत्याने येत राहणार असल्याचे अमित ठाकरे यांनी सांगितले. “माझा महाराष्ट्र दौरा सुरू झाला आहे. तो विदर्भातून आणि नागपुरातूनही सुरू राहील. मी येत राहणार आहे. किती महिन्यांनी यायला पाहिजे ते तुम्हीच सांगा,” असे ते म्हणाले. विद्यार्थी आणि नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधणे, त्यांच्या अडचणी जाणून घेणे आणि शक्य असलेले प्रश्न सोडवणे हा दौऱ्याचा उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.