सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीवरून महायुतीतील मित्रपक्षांमध्ये सुरू असलेला अंतर्गत संघर्ष आता उफाळून आला आहे. या निवडीत भाजपला डावलण्यात आल्याच्या चर्चांवर राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी शुक्रवारी (20 नोव्हेंबर) स्पष्ट शब्दांत आपली भूमिका मांडत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांचा परखड समाचार घेतला. "अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीबाबत वरिष्ठ नेत्यांकडून आलेल्या सर्व सूचना आणि सुचवलेली नावे मी फॉर्म भरण्याच्या दिवशीही वेळेवर राष्ट्रवादी व सेनेच्या नेत्यांपर्यंत पोहोचवली होती. मात्र, 'आमचा निर्णय आता झाला आहे' असे सांगत राष्ट्रवादी आणि शिवसेनेने एकत्र येऊन परस्पर वेगळा निर्णय घेतला, ही वस्तुस्थिती आहे," असा गौप्यस्फोट शिवेंद्रराजे भोसले यांनी केला आहे. मुंबईतील बैठकीत तिन्ही प्रमुख नेत्यांनी नेमका काय फॉर्म्युला ठरवला होता? जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये झालेल्या बैठकीचा संपूर्ण घटनाक्रमच शिवेंद्रराजे भोसले यांनी माध्यमांसमोर मांडला. निवडणूक प्रक्रिया सुरू झाली तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या तिन्ही प्रमुख नेत्यांसमोर मी, मंत्री शंभूराज देसाई आणि मंत्री मकरंद पाटील उपस्थित होतो (त्या दिवशी मंत्री जयकुमार गोरे हे सोलापूरला निघून गेल्याने ते बैठकीत नव्हते). स्थानिक पातळीवर तोडगा काढण्याचे निर्देश विकास सेवा सोसायटीच्या जागा सोडून उर्वरित जागांचे वाटप स्थानिक नेत्यांनी आपापल्या पातळीवर एकत्र बसून करावे आणि कुठे अडचण आल्यास हा विषय वरिष्ठांकडे आणावा, असे तिन्ही नेत्यांनी सांगितले होते. अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीबाबतही हाच फॉर्म्युला ठरला होता. मकरंद पाटील व शंभूराज देसाईंना वेळेत निरोप दिला मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट झाल्यानंतर आणि स्थानिक मित्रपक्षांच्या अडचणी वरिष्ठांच्या कानावर घातल्यानंतर, वरिष्ठांनी अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी काही सूचना व नावे सुचवली होती. फॉर्म भरण्याच्या आदल्या दिवशी आणि प्रत्यक्ष फॉर्म भरण्याच्या दिवशीही मी स्वतः मकरंद पाटील यांना फोन करून (त्यावेळी मकरंद आबा आणि शंभूराज देसाई एकत्रच होते) वरिष्ठांनी सुचवलेले नाव व सूचना कळवल्या होत्या. मात्र, त्यावर त्यांनी 'आमचा निर्णय झाला आहे' असे उत्तर देत राष्ट्रवादी आणि शिवसेनेने परस्पर निवडी उरकल्या. माझ्याकडे मतदान असूनही युतीसाठी माघार घेतली, पण काही जणांनी कुरघोड्या केल्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपने युती धर्म पाळण्यासाठी मोठा त्याग केला, मात्र मित्रपक्षांकडून काही ठिकाणी दगाफटका झाल्याची खंतही शिवेंद्रराजे यांनी व्यक्त केली. "मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युती तुटू नये असे सांगितले होते. माझ्याकडे स्वतःचे हक्काचे मतदान असतानाही मी युतीसाठी माघार घेतली. त्यामुळे माझ्या कार्यकर्त्यांची नाराजी मला ओढवून घ्यावी लागली, पण मी त्यांची समजूत काढली. असे असतानाही आमच्या उमेदवारांवर कुरघोड्या करण्याचे प्रयत्न केले गेले, ही वस्तुस्थिती आहे. मी वेळेवर काही पावले पटापट उचलल्यामुळे त्या कुरघोड्या पूर्णपणे यशस्वी झाल्या नाहीत, तरीही त्याचा काहीसा फटका मतदानात बसलाच," असे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, या परस्पर निर्णयामुळे भाजपचे वरिष्ठ नेते नाराज आहेत का, या प्रश्नावर बोलताना वरिष्ठांच्या नाराजीबद्दल मी बोलू शकत नाही, मात्र एक पक्ष म्हणून आणि देवेंद्र फडणवीस यांचा कार्यकर्ता म्हणून माझी भूमिका त्या दिवशीही स्पष्ट होती आणि आजही त्यात कोणताही बदल झालेला नाही, असे शिवेंद्रराजे भोसले यांनी ठामपणे सांगितले. --------------------------------------- हेही वाचा… मेरिटवर शिवसेना कालही उद्धवजींचीच होती आणि उद्याही राहील : बारामती विमानतळाचा निधी आधीच मिळाला असता तर कदाचित दादांचा अपघात टळला असता –सुप्रिया सुळे सर्वोच्च न्यायालयातील शिवसेनेच्या पक्ष आणि चिन्हाची सुनावणी अंतिम टप्प्यात आली असताना राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांनी मोठे विधान केले आहे. "मी कोणतीही भविष्यवाणी करत नाही; मात्र गुणवत्तेच्या (मेरिट) आधारावर शिवसेना हा पक्ष कालही उद्धव ठाकरे यांचाच होता, आजही आहे आणि उद्याही त्यांचाच राहील," असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. शुक्रवारी (20 नोव्हेंबर 2026) बारामती दौऱ्यावर असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी बारामती विमानतळाच्या विकासासाठी मंजूर झालेला 64 कोटी रुपयांचा निधी, इंदापूरमधील मतदार यादीतून नावे वगळल्याची कथित ऑडिओ-व्हिडिओ क्लिप, दुष्काळी परिस्थिती आणि शरद पवार यांच्या बारामती दौऱ्याबाबत सविस्तर माहिती दिली. येथे वाचा संपूर्ण बातमी
Source: Maharashtra