आगामी काळात पुन्हा एकदा मतदारसंघ पुनर्रचनेची (डिलिमिटेशन) चर्चा सुरू होत असताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या मुद्द्यावर अत्यंत परखड भूमिका मांडली आहे. "डिलिमिटेशन व्हायला आमची कोणतीही हरकत नाही, मात्र यामुळे दक्षिणेतील राज्यांवर अन्याय होऊ नये; त्यासाठी जनगणनेची नेमकी कोणती तारीख ग्राह्य धरली जाणार हे महत्त्वाचे आहे," असे चव्हाण यांनी स्पष्ट केले. तसेच, डिलिमिटेशनच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) कडून घेतल्या जाणाऱ्या भूमिकेवर भाष्य करताना, "एकीकडे इंडिया आघाडीत राहायचे आणि दुसरीकडे मोदी सरकारला सोयीची ठरेल अशी भूमिका घ्यायची, असा दुटप्पीपणा किंवा तळ्यात-मळ्यात करू नये," असा सूचक टोलाही त्यांनी लगावला. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या शिवचरित्रावरील पुस्तकाच्या इंग्रजी अनुवाद प्रकाशन सोहळ्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. डिलिमिटेशन, महिला आरक्षण आणि 'वन नेशन, वन इलेक्शन' एकत्र करून सरकारचा अपप्रचार मतदारसंघ पुनर्रचनेच्या मुद्द्यावर सविस्तर भाष्य करताना पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर आणि आघाडीतील मित्रपक्षांच्या भूमिकेवर भाष्य केले. डिलिमिटेशन हा अत्यंत मोठा आणि गुंतागुंतीचा विषय असून एका वाक्यात त्यावर बोलता येणार नाही. केंद्र सरकारने महिला आरक्षण, परिसीमन (डिलिमिटेशन) आणि 'वन नेशन, वन इलेक्शन' हे 3 ते 4 मुद्दे एकत्र घुसळून मोठा अपप्रचार सुरू केला आहे. या विषयावर सविस्तर प्रबोधन करण्यासाठी येत्या रविवारी (22 नोव्हेंबर) किंवा 1 ते 2 दिवसांत आपण स्वतंत्र व्याख्यान देणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. शरद पवारांच्या पक्षाकडून चुकीचा निर्णय होणार नाही अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसकडून सातत्याने डिलिमिटेशनला समर्थन देण्याची भाषा होत असल्याच्या प्रश्नावर चव्हाण म्हणाले की, अशा भूमिकेचा थेट फायदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच होणार आहे. त्यामुळे आघाडीतील घटक पक्षांनी तळ्यात-मळ्यात करू नये; एक तर थेट सत्तेत जावे किंवा आघाडीचा धर्म पाळावा. मात्र, शरद पवार हे याबाबत कोणताही चुकीचा निर्णय घेणार नाहीत, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. बारामती व अहमदाबाद विमान अपघाताचा अहवाल कोण लपवतंय? बारामती विमानतळाच्या विकासासाठी 112 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्यानंतर, हा निधी आधीच मिळाला असता तर अजित पवार यांचा विमान अपघात टळला असता, अशी भावना खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली होती. यावर प्रतिक्रिया देताना पृथ्वीराज चव्हाण यांनी अपघाताच्या चौकशी अहवालावरच बोट ठेवले. "सुरक्षिततेवर पैसे खर्च केलेच पाहिजेत, ते ठीक आहे. मात्र, अपघाताचा अधिकृत अहवाल आल्याशिवाय त्यावर बोलणे योग्य ठरणार नाही. खरा प्रश्न हा आहे की, हा अहवाल अद्याप का येत नाही? अहमदाबादची विमान दुर्घटना असो किंवा बारामतीचा अपघात, इतका विलंब का होत आहे आणि नेमके कोण काय दडवण्याचा प्रयत्न करत आहे?" असा थेट सवाल चव्हाण यांनी उपस्थित केला. शिवचरित्र आणि सोनिया गांधींच्या पुस्तकावरून भाजपला टोला ज्येष्ठ विचारवंत डॉ. श्रीपाल सबनीस यांनी लिहिलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांवरील ग्रंथाच्या इंग्रजी भाषांतराचे चव्हाण यांनी कौतुक केले. "शिवचरित्रावरून अनेकांनी वाद निर्माण केले. स्वराज्याची प्रेरणा शहाजीराजे आणि जिजाऊंनी दिली की रामदास स्वामींनी, तसेच 'गोब्राह्मण प्रतिपालक' ही पदवी कोणी लावली, यावर सबनीस यांनी धाडसाने प्रकाश टाकला आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे सर्व रयतेचे राजे होते, ते एका विशिष्ट धर्माचे किंवा जातीचे नव्हते; त्यांना 'सेक्युलर प्रिन्स' म्हटले तरी वावगे ठरणार नाही," असे चव्हाण म्हणाले. दरम्यान, सोनिया गांधी यांच्या आत्मचरित्रावरून भाजपने सुरू केलेल्या टीकेचाही चव्हाण यांनी समाचार घेतला. "मी सोनिया गांधींचे पुस्तक वाचले आहे. त्यात त्यांचे बालपण, विवाहापूर्वीचे आणि विवाहानंतरचे अनेक अपरिचित व वैयक्तिक प्रसंग त्यांनी मांडले आहेत. भाजप त्या पुस्तकावर टीका न करता केवळ राहुल गांधींना ट्रोल करत आहे. या ट्रोलिंगमुळे पुस्तकाचा खप उलट वाढतच आहे, त्याबद्दल भाजपला धन्यवाद दिले पाहिजेत," असा मिश्कील टोला पृथ्वीराज चव्हाण यांनी लगावला. ------------------------------------------------------------ हेही वाचा… अजित पवारांसोबत त्याच अपघातग्रस्त विमानातून रोहित पवारांनी केला होता प्रवास:नवनाथ बन यांचा तिकीटासह दावा, मागितला खुलासा दिवंगत नेते अजित पवार यांच्या विमान अपघातावरून सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांना आता नवे वळण मिळाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) आमदार रोहित पवार यांनी ज्या व्हीएसआर (VSR) कंपनीच्या विमानातून कधीही प्रवास न केल्याचा दावा केला होता, त्याच अपघातग्रस्त विमानातून आणि त्याच पायलटसोबत रोहित पवारांनी अजित पवारांसोबत प्रवास केला होता, असा मोठा दावा नवनाथ बन यांनी आज पत्रकार परिषदेत केला आहे. यासंदर्भातील प्रवासाचे तपशील सादर करत त्यांनी रोहित पवारांकडून स्पष्टीकरणाची आणि माफीची मागणी केली आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी
Source: Maharashtra