रायगड जिल्ह्यातील कर्जत आणि भीमाशंकरच्या संवेदनशील परिसरात प्रस्तावित असलेल्या 'टोरंट' जलविद्युत प्रकल्पाविरोधात स्थानिक नागरिक आणि पर्यावरणप्रेमींचा रोष तीव्र होत असताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व खासदार सुनील तटकरे यांनी अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका घेतली आहे. "या प्रकल्पासाठी केंद्र व राज्य सरकारच्या पर्यावरण आणि वन विभागाच्या आवश्यक परवानग्या घेतल्या असल्या, तरी सह्याद्रीचा हा परिसर पर्यावरणीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील आहे. येथील 50 ते 100 वर्षे जुनी झाडे आणि स्थानिकांच्या तीव्र जनभावना लक्षात घेऊन राज्य सरकारने या प्रकल्पाचा नक्कीच फेरविचार करावा," असे आवाहन सुनील तटकरे यांनी केले आहे. यावेळी त्यांनी अजित पवार विमान अपघात प्रकरणावर रोहित पवार करत असलेले आरोप आणि कोकणच्या हापूस आंब्याच्या जीआय टॅग वादावरही सविस्तर भाष्य केले. 250 शेतकऱ्यांना रस्ते मोजणीच्या नोटिसा; 25 नोव्हेंबरला संघर्षाची शक्यता कर्जतमधील टोरंट जलविद्युत प्रकल्पाला सर्वच स्तरांतून विरोध होत असून सद्यस्थितीत वृक्षतोड थांबली असली, तरी महसूल प्रशासनाने आता या भागातील 250 शेतकऱ्यांना रस्ते मोजणीसाठी नोटिसा बजावल्या आहेत. यामुळे येत्या 25 नोव्हेंबर रोजी या परिसरात मोठा गदारोळ आणि संघर्ष होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया देताना खासदार सुनील तटकरे म्हणाले की, "मी 3 दिवसांपूर्वीच यासंदर्भात माझी भूमिका स्पष्ट केली आहे. सह्याद्रीच्या कुशीतील हा परिसर भारत सरकारने संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित केलेला आहे. प्रकल्पासाठी वन व पर्यावरण विभागाच्या रीतसर परवानग्या घेतल्या गेल्या असल्या, तरी स्थानिकांच्या भावना आणि वर्षानुवर्षे जतन केलेली 50 ते 100 वर्षे जुनी झाडे वाचवण्यासाठी सरकार नक्कीच सकारात्मक विचार करेल, अशी मला अपेक्षा आहे." रोहित पवारांनी आरोप करण्यापेक्षा पुरावे तपास यंत्रणांकडे द्यावेत अजित पवार यांच्या विमान अपघातावरून आमदार रोहित पवार यांनी केलेल्या नव्या आरोपांना सुनील तटकरे यांनी चोख प्रत्युत्तर दिले. अजितदादांचा घात झाला की अपघात, हे सत्य देशातील जनतेसमोर आलेच पाहिजे, हीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पहिल्या दिवसापासूनची स्पष्ट भूमिका आहे. लवकरच अहवाल येण्याचा विश्वास ज्या दिवशी ही दुर्दैवी घटना घडली, त्याच दिवशी केंद्रीय गृहमंत्री आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून लवकरात लवकर अहवाल समोर आणण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे रोहित पवारांनी माध्यमांसमोर केवळ आरोप करत राहण्यापेक्षा, त्यांच्याकडे काही ठोस पुरावे असतील तर ते थेट संबंधित तपास यंत्रणांकडे सुपूर्द करावेत, असे आवाहन तटकरे यांनी केले. कोणी कितीही प्रयत्न केले तरी कोकणच्या हापूस आंब्याचे महत्त्व कदापि कमी होणार नाही गुजरातच्या वलसाड आणि कर्नाटकमधील आंब्यांना मिळालेल्या मानांकनावरून कोकणच्या हापूस आंब्याच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असताना तटकरे यांनी कोकणातील आंबा बागायतदारांना धीर दिला. ते म्हणाले की, "प्रत्येक राज्याला आपल्या राज्यात पिकणाऱ्या उत्पादनासाठी मानांकन मिळवण्याचा कायदेशीर अधिकार आहे. कर्नाटकमध्ये तर बिगर-मोसमी आंब्याचेही उत्पादन घेतले जाते. मात्र, कोकणातील देवगड व रत्नागिरीच्या हापूस आंब्याची चव आणि दर्जा संपूर्ण जगात आगळावेगळा आहे. कोणी कितीही प्रयत्न केले तरी खवय्यांच्या मनातील कोकणच्या हापूस आंब्याचे अढळ स्थान आणि महत्त्व कदापि कमी होणार नाही." ---------------------------------------- हेही वाचा… राज्यावर 1972 पेक्षाही भीषण दुष्काळाचे संकट: रब्बी हंगामातील पेरण्या ऐतिहासिक नीचांकावर, सुपर एल निनोमुळे भयंकर हाल! राज्यातील रब्बी हंगामातील पेरण्यांच्या आकडेवारीचा अभ्यास केल्यास यंदाचा दुष्काळ 1972 पेक्षाही अधिक भयावह असल्याचे समोर आले आहे. 1972-73 च्या हंगामात 47.29 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या होत्या, मात्र, यंदा आतापर्यंत केवळ 14 लाख 74 हजार 304 हेक्टरवरच पेरणी पूर्ण झाली आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी
Source: Maharashtra