Only 180 Mm Of Rainfall Out Of An Average Of 270 In 3 Months, Lakes Dry Up, Demand To Fill Lakes In The District From Discharge From Dams पावसाळ्याचे तीन महिने उलटले तरी सोलापूर जिल्ह्यात अद्याप पुरेसा पाऊस झालेला नाही.जिल्ह्यात केवळ 180.8 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, तो सरासरीच्या अवघा 66.9 टक्के आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान 270.1 मिलिमीटर आहे. गतवर्षी याच कालावधीत 281.2 मिलिमीटर पाऊस झाला होता. जिल्ह्यात खरीप पेरणीचे क्षेत्र कागदोपत्री 96.7 टक्क्यांवर पोहोचले आहे. असे तरी पेरणीनंतर पुरेसा पाऊस न झाल्याने अनेक भागांत पिके सुकू लागली आहेत. काही ठिकाणी झालेल्या तुरळक पावसामुळे शेतात पिकांपेक्षा तणच अधिक वाढले असून, त्याचा पिकांना फायदा होण्याऐवजी नुकसान होत असल्याचे चित्र आहे. पेरणीनंतर पाऊस न झाल्याने जळून गेलेल्या पिकांची स्वतंत्र नोंद मात्र अद्याप झालेली नाही. कृषी विभागाच्या अहवालानुसार जिल्ह्यात खरीप पिकांसाठी अपेक्षित 3 लाख 37,968 हेक्टर क्षेत्रापैकी 3 लाख 26,871 हेक्टरवर पेरणी झाली आहे. ऊस वगळता एकूण पेरणीचे क्षेत्र 3 लाख 44,194 हेक्टरवर पोहोचले आहे.
यंदा रोहिणीपासून आर्द्रापर्यंत तुरळक ठिकाणी काही प्रमाणात पाऊस झाला. त्याच्या बळावरच खरीप पेरणी झाली. मात्र त्यानंतर पावसाने दडी मारल्याने खरीप हंगामच संकटात सापडला आहे. उजनी वगळता जिल्हाभरात पाणीसाठ्यांनी तळ गाठला आहे. धरणातील पाण्याने तलाव भरून काढावेत, अशी मागणी करण्यात येत आहे. ^यावर्षी सुरुवातीला झालेल्या थोड्याशा ओलीवर काही शेतकऱ्यांनी खरीप पेरण्या केल्या. त्यावर काही ठिकाणी बियाणे उगवलेही नाही तर त्यानंतर अद्याप पुरेसा पाऊस नसल्याने उगवून आलेली पिके पाण्याअभावी अनेक ठिकाणी जळून गेली आहेत. शासनाकडे जरी पावसाच्या नोंदी असल्या तरी प्रत्यक्षात तेवढा पाऊस पिकांना मिळाला नाही. त्यामुळे यंदाचा खरीप वाया जाण्याची शक्यता दिसत आहे. आता भिस्त रब्बीवर आहे. -चंद्रकांत कुंभार, शेतकरी, यशवंतनगर ^यावर्षी पावसाने चांगलीच दडी मारली आहे. अजूनही सध्या तरी पावसाची शक्यता नाही. मात्र 20 सप्टेंबरपासून पावसाची शक्यता आहे. 7 ऑक्टोबरच्या पुढे मात्र निश्चितपणे मोठा पाऊस, पूर, महापूर येतील अशा पावसाची शक्यता दिसत आहे.
रमेश जाधव, संचालक, माळशिरस विज्ञान केंद्र, जाधववाडी माळशिरस माळशिरस तालुक्यातील निमगाव, फोंडशिरस, कोळेगाव, गिरझणी आदी मोठे पाझर तलाव अद्याप कोरडे ठणठणीत आहेत. त्यामुळे या परिसरातील विहिरी आणि कूपनलिकांवरही पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे.त्यामुळे वीर धरणातील नीरेच्या विसर्गातून माळशिरस तालुक्यातील तलाव भरून घेतले जावेत.