Cattle Stealing Gang Arrested In Vadhana Area शेतकरीबांधवांनी कष्टाने जोपासलेल्या जनावरांवर डल्ला मारून त्यांची जनावरे चोरणारी टोळीला पकडण्यात वाढवणा पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली त्यांच्याकडून एक लाख रुपयांची रोकड तसेच चोरीकरिता वापरण्यात आलेली बोलेरो पिकअप असा ए ज्ञानेश्वर संजीव मूसळे रा.चिद्रेवाडी, बालाजी गंगाराम नादरगे रा.डोंगरशेळकी या शेतकऱ्यांनी जनावरे चोरीला गेल्याची फिर्याद दिली होती. त्यानंतर वाढवणा हद्दीत सातत्याने घडणाऱ्या जनावरे चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावण्यासाठी पोलिस अधीक्षक अमोल तांबे,अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण,पोलीस उपाधिक्षक अरविंद रायबोले यांच्या मार्गदर्शनात वाढवणा पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहा.पोलिस निरीक्षक सुनील गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले होते. गुप्त माहिती संकलन, संशयितांवर पाळत आणि गोपनीय तपास करून चोरट्यांच्या टोळीपर्यंत पोहोचण्यात सपोनि गायकवाड यांच्या पथकातील पोलिसांनी अखेर यश मिळविलेच.
तपासात खय्युम महताब खुरेशी (वय 25 रा.वाढवणा ता.उदगीर जि लातूर), शंकर नंदकुमार पुंड (वय 28रा.डोंगरशेळकी ता.उदगीर जि.लातूर), शाहरुख शादुल पिंजारी ( वय 24रा.वाढवणा खुर्द ता.उदगीर)या तिघांना ताब्यात घेतले. तर सादिक खाजामिया खुरेशी (रा.वाढवणा बु ता. उदगीर ) हा साथीदार पसार झाला असून त्याचा शोध सुरू आहे. प्राथमिक चौकशीत आरोपींनी उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र,पोलिसांनी तांत्रिक पुरावे, गोपनीय माहिती आणि विविध गुन्ह्यांतील तपशील समोर ठेवल्यानंतर आरोपींनी जनावरे चोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिली. आरोपींनी डोंगरशेळकी येथील बैल,म्हशी चिद्रेवाडी येथील गाय, म्हशी,आदी जनावरे चोरी करून विक्री केल्याचे कबूल केले.या गुन्ह्यांची उकल करण्यात वाढवणा पोलिसांना यश आले आहे. आरोपींकडून जप्त करण्यात आलेली 100000/- इतकी रोकड ही जनावरे चोरी करून विक्रीतून मिळाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.या रकमेचा पंचनामा करून ती गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आली आहे.या उल्लेखनीय कारवाईमुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कारवाई संजय कलकत्ते, गजानन पुल्लेवाड, शिवप्रताप रंगवाळ, शिवाजी केंद्रे,मधुकर कारलेवाड, संभाजी गाडगे,दत्तात्रय वाडकर, शिवाजी कांगणे, प्रणाली गायकवाड आदींच्या पथकाने केली.