करमाळा तालुका आणि शहरात विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला असून, मुलींच्या सुरक्षेसाठी शिवसेनेच्या महिला तालुकाप्रमुख प्रियांका गायकवाड यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. शहरातील सर्व खासगी शैक्षणिक क्लासेसमध्ये आणि किल्ला विभाग परिसरातील प्रमुख रस्त्यांवर तत्काळ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची मागणी त्यांनी केली आहे. यासंदर्भात पोलिस उपविभागीय अधिकारी, पोलिस निरीक्षक व नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना स्वतंत्र निवेदने देण्यात आली. करमाळा तालुका व शहरात मुलींसाठी अनेक खासगी शैक्षणिक क्लासेस सुरू आहेत. मध्यंतरी काही क्लासेसमध्ये मुलींच्या छेडछाडीचे प्रकार घडले असून, काही ठिकाणी शिक्षकांकडूनच विद्यार्थिनींना चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याच्या धक्कादायक घटना समोर आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या महिला तालुका प्रमुख प्रियांका गायकवाड यांनी पोलिसांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मुलींच्या सुरक्षेसाठी करमाळा तालुक्यातील सर्व खासगी क्लासेसमध्ये सीसीटीव्ही बसवणे बंधनकारक करण्याचे आदेश संबंधित चालकांना देण्यात यावेत.
अन्यथा अशा बेकायदेशीर क्लासेसवर तात्काळ बंदी आणून त्यांच्यावर कारवाई करावी, तसेच यापूर्वी ज्या मुलींनी किंवा पालकांनी तक्रारी केल्या आहेत किंवा जे प्रकार निदर्शनास आले आहेत त्यांची चौकशी करून कारवाई करण्यात यावी, अशी विनंती करण्यात आली आहे. किल्ला विभागातील राष्ट्रसंत गाडगे बाबा समाज मंदिर येथून लोकमान्य टिळक पुतळ्याकडे आणि नगरपरिषदेकडे जाणाऱ्या रस्त्यावर दोन्ही बाजूंना सीसीटीव्ही कॅमेरे लावणे अत्यंत आवश्यक आहे. या मार्गावरून नगरपरिषद मुलींची प्राथमिक शाळा, महात्मा गांधी विद्यालय आणि यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाकडे जाणारी विद्यार्थिनींची मोठी वर्दळ असते. मात्र, या मार्गावर मुलींच्या छेडछाडीच्या प्रमाणात वाढ झाली असून पालकांकडून तक्रारी आलेल्या आहेत.
कोणतीही दुर्घटणा किंवा मुलींचे शोषण होऊ नये म्हणून प्रशासनाने लवकरात लवकर या परिसरात सीसीटीव्ही यंत्रणा बसवावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. नगराध्यक्षांनी तातडीने सीसीटीव्ही बसवण्याच्या दिल्या सूचना करमाळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांच्याकडे किल्ला विभाग परिसरातील रस्त्यांवर सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही बसवण्याची मागणी प्रियांका गायकवाड यांनी केली आहे. या विषयावर त्यांनी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा मोहिनी सावंत यांच्याशी सविस्तर चर्चा केली असून, त्यांनी या मागणीची दखल घेत मुलींची सुरक्षा लक्षात घेता तत्काळ ठोस कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच, नगराध्यक्षा सावंत यांनी या परिसराची पाहणी करून तातडीने सीसीटीव्ही बसवण्याबाबत प्रशासनाला योग्य त्या सूचनाही दिल्या आहेत.