Martyr Vaibhav Avtade Funeral In Mangalwedha | Ganesh Wadi Mourns मंगळवेढा तालुक्यातील गणेशवाडी गावचे पुत्र वैभव आवताडे शहीद झाले आहेत. गणेश हे जम्मू-काश्मीरमध्ये मराठा रेजिमेंटमध्ये कर्तव्यावर होते. शुक्रवारी दुपारी 12.31 वाजता वैभव शहीद झाले असून रविवारी शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांचे शव विमानाने पुणे येथे शनिवारी रात्री 12:30 वाजता येणार असून, पहाटे तीन वाजता पुणे येथून संरक्षण दलाच्या वाहनातून निघणार आहे, रविवारी मंगळवेढा मध्ये सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास येणार आहे, त्यानंतर सजलेल्या वाहनातून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात येणार आहे.
मूळ गावी गणेशवाडी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. वैभव यांनी दि.13 ऑगस्ट रोजी गुरुवारी रात्री अकरा वाजता आई-वडील पत्नी यांच्याशी फोनवरून गप्पा मारल्या सगळे ठीक आहे ,तुम्ही ठीक आहात ना अशी विचारणा केली, सगळे गावाकडे शांत झोपी गेले, शुक्रवारी 12:31 दुपारी अचानक जम्मू येथील मुख्यालयातून फोन आला आणि आई-वडिलांसह गावकऱ्यांचा काळजाचा ठेका चुकला. वैभव आवताडे शहीद झाल्याची बातमी आली आणि स्वातंत्र्य दिनाच्या दिवशीच गणेशवाडी गावासह तालुक्यावर शोककळा पसरली. याबाबत सविस्तर माहिती अशी, मंगळवेढा तालुक्यातील गणेशवाडी गावचे सुपुत्र वैभव तात्यासौ आवताडे वय 31 हे जम्मू येथे मराठा सिग्नल रेजिमेंट येथे कर्तव्य बजावत होते, शुक्रवारी दुपारी 12:31 वाजता शहीद झाले.
अतिशय गरीब परिस्थितीतून वैभव तात्यासो आवताडे हे गेल्या 11 वर्षापूर्वी सैन्यात भरती झाले. 6 वर्षापूर्वी त्यांचा विवाह झाला होता. त्यांच्या पश्चात 1 वर्षाचा मुलगा देवांश,3 वर्षाची मुलगी देवांशी, आई-वडील, पत्नी दिपाली, भाऊ असा परिवार आहे. वैभव आवताडे हे शेवटचे सुट्टीवर 10 मे रोजी 2026 रोजी आले होते, सुट्टी संपल्यानंतर ते परत नोकरी वरती हजर झाले होते.