Women Held A Balloon Parade In Nimgaon, Men's Lezim Attracted Attention, Traditional Festival Of Gaurai Celebrated, Spontaneous Applause For Lezim's Performance माळशिरस तालुक्यातील निमगाव येथे गौराईचा पारंपरिक सण मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. महिलांच्या पारंपरिक गाण्यांसह झिम्मा, फुगडी, झोके आदी खेळांनी उत्सवाला रंगत आली. तर पुरुषांनी वावड्या व लेझीमच्या खेळातून उत्साहाचे दर्शन घडवले. गुलाल निमगाव येथे गौराई उत्सवाची परंपरा जपली जात असून गावातील महिलांबरोबरच सासरी गेलेल्या माहेरवाशिणी मुलीही या उत्सवासाठी आवर्जून गावात येतात. गावातील बारा बलुतेदारांना चिखलाची गौराई बनविण्यापासून ते उत्सवाच्या सांगतेपर्यंतचा मान आहे.
त्यानुसार गौराईच्या पटांगणात उभारलेल्या मंडपात मानकऱ्यांनी सकाळपासून चिखलाची गौराई साकारली. सायंकाळी पटांगणात महिला व मुली मोठ्या संख्येने जमल्या. पारंपरिक गाणी म्हणत झिम्मा, फुगडी, झोके आदी खेळ खेळण्यात आले. सायंकाळी साडेसात वाजता गौराईची मिरवणूक सुरू झाली. गौराईला स्पर्श करण्यासाठी महिलांची मोठी गर्दी झाली होती. गावालगतच्या ओढ्यात रात्री उशिरा गौराई व वावड्यांचे विसर्जन करून उत्सवाची सांगता करण्यात आली. यानंतर गावातील मानकरी पाटील कुटुंबीयांच्या वतीने बारा बलुतेदार तसेच अन्य मानकऱ्यांना त्यांच्या मानाप्रमाणे भाकरी, कडकणी, पान-सुपारी देऊन सन्मान करण्यात आला. वावडी उडविणाऱ्या तरुणांनाही रोख बक्षिसे देण्यात आली. यावेळी गावकरी सहभागी होते. तरुणाईने मोबाईल ठेवून हाती घेतला वावडीचा दोर ग्रामपंचायत कार्यालयासमोर गौराईचा पारंपरिक सण उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यासाठी तरुणांसह अबालवृद्धांनी गर्दी केली होती. सर्वानी लेझीम खेळत सणाचा उत्साह वाढवला. एक फुटापासून तब्बल 27 फूट उंचीच्या वावड्या जागा मिळेल तेथे उडवण्यात तरुणाई दंग झाली होती. मात्र नेमका यावेळी वारा नसल्याने मोठ्या वावड्यांना उंच भरारी घेता आली नाही.
नेहमी हाती मोबाइल असणारी तरुणाई मोबाइल बाजूला ठेवून हाती वावडीचे दोर घेऊन पतंग उडवण्यात मग्न झालेली दिसून आली. गौराईची मिरवणूक येताच गर्दीतील तरुणंसह सर्वजण वावड्या खाली उतरवून मिरवणुकीत सहभागी झाले. पुरुषंच्या लेझीम खेळाने मात्र सर्व उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. मिरवणूकीत पुरुषांपेक्षा महिलांचा सहभाग आणि उत्साह चांगला दिसत होता. नागपंचमीनिमित्त परंपरा कायम आहे.